छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी जय भवानी जय शिवाजी मालिका २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हण्टलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.
जय भवानी जय शिवाजी मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता जय भवानी जय शिवाजी मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असं म्हण्टलं तरी चालेल. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.