विराटच्या करिअरमध्ये सचिनचा तो सल्ला ठरला निर्णायक

मुंबई- इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामान्यांचा मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पण दोनवर्षापूर्वी याच विराटला इंग्लंड दौर्‍यात धावांसाठी झगडावे लागले होते. त्याला 10 डावांमध्ये मिळून फक्त 134 धावा करता आल्या होत्या.
त्या कठिण काळात सचिन तेंडुलकर विराटच्या पाठीशी उभा राहिला होता. सोमवारी भारताच्या मालिका विजयानंतर विराटने सचिनकडून मिळालेल्या त्या मौलिक सल्ल्याबद्दल सांगितले. इंग्लंडच्या निराशाजनक दौर्‍यानंतर मी सचिनबरोबर बोललो. सचिनने त्यावेळी मला माझ्याबद्दल बोलल्या जाणार्‍या, लिहिल्या जाणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. मी विनोदाने किंवा उपरोधाने हे बोलत नाहीये. तो मला मिळालेला सर्वोत्तम सल्ला होता असे एक्सप्रेस ट्रिब्युनने कोहलीच्या हवाल्याने म्हटले आहे.
 
सचिनने मला मैदानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. माझ्याबद्दल काय लिहिले जातेय, बोलले जातेय त्याकडे मी पाहत नाही. संघासाठी काय उपयुक्त ठरेल, काय केले पाहिजे त्याचा मी विचार करतो. याचा मला मैदानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भरपूर फायदा होतो असे कोहलीने सांगितले.
 
विराटने मुंबई कसोटीत कॅलेंडर वर्षातील 1 हजार धावांचा टप्पा पार केला. त्याच्या द्विशतकीय 235 धावांच्या खेळीने विजयाचा पाया रचला. या खेळीसाठी विराटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा