श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडेरायांचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. खंडोबाच्या भाविकांसाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा नवरात्री सण साजरा केला जातो.
खरं तर हा षड्रोत्सव असतो पण तरीही त्याला नवरात्र म्हणतात.
यंदा 15 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली असून हा दिवस देवदीपावली म्हणून देखील साजरा केला जातो. तर चंपाषष्ठी यंदा 20 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. मणी आणि मल्ल या दोन असूरांचा खंडोबाने खात्मा करून लोकांना जाचातून सोडवलं त्याच्या समरणार्थ चंपाषष्ठी साजरी केली जाते.
श्री खंडोबा हा शंकराचा अवतार, चैत्री पौर्णिमाला या मार्तंड-भैरवाचा अवतार झाला. मल्हारी, मार्तण्डभैरव, खंडोबा, म्हाळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार आहे. मणी-मल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. मणी-मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी.
एका ताम्हणात विड्याचे पान, सुपारी, पैसा, भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना "सदानंदाचा येळकोट" किंवा "येळकोट येळकोट जय मल्हार" अस मोठ्या आवाजात घोषणा केली जाते.