Fabindiaची 'जश्न-ए-रिवाझ' जाहिरात का सापडली वादाच्या भोवऱ्यात?
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (19:28 IST)
ब्रँड फॅबइंडियानं उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तयार केलेली एक जाहिरात मागं घेतली आहे. काही उजव्या विचारांच्या हिंदू गटांनी या जाहीरातीवर आक्षेप घेत टीका केली होती.
हिंदूंच्या महत्त्वाच्या दिवाळी उत्सवाच्या जाहिरातीमध्ये प्रामुख्यानं मुस्लीम समाजाकडून वापरल्या जाणाऱ्या उर्दू भाषेचा वापर केल्याचा आरोप या गटांनी केला आहे.
या जाहिरातींच्या कलेक्शनला 'जश्न-ए-रिवाझ' असं नाव देण्यात आलं होतं. हे एक उर्दू वाक्य असून त्याचा अर्थ परंपरांचा उत्सव असा होतो.
मात्र या जाहिरातीच्या ट्वीटनंतर काही हिंदूंनी आरोप केले. या जाहिरातींमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं त्यात म्हटलं आहे.
कपडे, खाद्यपदार्थ, फर्निचर, फर्निशिंग यांची विक्री करणाऱ्या या ब्रँडकडून प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी या हिंदू सणाचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मात्र, जश्न-ए-रिवाझ हे या ब्रँडचं दिवाळी कलेक्शन नसल्याची माहिती, फॅबइंडियाच्या प्रवक्त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलीय.
काही सोशल मीडिया यूझर्सनं या ब्रँडवर बहिष्कार घालण्याची मागणी करत ट्विटरवर या विरोधात मोहीम (कॅम्पेन) सुरू केली. दिवाळी म्हणजे जश्न-ए-रिवाझ नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं हे कॅम्पेन ट्विटरच्या प्रमुख ट्रेंडमध्ये होतं.
ऑक्टोबर महिन्यात दागिन्यांच्या तनिष्क या प्रसिद्ध ब्रँडलाही त्यांची जाहिरात मागं घ्यावी लागली होती. या जाहिरातीमध्ये एक आंतरधर्मिय दाम्पत्य दाखवण्यात आलं होतं. त्यात मुस्लीम असलेल्या सासरच्या नातेवाईकांनी हिंदू नवरीसाठी डोहाळ्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचं दाखवण्यात आलं होतं.
या जाहिरातीद्वारे लव्ह जिहादचा प्रचार होत असल्याचा आरोप हिंदू गटांकडून करण्यात आला होता. विवाहाच्या माध्यमातून हिंदू तरुणींचं धर्मांतर करणं म्हणजे लव्ह जिहाद आहे असं हिंदू गटांचं म्हणणं आहे.
या ब्रँडला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, सर्वकाही तेवढ्यावरच थांबलं नाही. तर काही जणांना धमक्या देण्यात आल्या. तसंच कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांची नावं ऑनलाईन जाहीर करण्यात आली.
"आम्ही प्रेम आणि प्रकाशाच्या उत्सवाचं स्वागत करत असताना, या कलेक्शनच्या (जश्न-ए-रिवाझ) माध्यमातून भारतीय संस्कृतीला नमन करतो," असं सोमवारी व्हायरल झालेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
मात्र हे ट्वीट आणि जाहिरातही मागं घेण्यात आली आहे.
दक्षिण आशियामध्ये उर्दू भाषेला एक समृद्ध असा इतिहास आहे. गेल्या काही शतकात उर्दू भाषेत काही अत्यंत दर्जेदार साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्यापैकी अनेक लेखक आणि कवींचा आजही भारतामध्ये गौरव केला जातो.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये भाषा ही ध्रुवीकरणाचं साधन ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे ही भाषा प्रामुख्यानं मुस्लीम समाजाकडून बोलली जाते, त्यामुळे हिंदू परंपरा आणि उत्सवांचं वर्णन करण्यासाठी या भाषेचा वापर होऊ नये, असा काही हिंदू गटांचा समज आहे.
गेल्या काही वर्षांत उजव्या विचारसरणीच्या गटांच्या दबावात आलेला फॅब इंडिया हा काही एकमेव ब्रँड नाही.
काही दिवसांपूर्वीच मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडच्या एका जाहिरातीवरूनही सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. यात आलिया भट नवरीच्या पोशाखात झळकली होती.
या जाहिरातीमध्ये जुन्या काही परंपरांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं त्यावर जोरदार टीका झाली होती. हिंदू विवाह पद्धतीतील परंपरांवर हा हल्ला असल्याचा आरोप या जाहिरातीवर झाला होता.