स्नेहगुणाचा सण 'संक्रांत'

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना ह्या दिवशी तिळगुळ देऊन 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. 
 
जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेंकांना तिळगुळ दिले जाते. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. हा सण हिवाळ्यात येत असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही ह्या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तिळ ही स्निग्धता कायम ठेवण्‍याचे तर गुळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्‍याचे काम करत असतो. या दिवसापासून दिवस हा तिळा- तिळाने मोठा होत जातो, अशी अख्यायीका आहे.
 
भारतीय संस्कृतीतील जवळजवळ सर्वच सण महिलांसाठी पर्वणीच असते. त्यातील एक मकर संक्रांत. सुवासिनी स्त्रिया ह्या दिवशी हळदी‍ कुंकू देण्या घेण्याच्या उद्देशाने गोळा होतात. त्यामुळे जातीधर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला जात असतो. 
 
भारतील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने संक्रांत सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून तरी महाराष्ट्रात नवदांपत्यांना, नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. नाशिक जवळ येवरा येथे यादिवशी पतंगोत्सव साजरा करण्‍याची प्रथा आहे. 
 
पुर्वी काटेरी हलव्याची दागिने घरीच तयार केली जात होती. मात्र ती आजच्या रेडिमेडच्या जमान्यातील बाजारात सहज उपलब्ध होत असतात. आधी हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा प्रामुख्याने ब्राह्मण समाजामध्ये होती. मात्र, आता सर्वच मराठी घरांमध्ये हलव्याच्या दागिन्यांनी हा सण साजरा केला जाताना दिसतो. 
 
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात. 14 जानेवारीला सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे.
 
सूर्य आषाढ महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास प्रारंभ होतो. व पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो मकर संक्रांतीचा दिवस असतो. त्या दिवशी स्नेहाचे प्रतीक म्हणुन तिळगुळ वाटण्यात येतो. मकर संक्रातीच्या कुलाचार तीन दिवसांचा असतो. पाहिल्या संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते. दुसर्‍या दिवशी संक्रांत व तिसरा किंक्रांतीने या सणाचा आनंदाने समारोप होत असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती