एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:18 IST)
ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात ‍‍शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला दि.31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.
 
राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी दि.1 एप्रिल 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याने या मुदतवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही परिवहन मंत्री श्री. परब यांनी केले आहे. यापूर्वी स्मार्ट कार्ड योजनेसाठी दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
 
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जाते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या “स्मार्ट कार्ड” काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने, या योजनेला दि.31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात  आली असल्याचेही श्री.परब यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती