पुढील वर्षीचा टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. ही जागतिक स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करतील. वृत्तसंस्था पीटीआयने ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की भारतातील किमान पाच ठिकाणी टी-20 विश्वचषक सामने होतील, तर श्रीलंकेतील दोन ठिकाणी या स्पर्धेचे सामने होतील.
2026 च्या टी-20 विश्वचषकाचे फॉरमॅट 2024 सारखेच राहील जिथे20 संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक गटात पाच संघ असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर एट टप्प्यासाठी पात्र ठरतील आणि या आठ संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जाईल. यापैकी, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारतीय संघ हा गतविजेता आहे ज्याने 2024 मध्ये अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद जिंकले होते. यावेळी स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जातील.
सध्या 2026च्या टी-20 विश्वचषकासाठी 15 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली यांचा समावेश आहे. इटालियन संघ पहिल्यांदाच या जागतिक स्पर्धेत खेळणार आहे. उर्वरित पाच संघांची निवड पात्रता फेरीतून केली जाईल, त्यापैकी दोन संघ आफ्रिका प्रदेश पात्रता फेरीतून निवडले जातील, तर तीन संघ आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून निवडले जातील.
Edited By - Priya Dixit