ड्रीम 11'ला नोटीस, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक कंपन्या दिवाळखोरीत का निघत आहेत?
रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (16:28 IST)
प्राप्तिकर विभागानं भारतीय क्रिकेट संघाची प्रायोजक कंपनी 'ड्रीम 11'ला अंदाजे 17 हजार कोटी रुपयांचा कर जमा करण्याची नोटीस दिली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कराची मागणी केल्यानं 'ड्रीम 11'नं या नोटिशीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं. कराची नोटीस मिळाल्याच्या वृत्तानंतर 'ड्रीम 11' च्या शेअरचे भाव घसरले होते. हे लक्षात घ्यायला हवं की केंद्र सरकारनं ऑनलाइन जुगार आणि कॅसिनो इत्यादींवर 28 टक्के कर लावला आहे.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की 'ड्रीम 11' च्या सहयोगी कंपन्या जुगार सेवा चालवत होत्या, त्यामुळं त्या कंपन्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नावर 28 टक्के कर भरावा लागेल. 'ड्रीम 11' कंपनीनं अलीकडेच नवीन लोगोसह भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी प्रसिद्ध केली होती.
'ड्रीम 11' ला आलेल्या कर भरण्याच्या नोटीस नंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर कमेंट करत लिहिलं की, भारतीय क्रिकेट संघाला प्रायोजित करणारी कंपनी अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
मागील प्रायोजकांची स्थिती काय आहे?
गेल्या पंधरा वर्षांत भारतीय क्रिकेट संघाला प्रायोजित केल्यानंतर अनेक वेळा कंपन्यांवर वाईट काळ आला.
क्रिकेट संघाला प्रदीर्घ काळ प्रायोजित करणारी 'सहारा इंडिया' ही कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. कंपनीनं खरे आकडे लपवून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याच्या मालकाला तुरुंगात जावं लागलं होतं.
त्याचप्रमाणे 'स्टार स्पोर्ट्स' वाहिनीनंही भारतीय क्रिकेट संघाला दीर्घकाळ प्रायोजित केलं. त्यावेळी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावून त्यांनी क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे सर्वात मोठे हक्क मिळवले होते.
पण नंतर स्टार स्पोर्ट्स कोलमडलं.
चिनी मोबाईल कंपनी 'ओप्पो'नंही ( Oppo) काही काळ भारतीय क्रिकेट संघाला प्रायोजित केलं होतं, पण भारताचे चीनशी संबंध बिघडल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली, त्यामुळं या कंपनीचीही अवस्था वाईट झाली आहे.
याच काळात 'बायजूज ( BYJU'S) ही आणखी एक कंपनी मोठ्या उत्साहानं क्रिकेट प्रायोजकत्वाच्या क्षेत्रात उतरली होती. सुरुवातीला ही कंपनी खूप वेगानं वाढत होती आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा तिचा ब्रँड अॅम्बेसेडर असायचा.
या कंपनीनं वास्तविक मूल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मालमत्ता दाखवल्याचं नंतर उघड झालं.
ही कंपनी आता बिकट परिस्थितीत आहे.
आता क्रिकेट संघाची नवीन प्रायोजक कंपनी 'ड्रीम 11' ला काही हजार कोटी रुपयांच्या कराची नोटीस मिळाली आहे. त्यानंतर त्यांचे शेअर्सही घसरत आहेत.
पैसे नसताना जोखीम घेणार्या कंपन्या
भारतात क्रिकेट खूप लोकप्रिय आहे आणि राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटू हे सामान्य लोकांसाठी त्यांचे हिरो आहे.
भारतातील मोठमोठ्या कंपन्या या खेळाडूंना जाहिरातींसाठी त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे द्यायला तयार आहेत.
क्रीडा विश्लेषक जसविंदर सिद्धू सांगतात , "हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपण ज्या कंपन्यांबद्दल बोलत आहोत, त्या त्यांच्या जाहिरातींसाठी क्रिकेटपटूंना बाजार मूल्यापेक्षा जास्त पैसे देतात."
"यात त्यांची समज अशी आहे की कोणत्याही क्रिकेटपटूशी तुम्ही जोडले गेलात, तर त्या कंपनीला लगेच प्रसिद्धी मिळते आणि यामुळे बाजारातून पैसे गोळा करणं देखील सोपं होतं, परंतु काही काळानंतर लक्षात येतं की क्रिकेटपटू आणि क्रिकेटवर खर्च केलेला पैसा खूप जास्त होता. आणि बाजार मूल्यांशी ते सुसंगत नव्हतं."
ते सांगतात की, "कोविड महामारीनंतर संपूर्ण मार्केट बदललं आहे. अनेक कंपन्या हे समजून घेण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळं क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवर जास्त पैसे गुंतवणाऱ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत."
कंपन्या क्रिकेटपटूंना ब्रँड अॅम्बेसेडर का करतात?
प्रसिद्ध क्रीडा पत्रकार प्रदीप मॅगझीन सांगतात की , "प्रत्येक ब्रँडची इच्छा असते की त्यांच्या वस्तूंनी सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. ते चित्रपट कलाकारांना त्यांचं ब्रँड अॅम्बेसेडर बनवतात आणि जाहिरातींसाठी क्रिकेटपटूंचा वापर करतात."
ते सांगतात की, "क्रिकेट स्टार्स मग ते विराट कोहली असो, धोनी असो किंवा तेंडुलकर...ही मोठी नावं आहेत. कंपन्यांना वाटतं की त्यांनी त्यांच्या वस्तूंची जाहिरात केली तर त्यांचं उत्पादन अधिक विकलं जाईल पण असं दिसून आलं आहे की अनेक कंपन्या इतक्या सक्षम नसतात."
मॅगझीन सांगतात की, "कंपन्या जोखीम स्वीकारतात. क्रिकेटपटू खूप जास्त फी आकारतात. टॉप क्रिकेटर्स ब्रँड अॅम्बेसेडर बनण्यासाठी करोडो रुपये घेतात. सुरुवातीची गुंतवणूक मोठी असते आणि त्याचे फायदे लगेच मिळत नाहीत."
ते म्हणतात, "जर कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर ती बुडण्याचा धोका आहे. सॅमसंग, एलजी आणि पेटीएम सारख्या मोठ्या कंपन्या यात यशस्वी ठरल्या. अर्ध्या कंपन्या बुडत नाहीत कारण क्रिकेट ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात त्यांचं काही नुकसान नाही. त्या उलट, ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत आणि ते जोखीम घेतात, त्या कंपन्या डबघाईला येतात."
मोठमोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू तसंच परदेशी खेळाडूंचा वापर करतात. या जाहिराती लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतात आणि क्रिकेटपटूंशी संबंधित असल्यामुळं त्यांची ब्रँड व्हॅल्यूही वाढते.
केवळ काही टॉपचे फिल्म स्टार्स जाहिरातींमध्ये क्रिकेटपटूंची बरोबरी करू शकतात.
भारतीय खेळाडू हे क्रिकेट जगतात सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.
क्रिकेटची लोकप्रियता आणि जाहिरात बाजार
'द वीक' या साप्ताहिक मासिकाच्या क्रीडा संपादक नीरू भाटिया म्हणतात, "क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटपटू आणि क्रिकेटवरील जाहिरातींमध्ये पैसे गुंतवणं नक्कीच फायदेशीर आहे."
त्या सांगतात की, कंपन्या डबघाईला येण्याचा क्रिकेट आणि क्रिकेटपटूंशी काहीही संबंध नाही. अंतर्गत कारणांमुळे कंपन्या डबघाईला येतात.
त्या सांगतात की, "क्रिकेटची महिला प्रीमियर लीग अजूनही नवीन आहे. जेव्हा ती सुरू झाली तेव्हा त्याच्या प्रायोजकत्वासाठी कोणाशीही संपर्क साधण्याची गरज नव्हती. मोठ्या संख्येनं कंपन्या पैसे गुंतवण्यासाठी पुढे आल्या."
त्या सांगतात की, "क्रिकेट जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याच्या जाहिरातींनाही मागणी आहे आणि ती वाढतच आहे."