मनोज जरांगे : 'मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षड्यंत्र'

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (12:53 IST)
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं षड्यंत्र दिसतंय की, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांची पोरं मोठी झाली नाही पाहिजे," असा गंभीर आरोप मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी इथे जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांनी आज (27 ऑक्टोबर) सकाळी माध्यमांशी संवाद साधला.
 
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, "षडयंत्र वाटण्याचं कारण असं आहे की, त्यांनी 30 दिवसांचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवस दिले. त्यांना 5 हजार पुरावे मिळाले, एक पुरावा असला तरी कायदा पारित होतो. मग वेळही आहे आणि पुरावेही आहेत, मग का आरक्षण देत नाहीत? आमच्याकडून घेतलेला वेळ सुद्धा आमची फसवणूक करण्यासाठी होता, असं वाटायला लागलंय."
 
"मुख्यमंत्री मराठ्यांचा असो वा कुठल्याही जातीचा असो, त्यांना आरक्षण द्यायचं नाहीय. त्यांची पोरं मोठी झाली पाहिजे, गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी व्हायला नको त्यांना," असं जरांगे म्हणाले.
 
यावेळी जरांगेंनी समितीला राज्य सरकारनं वाढवून दिलेल्या वेळेबाबतही टीका केली. ते म्हणाले की, "समितीला वेळ का वाढवून दिलं, कुणाला विचारून वेळ वाढवून दिलं? आता 50 वर्षे वाढवून द्याल.
 
तसंच, जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही भाष्य केलं. जरांगे म्हणाले की, "पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता. त्यांना गोरगरीब जनतेची काळजी राहिली नाही, असं त्यातून दिसतं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक काही सांगितलं नाही, अशी शंका मराठ्यांच्या मनात आहे.
 
"मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांबद्दल पाप नव्हतं, वैर भावना नव्हतं. तशी असती, तर त्यांचं विमानसुद्धा मराठ्यांनी शिर्डीला खाली उतरवू दिलं नसतं. पंतप्रधान मराठ्यांचा विषय हाताळतील, अशी गोरगरीब मराठ्यांना आशा होती. मात्र, त्यांना गोरगरिबांची गरज नसल्याचं काल दिसलंय."
 
"सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथे आले होते. 'चार दिवसात कायदा पारित होणार नाही, आम्हाला थोडेसे दस्तऐवज जमा करू द्या, आम्ही एका महिन्यात कायदा पारित करतो, एकच महिन्याचा वेळ द्या, जास्त देऊ नका. तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण देतो,' असं महाजन म्हणाले होते. आम्ही जास्तीचे 10 दिवस दिले," अशी माहिती जरांगेंनी दिली.
 
"10 हजार पानांचे पुरावे असतानाही महाराष्ट्रातल्या मराठ्यां कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित का करत नाही? मराठा समाजाच्या पोरांचं करिअर बरबाद व्हायला पाहिजे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे, असं तुमचं मत असल्याचा अर्थ होतो," असं जरांगे म्हणाले.
 
"तुम्ही कसे आरक्षण देत नाही, हे सुद्धा मराठे पाहणार आहेत. तुम्हाला सुट्टी नाही. पुढच्या दोन-चार दिवसांत मराठे तुम्हाला झोपू देणार नाहीत," असा इशारा जरांगेंनी दिला.
 
जरांगे म्हणतात, 'असं' द्या आरक्षण
यावेळी जरांगेंनी मराठ्यांना कुठल्या 5 प्रकारे आरक्षण दिले जाऊ शकते ते सांगितलं.
 
जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे -
 
1) "बॉम्बे गॅझेटिअरमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक असल्याचे पुरावे आहेत. असे हजारो पुरावे आहेत. तरीही आरक्षण देत नाही, याचा अर्थ षडयंत्र आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही."
 
2) "1967 ला ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं, त्यांना व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. मग त्यांचं आणि आमचा व्यवसाय एकच आहे. त्याआधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं."
 
3) "विदर्भातल्या कुणबी आणि आमचा एकच व्यवसाय, माळी समाजाचा आणि आमचा एकच व्यवसाय. जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झाल्या, मग आम्हालाही आरक्षण हवं."
 
4) "महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुणबी आणि मराठा एकच असल्याचा पुरवा जरी सापडला, तरी महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं."
 
5) "विदर्भातल्या मराठ्यांना पंजाबराव देशमुखांनी आरक्षण दिलं, त्याच आधारे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतो."
 
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरात राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला आहे.
 
गाडी फोडताना संबंधितांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देतानाचे व्हीडिओमध्ये दिसत आहेत.
 
काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
 
ते म्हणाले, "माझ्या गाड्यांती तोडफोड करण्यात आली आहे. झेपणार नाही, पेलणार नाही असं जरांगे म्हणतात, त्याच्यातच हा कोड वर्ड आहे. गुन्हे मागे घ्या म्हणे. शोले स्टाईल टॉवरवर उभे राहतात, सर्व गुन्ह्यांची बेरीज बघता हे मोठं ठरवून केलेलं कारस्थान आहे."
 
सदावर्ते पुढे म्हणाले, "ज्या माणसामुळे पोलिस धारातीर्थी पडले, अशा जरांगेंना तत्काळ अटक करा, त्यांच्या मुसक्या बांधा, कारवाई करा."
 
मनोज जरांगेंनी याप्रकरणी बोलताना म्हटलं, "काय प्रकार घडला ते आम्हाला माहिती नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे.
 
"अटकेच्या मागणीवर ते म्हणाले, मला अधिकृत काहीच माहिती नाही. कुणाच्या गाडीला धक्का लागलाय की लावलाय ते आम्हाला माहिती नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. ते तसंच चालूच राहणार आहे. आम्ही तोडफोडीचं समर्थन करत नाही."
 










Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती