शेअर मार्केटमधील तेजी उद्यादेखील राहणार का? काय आहेत कारणं?
सोमवार, 3 जून 2024 (17:56 IST)
एक्झिट पोल्स मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी शेअर मार्केटने जबरदस्त उसळी घेतली आणि अजूनही मार्केटमधील तेजी कायम आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स जवळपास दोन हजार अंकांची तेजी नोंदवत खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी देखील जवळपास एक हजार अंकांच्या तेजीसह खुला झाला.
एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून येते आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की सत्ता बदल न झाल्यास शेअर मार्केटमधील तेजी किंवा स्थैर्य कायम राहील.
लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं एक्झिट पोल्स आणि वस्तुस्थिती मध्ये अंतर असल्याचं म्हटलं आहे. इंडिया आघाडीनं या लोकसभा निवडणुकीत 295 जागा जिंकणार असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे बाजाराचा अंदाज?
इन्व्हेस्टर परिमल अडे नं शेअर मार्केट खुलं झाल्यानंतर एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर एक पोस्ट केली.
त्यांनी अंदाज व्यक्त करताना म्हटलं आहे की मे 2029 मध्ये निफ्टी 50,000 आणि सेन्सेक्स 1,50,000 अंकांचा टप्पा ओलांडतील. यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की "घरगुती खर्च आणि तरुण लोकसंख्येचा फायदा (डेमोग्राफिक डिव्हिडंड) यामुळे असं होणार आहे."
तर मार्केटचे विश्लेषक असलेले सुनील शाह यांनी सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सनं दोन हजार अंकांची उसळी घेतली असताना पीटीआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली आहे.
ते म्हणाले की. शेअर मार्केट उसळी घेत सुरू झालं, याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त करण्यात आला होता.
सुनील शाह यांनी पीटीआयला म्हटलं की "मार्केट गॅप अप (जेव्हा शेअर मार्केट आधीच्या कामकाजी दिवसाच्या तुलनेत जास्त अंकावर सुरू होतं) निशी सुरू झालं. याचा अंदाज आधीपासूनच होता. कारण शनिवारी सात टप्प्यानंतर लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं आणि एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले. सध्याचं सरकारच पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट अंदाज त्यात व्यक्त करण्यात आले होते."
"मार्केटचं लक्ष नेहमीच धोरणं कायम राहण्याकडे असतं. त्यामुळे मार्केटला वाटलं की निकालामध्ये धक्का बसण्यासारखं काहीही नाही. विद्यमान सरकारची उच्च विकास दर गाठण्याची आणि गुंतवणूक आणि व्यापार अनुकूल धोरणं सुरू राहतील. पायाभूत आणि इतर क्षेत्रांमध्ये केला जाणारा खर्च देखील कायम राहील. मार्केटनं एक्सिट पोल्सच्या अंदाजाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच आपण पाहिलं की मार्केट 2,000 अंकापेक्षा अधिक उसळी घेत सुरू झालं."
त्याचवेळी मार्केटनं घेतलेल्या उसळीबद्दल सोशल मीडियावर वर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिलेल्या वक्तव्यालादेखील शेअर करत आहेत.
अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर रविवारी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं होतं.
याच वेळी ते म्हणाले होते की "एक चर्चा अशीदेखील होते आहे की यांनी इतक्या जास्त जागा यासाठी दाखवल्या कारण यांच्या माणसांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणि उद्या जेव्हा शेअर मार्केट सुरू होईल तेव्हा उसळी घेईल आणि यांना आपले शेअर्स विकून बाहेर पडता येईल."
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचं काय म्हणणं आहे?
अमेरिकन मीडिया कंपनी असलेल्या ब्लूमबर्गनं एक्झिट पोल्सशी निगडीत बातमी प्रकाशित करताना त्याला शीर्षक दिलं आहे, "भारतात निवडणुकीत मोठ्या विजयासाठी मोदी सज्ज, एक्झिट पोल्सवरून दिसतं आहे"
या बातमीत लिहिलं आहे की, "अनेक एक्झिट पोल्स दाखवत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष लागोपाठ तिसऱ्यांदा भारतातील निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळवणार आहे."
ब्लूमबर्गनं बातमीमध्ये पुढे लिहिलं आहे की, "एक्झिट पोल्सच्या आधारावर मोदींनी भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे आणि म्हटलं आहे की गरीबांसह मतदारांवर सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीचा प्रभाव पडला आहे."
