Los Angeles Olympics 2028: 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन, सामने T20 फॉरमॅटमध्ये होणार
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (07:24 IST)
Los Angeles Olympics 2028: 128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाईल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीने मान्यता दिली आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. म्हणजेच 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे.
2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटशिवाय आणखी चार खेळांचा समावेश करण्यात येणार आहे.आयओसी
कार्यकारी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत क्रिकेटसह पाच खेळांचा समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. क्रिकेटशिवाय, बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोससह पाच नवीन खेळांचा समावेश करण्याच्या लॉस एंजेलिस आयोजकांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर झाला होता. तथापि, 2028 च्या खेळांमध्ये स्थान सुनिश्चित करण्यासाठी सर्व नवीन खेळांना IOC सदस्यत्वाद्वारे मत जिंकणे आवश्यक होते. सोमवारी या पाच नवीन खेळांचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला. लॉस एंजेलिस-28 आयोजन समितीने पाच खेळ जोडण्याच्या प्रस्तावाला 99 IOC सदस्यांपैकी फक्त दोन सदस्यांनी मतदान करून विरोध केला.
IOC मीडियाने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून याची पुष्टी केली. त्यांनी लिहिले- लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्याचा आयोजन समितीचा प्रस्ताव आयओसीच्या अधिवेशनाने स्वीकारला आहे. तसेच IOC ने क्रिकेटच्या पुढे T20 लिहिले, म्हणजेच क्रिकेट सामने T20 फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेट सामन्यांचा समावेश असेल.
याआधी 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्येही क्रिकेटचे पुनरागमन झाले होते, मात्र त्यात फक्त महिलांचा टी-20 सामना खेळवण्यात आला होता. त्यात भारतीय महिला संघाने रौप्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर यंदाच्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात टी-20 सामने खेळले गेले. भारताने एशियाडमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकली होती.
क्रिकेट यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळले गेले होते, जिथे इंग्लंड आणि फ्रान्स सुवर्णपदकासाठी आमनेसामने आले होते. मात्र, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि त्यात आता यश आले आहे. वास्तविक, क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन आयओसी भारतीय उपखंडातील बाजारपेठेचे भांडवल करण्याचा प्रयत्न करेल.
या कारणास्तव ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटच्या समावेशासह, 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण अधिकार 158.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 2028 मध्ये 1525 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला होता.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी एक्स वर लिहिले की, बेसबॉल -सॉफ्टबॉल , क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल ,लेक्रॉस, आणि स्क्वेश हे खेळ लॉस एंजलिस ऑलम्पिक 2028 मध्ये सहभागी होणार.खेळाडूंसाठी ही चांगली बातमी आहे. एक क्रिकेट प्रेमी राष्ट्र म्हणून आम्ही विशेषतः क्रिकेटच्या समावेशाचे स्वागत करतो, जे या अद्भुत खेळाच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेचे प्रतिबिंबित करते.
यापूर्वी, IOC अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले होते - सहभागी संघांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. आम्ही आयसीसीसोबत काम करू. आम्ही कोणत्याही देशाच्या वैयक्तिक क्रिकेट अधिकाऱ्यांसोबत काम करणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मदतीने क्रिकेटला अधिक लोकप्रिय कसे करता येईल हे आपण पाहू