नाशिकमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु असून मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. अनेक ग्रामपंचायती तसेच विविध जाती समुदायांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिक गावात गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू केले होते. त्याला प्रतिसाद वाढत असून, आता गाव बंदी करण्याची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत पाचशे गावांमध्ये गावबंदीचा ठराव झाल्याची माहिती राम खुर्दळ यांनी दिली. तर मराठा आरक्षणप्रश्नी व्यापक जनजागृतीसाठी रविवारपासून गावोगावी बैठकांचे सत्र राबविले जाणार आहे. या आंदोलनात लोकसहभाग वाढविला जाणार प्रत्येकाला शक्य आहे, त्या मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे. आजवरच्या मुख्यमंत्र्यानी, मराठा आमदार, खासदारांनी, मंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यामुळे या सर्वाना गावात प्रवेश देऊ नका, असं सकल मराठा समाजच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे.आतापर्यंत ३०० हून अधिक पाठिंब्याची पत्रे उपोषणकर्त्यांना प्राप्त झाली आहेत. ही सर्व पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनासोबत पाठविली जाणार आहेत.