यामध्ये म्हटलं आहे की निवडणुकीच्या या निकालाचा भारताच्या शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मागील आठवड्यात भारतातील शेअर मार्केटमध्ये चढ-उतार दिसून आले होते.
ब्लूमबर्गमधून जियोजिट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांनी अंदाज व्यक्त केला आहे की सोमवारी शेअर मार्केट उसळी घेईल.
ते म्हणाले की मे महिन्यापासून वाढत असलेल्या निवडणुकीसंदर्भातील शंकाना एक्झिट पोल्सनं दूर सारलं आहे.
वृत्तपत्रात लिहिलं आहे की, "मार्च महिन्यात संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 8 टक्क्यांपेक्षा अधिक विकासदरानं वाढत होती. सर्व जगातील ही सर्वाधिक वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. रिझर्व्ह बॅंकेनं यावर्षी 7 टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे. एसअॅंडपी ग्लोबल रेटिंग्सनं मागील आठवड्यात भारताच्या संभाव्य पतमानांकनामध्ये (क्रेडिट रेटिंग) वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता."
एलारा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड मध्ये अर्थतज्ज्ञ असलेल्या गरिमा कपूर म्हणतात की "जर निवडणुकीचा निकाल एक्झिट पोल्सनुसार आला तर ही बाब शेअर मार्केटसाठी अत्यंत सकारात्मक असेल कारण यातून हा संदेश जाईल की सध्याची धोरणंच सुरू राहतील आणि व्यापक आर्थिक स्थैर्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल."
ब्रिटनचं आर्थिक विषयांवरील वृत्तपत्र असलेल्या फायनान्शियल टाइम्समधून एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी लिहिलं आहे की राजकीय सातत्य बाजारासाठी चांगलं आहे.
त्या म्हणतात, "निवडणुकीचे अंतिम निकाल एक्झिट पोल्सपेक्षा वेगळा असू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत राजकीय स्थैर्य योग्य ठरेल आणि त्यामुळे मध्यम कालावधीत आर्थिक स्थैर्य येईल."
परदेशी गुंतवणुकदारांचा बाजारातून काढता पाय?
शेअर मार्केटमधील तेजीमुळे तिथे सर्व प्रकारचे गुंतवणूक येत आहेत असं नाही. ब्रिटनचं साप्ताहिक द इकॉनॉमिस्टनं मागील आठवड्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात म्हटलं होतं की एप्रिल महिन्यात परकीय गुंतवणुकदारांनी एक अब्ज डॉलर किंमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली होती.
तर मे महिन्यात परकीय गुंतवणुकदारांनी 4.2 अब्ज डॉलरच्या शेअर्सची विक्री केली होती. अर्थात परकीय गुंतवणुकदारांकडे असलेल्या जवळपास 900 अब्ज डॉलर्स किंमतीच्या भारतीय शेअर्सचा हा एक छोटासा हिस्सा आहे.
मात्र यातून एक संदेश मिळाला की भारतीय शेअर मार्केटमध्ये परदेशी गुंतवणुकदारांचा हिस्सा फक्त 18 टक्केच राहिला आहे आणि मागील कित्येक वर्षातील ही नीचांकी पातळी आहे.
द इकॉनॉमिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलं होतं की परकीदेशी गुंतवणुकदार मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर देखील भारतीय अर्थव्यवस्था तेजीमध्ये आहे. यातून अधिक परतावा मिळण्याची खात्री दिली जाते आहे आणि त्यावरील कर्ज कमी झालं आहे. याचा अर्थ यातून कमी जोखमीतून अधिक नफा मिळतो आहे.
या लेखात पुढे लिहिलं आहे की, "परदेशी गुंतवणुकदारांना भारत कसा हाताळतो याचं सरळ उत्तर असं आहे की भारतामध्ये परकी भांडवलाची थेट गुंतवणूक केली जात नाही. कारण भारतात भांडवली नफा आणि लाभांशावर कर आकारला जातो. मात्र जर या कंपन्यांची नोंदणी भारतात झालेली असली तर त्यांना करामध्ये सूट दिली जाऊ शकते किंवा किमान कराच्या श्रेणीत समाविष्ट केलं जाऊ शकतं."