प्लॅनेट मराठी ओटीटी अखेर प्रेक्षकांच्या भेटीला, अमृता खानविलकरच्या हस्ते अनावरण

शुक्रवार, 2 जुलै 2021 (22:56 IST)
मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची इतक्या आतुरतेने वाट पाहात होते, ते पहिलंवहिलं  मराठी ओटीटी अखेर आपल्या भेटीला आले आहे. त्यामुळे आपल्या मराठमोळ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून आपल्या या हक्काच्या ओटीटीवर जगभरात कुठेही बसून मराठी चित्रपट, वेबसिरीज, विविध कार्यक्रम, सोहळे पाहता येणार आहेत. सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू करणाऱ्या अमृता खानविलकर हिच्या हस्ते 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे अधिकृत अनावरण करण्यात आले. सध्या जरी प्रेक्षकांसाठी प्लॅनेट मराठी ओटीटी अंतर्गत 'प्लॅनेट मराठी सिनेमा'वर 'जून' हा एक्सक्लुझिव्ह चित्रपट (पे पर व्ह्यू) उपलब्ध असला तरी 'प्लॅनेट मराठी ओरिजनल'ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
 
'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या लाँचबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ''एवढ्या मोठया मराठी ओटीटी प्लँटफॉर्मचे अनावरण माझ्या हस्ते झाले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला विशेष आनंद आहे की, या 'प्लॅनेट मराठी ओटीटी' परिवाराशी मी 'प्लॅनेट टॅलेंट'च्या माध्यमातून जोडले गेले आहे. आतापर्यंत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ने आपल्या अनेक आगामी वेबसिरीज, वेबफिल्म्सची घोषणा केली आहे. त्यांचा कंटेन्ट पाहता 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''
 
'प्लॅनेट मराठी ओटीटी', 'अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी' अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आल्याने 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख आणि संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, '' अनेक महिन्यांपासून प्रेक्षक 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची वाट पाहत होते. आम्हाला अत्यंत आनंद होतोय की, आज अखेर 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच लवकरच प्रेक्षक आपला आवडता कंटेन्ट 'प्लॅनेट मराठी'वर पाहू शकतील. प्रेक्षकांना दर्जेदार, आशयपूर्ण कंटेन्ट पाहायला मिळेल, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. या व्यतिरिक्त मराठी भाषेला लाभलेला समृद्ध साहित्य वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि  प्रेक्षकांशी असलेली बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने आमचा कायमच प्रयत्न असेल.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती