गेल्या १० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप सुरू असतानाच मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा तणावातून हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते.
राज्यसरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या असल्यामुळे इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीने हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.