सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (17:04 IST)
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात सोयाबीनचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होता. पण आता नवीन पीक येताच ते 5000 पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने 12 लाख मेट्रिक टन सोयामील आयात करण्याची परवानगी देखील सोयाबीनच्या किमती कमी होण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. या आयातीला महाराष्ट्र सरकारने लेखी निषेध नोंदवला होता.
 
भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना असे वाटते की जर अशी घट कायम राहिली तर पुढे काय होईल? काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर परिस्थिती अशीच राहिली तर या वर्षी सोयाबीन 3000 रुपये प्रति क्विंटल दराने विकावी लागेल. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये आता 7000 रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे.
 
काय म्हणाले शेतकरी नेते?
 
शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. सोयाबीनचे भाव खाली आले असून ते आता 5 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. नवले म्हणाले की, सोयामील निर्यात करण्याच्या निर्णयामुळे नवीन पिकाला भाव मिळत नाही. आपल्या देशात पुरेसे उत्पादन असताना शेतकऱ्यांना हानी पोहोचवण्यासाठी ते आयात का केले गेले? आता परिस्थिती पाहता असे वाटते की, यावर्षी सोयाबीनचे भाव तीन हजार रुपयांनी प्रति क्विंटलने कमी होतील. तर MSP 3950 रुपये प्रति क्विंटल आहे.
 
पेरणीच्या वेळी सोयाबीनचा तुटवडा होता
 
यापूर्वी अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. यासोबतच सोयाबीनच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. गेल्या दोन हंगामातील नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन लक्षणीय घटले होते. यामुळे यंदा पेरणी कमी झाली आहे. बियाण्यांचा तुटवडा पाहता काही कंपन्यांनी सोयाबीन बियाणे जास्त किमतीत विकले होते. पण आता जेव्हा शेतकर्‍यांचे पीक बाजारात येते, तेव्हा दर कमी झाला आहे.
 
ऑगस्टमध्येच महाराष्ट्र सरकारने विरोध केला होता
सोयामील आयातीच्या निर्णयाविरोधात 26 ऑगस्टलाच महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की आयातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या निर्णयानंतर सोयाबीनचे दर 2000 ते 2500 प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती