रोहित शर्मा बोलिंगऐवजी बॅटिंगकडे वळला आणि टीम इंडियाचा 'हिटमॅन' झाला

रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (15:26 IST)
तुम्ही मुंबईच्या लोकल ट्रेनमधून कधी प्रवास केला आहे का? एखादा धक्का खावा लागला तरी चालेल, पण गाडीत घुसणारच, अशा आवेशात बहुतांश प्रवासी दिसतात.
मजबुरी म्हणा किंवा मुंबई शिकवते म्हणा. पण हा चिवटपणा या शहराचा भाग आहे आणि काहीही झालं तरी हार न मानण्याची वृत्ती इथल्या अनेक क्रिकेटर्समध्येही भरली आहे.
 
लहानपणी मॅचसाठी मैदानापर्यंत जाताना खांद्यावर क्रिकेट किट पेलत ट्रेननं प्रवास करणंही कदाचित खेळाडूंना ‘खडूस’ बनवत असावं. रोहित शर्मा त्याच खडूस आणि चिवट वृत्तीचं मूर्तिमंत रूप आहे.
 
तुम्ही रोहितची फक्त फलंदाजी पाहिलीत, तर या चिवटपणाचा अंदाज कदाचित लगेच येणार नाही. पण त्याची वाटचाल या संघर्षाची साक्ष देते.
 
कदाचित म्हणूनच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही रोहितमध्ये आपला वारसदार दिसला होता.
 
एकेकाळी टॅलेंट म्हणून रोहितचं कौतुक व्हायचं. मग याच शब्दावरून वाया गेलेलं टॅलेंट म्हणून त्याची हेटाळणी होऊ लागली.
 
पण धूळ बसली तरी हिरा चमकणं थांबवत नाही, तसंच काहीसं रोहितच्या बाबतीत झालं.
रोहितमध्ये या टॅलेंटची, गुणवत्तेची कमी नाही यावर जाणकार, चाहते आणि टीकाकारांचं एकमत होतं आणि आजही आहे. पण आता रोहितची गुणवत्ता केवळ तळपत नाहीये, तर तिला नवे पैलू पडले आहेत.
 
2011 साली रोहितला भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. तोच रोहित 2023 मध्ये पुन्हा भारतात होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार आहे.
 
बोलर रोहित बॅट्समन कसा झाला?
रोहितचा जन्म नागपूरच्या बनसोडमध्ये झाला, पुढे मुंबईतच त्याच्यातल्या क्रिकेटरची जडणघडण झाली.
 
रोहितचे आईवडील एका अगदी सामान्य तेलुगू परिवारातले होते. कामासाठी ते मुंबईजवळ डोंबिवलीला एका छोट्याशा घरात राहायचे. तर रोहित बोरीवलीला आपल्या रवी काकांकडे राहायचा.
 
खरंतर रोहितला आधी फलंदाज नाही, तर गोलंदाज व्हायचं होतं. तो ऑफस्पिन बोलिंग टाकायचा. प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्यातला फलंदाज कसा जोखला, त्याला पैलू पाडले आणि हे रत्न आणखी झळाळू लागलं.
 
लाड यांनी एकदा मुलाखतीत रोहितसोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. 1999 साली बोरिवलीतल्या एका अंडर-12 सामन्यादरम्यान त्यांनी रोहितला बोलिंग करताना पाहिलं होतं.
 
त्यावेळी दिनेश लाड बोरीवलीतच गोराईच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेतील मुलांना प्रशिक्षण देत होते. शाळेची टीम उभारत होते. त्यांनी रोहितला आपल्या शाळेत नेलं, त्याला फ्री-शिप मिळवून दिली आणि शाळेच्या टीममध्ये जागाही दिली.
 
एक दिवस लाड शाळेत आले तेव्हा एक मुलगा नेट्समध्ये नॉकिंग करताना दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं, तर तो रोहित होता.
 
लाड यांना रोहितच्या बॅटिंगमध्ये काहीतरी खास असल्याचं जाणवलं. त्यांनी मग रोहितला शाळेच्या टीममध्ये फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवायला सुरूवात केली.
 
पुढच्या काही वर्षांत रोहितनं हळूहळू मुंबईच्या अंडर-17 संघापर्यंत, तिथून मुंबईच्या सीनियर टीमपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.
 
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि चढउतार
रोहित शर्मानं 2007 साली जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं पहिल्यांदा छाप पाडली ती ट्वेन्टी 20 क्रिकेटमध्ये.
 
2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वहिल्या ट्वेन्टी 20 विश्वचषकात खेळला. त्या संघात रोहितचा समावेश होता.
 
त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरद्धच्या सामन्यात रोहितनं 40 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा करत भारताच्या विजयाला हातभार लावला.
 
फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा त्या सामन्यातही रोहितनं 16 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावा केल्या होत्या.
 
पुढच्या वर्षी म्हणजे 2008 साली इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली, तेव्हा रोहितला डेक्कन चार्जर्स या आता रद्द झालेल्या संघात स्थान मिळालं. 2009 च्या मोसमात या टीमनं महान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्त्वाखाली विजेतेपद मिळवलं, तेव्हा त्यात रोहितचा सिंहाचा वाटा होता.
 
रोहितनं आयपीएलच्या त्या मोसमात 18 सामन्यांत 411 धावा केल्या होत्या आणि 11 विकेट्सही काढल्या होत्या. 2011 पासून तो आयपीएलच्या मुंबई इंडियन्सकडून खेळू लागला.
 
पण कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली.
2013 साली कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानात रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळला. त्यानं मधल्या फळीत खेळताना 301 चेंडूंमध्ये 177 धावांची खेळी रचली, भारताच्या विजयाचा पाया घातला आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.
 
मधल्या सहा वर्षांत बरंच काही घडून गेलं.
 
आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या साधारण साडेतीन-चार वर्षांत (2007 ते जानेवारी 2011) रोहितनं 61 वन डेसामन्यांत 27 च्या सरासरीनं 1248 धावा केल्या होत्या. तर ट्वेन्टी२०मध्ये या काळात 20 सामन्यांमध्ये 35च्या सरासरीनं 388 धावा केल्या होत्या.
 
ही कामगिरी त्याच्यातल्या गुणवत्तेला साजेशी तर नव्हतीच, पण ती टीम इंडियातलं त्याचं स्थान भक्कम करण्यासाठीही पुरेशी नव्हती. पण मग एखाद्या डुलकी खात असलेल्या व्यक्तीला कशानंतरी खडबडून जाग यावी, तसं काहीसं घडलं.
 
विश्वचषकातून डावललं आणि रोहितचं करियर बदललं
रोहितच्या गुणवत्तेविषयी त्याच्या टीकाकारांनाही शंका वाटत नसे, पण कामगिरीत सातत्याचा अभाव नाकारता येत नव्हता.
 
त्यामुळे श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीनं रोहितला 2011 साली वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातून वगळलं. ही गोष्ट निराश करणारी होती.
 
मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात अनेकांना तेव्हा याचं आश्चर्य वाटलं नसलं, तरी वाईट नक्कीच वाटलं. आणखी एका गुणवान खेळाडूनं आपली गुणवत्ता वाया घालवली, अशी चर्चाही लोक करू लागले. रोहितसाठी तो कारकीर्दीतला सर्वात कठीण काळ असावा.
 
पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं तो विश्वचषक जिंकला आणि सचिन तेंडुलकरला विजयाचं गिफ्ट दिलं. तेव्हा पहिल्यांदाच रोहितला संघाबाहेर होणं एवढं बोचलं असेल.
त्याच वर्षी रोहितनं वेस्ट इंडिजविरुद्ध आधी त्यांच्याच देशात आणि मग भारतामध्ये झालेल्या मालिकेत त्वेशानं फलंदाजी केली. पण 2012 साली श्रीलंका दौऱ्यावर वन डेत त्याचा स्कोर होता 5, 0, 0, 4, 4. रोहितच्या गुणवत्तेवर आता टीका होत होती.
 
दिनेश लाड सांगतात की रोहित तेव्हा मुंबईच्या एका टोकाला असलेल्या बोरिवलीहून अगदी 'हॅपनिंग' उपनगर असलेल्या वांद्रे परिसरात राहू लागला. सरावासाठी बीकेसीतल्या मैदानात सहज जाता यावं हा त्यामागचा उद्देश.
 
पण रोहितच्या जीवनशैलीवरही त्याचा परिणाम झाला आणि त्याचा क्रिकेटवरचा फोकस ढळला, असं लाड सरांना वाटतं. त्यावेळी त्यांनी रोहितचे कानही उपटले.
 
अनेकदा आयुष्यात आणि क्रिकेटमध्येही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एक मॅचमध्ये खराब कामिगरी खेळाडूची कारकीर्द संपवण्यासाठी पुरे ठरते.
 
पण आपण असं हरवून जाणाऱ्यातले नाही, हे रोहितला सिद्ध करायचं होतं.
 
2013 रोहितसाठी निर्णायक आणि ऐतिहासिक
अभिनेता सलमान खाननं 2012 साली एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला विचारलं होतं, की तुझे रेकॉर्ड कोण तोडू शकेल? सचिननं उत्तर दिलं होतं, विराट आणि रोहित.
 
अनेकांना तेव्हा आश्चर्य वाटलं. म्हणजे विराटमधली चुणूक सर्वांना दिसली होती, पण रोहित तेव्हा अडखळत, ढेपाळत संघर्ष करत होता.
 
मात्र सचिनचं भाकित किती खरं आहे याची झलक लवकरच पाहायला मिळाली.
या मधल्या काळात रोहितनं आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं. तासंतास नेट्समध्ये तो घाम गाळत होता.
 
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदानं त्याच्यातल्या क्रिकेटरला आणखी प्रगल्भ केलं. 2013 च्या आयपीएल मोसमात रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.
 
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलामीची जोडी गाजली आणि लोक त्यांची तुलना गौतम गंभीर आणि विरेंद्र सहवागशी करू लागले.
 
त्याच वर्षी रोहितनं कसोटी पदार्पण केलं आणि वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं.
 
रोहितला ‘हिटमॅन’ का म्हणतात?
2 नोव्हेंबर 2013 रोजी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात रोहितनं 209 धावांची खेळी केली.
 
वन डेत द्विशतक झळकावणारा रोहित हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवागनंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला.
त्यात खेळीदरम्यान रोहितनं 12 चौकार आणि 16 षटकार लगावले होते.
 
तू एका ‘हिटमॅन’सारखा खेळलास अशी टिप्पणी एका ब्रॉडकास्टरनं तेव्हा केली होती आणि रवी शास्त्रीनंही कॉमेंट्री करताना ते नाव वापरलं. तेव्हापासून रोहितला 'हिटमॅन' हे नवं नाव मिळालं.
 
पुढे 2014 साली श्रीलंकेविरुद्ध त्यानं ईडन गार्डन्सवर वन डेत 264 धावांची खेळी केली, जी वन डे क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळी आहे. 2017 साली रोहितनं पुन्हा श्रीलंकेविरुद्ध वन डेत नाबाद 208 धावा कुटल्या.
 
वन डेत तीन द्विशतकं ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. गुणवत्तेला मेहनतीची साथ मिळाली की अशक्य गोष्टीही शक्य करता येतात, हे रोहितनं दाखवलं आहे.
 
आर अश्विननं एकदा सांगितलं होतं, तसं रोहित रंगात आला, की त्याला आऊट कसं करायचं किंवा कसं थांबवायचं हे गोलंदाजांना कळतच नाही.
 
रोहितचा खेळ आक्रमक आहे पण त्याच्या फलंदाजीत शैली आणि नजाकत आहे. एक प्रकारची सहजताही आहे. इंग्रजीत ज्याला लेझी एलिगन्स म्हणतात ना, तसं.
 
हा लेझी एलिगन्स रोहित पत्रकार परिषदेत बोलतो, तेव्हाही कधीकधी दिसून येतो. रंगात आला की रोहितची उत्तरंही त्याच्या फलंदाजीसारखीच खुसखुशीत असतात.
 
आयुष्याची जोडीदार
विश्वचषकात खेळण्याचं रोहितचं स्वप्न 2015 साली अखेर पूर्ण झालं. त्यानं बांगलादेशविरुद्ध शतक ठोकत भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिलं पण टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आलं नाही.
 
रोहितनं वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याच सुमारास एक मोठा निर्णय घेतला. त्याची मैत्रिण आणि स्पोर्टस मॅनेजर रितिका सजदेहसोबत विवाह करण्याचा निर्णय.
रोहितच्या वाटचालीत, विशेषतः बदलाच्या काळात रितिकाचं योगदान मोठं आहे. तिच्यामुळे रोहितमधली सकारात्मकता टिकून राहिली, असं दोघांच्या जवळचे मित्र सांगतात.
 
2019 उजाडेपर्यंत क्रिकेटविश्वात, विशेषतः वन डेत रोहितचा दबदबा वाढला होता. त्या वर्षी विश्वचषकात त्यानं पाच शतकं ठोकली.
 
टीम इंडियाचा कर्णधार
रोहित डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता, तेव्हाची गोष्ट. अॅडम गिलख्रिस्ट तेव्हा या टीमचं नेतृत्त्व करायचा आणि रोहितमध्ये नेतृत्त्वगुण आहेत हे त्यानं 2009 सालीच हेरलं होतं.
 
“रोहित उप-कर्णधारपदाची भूमिका अगदी गांभीर्यानं घेतो आहे. त्याला कधीतरी नेतृत्त्व करायचं आहे आणि ही बाब रोमांचक वाटते,” असं गिलख्रिस्ट तेव्हा एका पत्रकार परिषदेत म्हणाला होता.
 
गिलख्रिस्टचे ते शब्द खरे ठरले. 2017 साली वन डेत मग ट्वेन्टी२० मध्ये आणि 2022 साली कसोटीतही भारतीय कर्णधारपदाची धुरा विराटकडून रोहितकडे गेली.
युवा खेळाडूंना कसं हाताळायचं, हे रोहितला चांगलं ठावूक आहे आणि टीममधल्या खेळाडूंवर दबाव येणार नाही यासाठी तो आपल्या परीनं प्रयत्न करतो, असं त्याचा सहाकारी ईशान किशन सांगतो.
 
रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनी 2013 ते 2020 या काळात आयपीएलमध्ये पाच विजेतेपदं मिळवली आहेत. तर टीम इंडियानं 2018 आणि 2023 सालचा आशिया चषक जिंकला आहे.
 
पण आता विश्वचषकाचं आव्हानही सोपं नसेल.
 
एकेकाळी फलंदाज म्हणून विश्वचषकाच्या संघातून डावललं गेलेला रोहित आता कर्णधार म्हणून ही ट्रॉफी उचलणार का, हे काळच ठरवेल.
 


























































Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती