विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:25 IST)
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 9 मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत.
 
विधान भवनात आज राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली. त्यावेळी 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान अधिवेशन घेण्याचे निश्चित झाले.
 
8 मार्चला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे. त्यानंतर 9 मार्चला दुपारी 2 वाजता उपमुख्य आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती