तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली, किंमत शंभरीपार

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (11:29 IST)
नवी मुंबई- तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होत आहे यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले आहेत तर टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात दिसत आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे अशात भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ सामान्यांचा खिसा रिकामा करत आहे.  
 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 592 ट्रक व टेम्पोमधून 2718 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे तर जवळपास 5 लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी चाळीस ते साठ रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर साठ ते शंभर रुपये झाले आहेत.
 
किरकोळ मार्केटमध्ये फरसबी 120 रुपये किलोवर गेली आहे. वाटाणाही किरकोळ मार्केटमध्ये शंभर रुपये किलो दराने विकला जात आहे. गवारचे दर घसरुन तीस ते साठ रुपयांवर आले आहेत. भेंडीचे दरही नियंत्रणात आहे. 
 
तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती