बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत निश्चित, अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर
रविवार, 31 मार्च 2024 (11:31 IST)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, ती लढत अखेर जाहीर झाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा झालीय. त्यामुळे बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' अशी लढत होईल.
अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली.
बारामतीमधून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यानंतर या नावाची घोषणा करण्यामागे योगायोग आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील तटकरेंनी म्हटलं की, दोन्ही घोषणांचा काही संबंध नाही. या उमेदवारीबद्दल मागेही एकदा सभेत घोषणा करण्यात आली होती.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाट्याला आलेली परभणीची मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडली आहे. जानकर आता परभणीतून संसदेत जाण्यासाठी महायुतीतर्फे मैदानात उतरणार आहेत.
यापूर्वी अजित पवार गटाने शिरूर आणि रायगडमधील उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात शिरूरमध्ये शिवसेनेमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजी आढळराव पाटील लोकसभेची निवडणूक लढवतील, तर रायगडमधून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचं नाव आधीच जाहीर करण्यात आलं आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही 7 ते 8 जागा मागितल्या आहेत. त्यासंबंधी चर्चा सुरू आहे. आम्ही मागितलेल्या जागीत परभणीची जागा होती. महायुतीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. परंतु पक्षाने निर्णय घेतला की, ही जागा रासपला आमच्या कोट्यातून दिली जावी. त्यामुळे ही जागा महादेव जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून लढवतील.”
सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी 'वेट अँड वॉच' असं उत्तर दिलं
सध्या तरी अजित पवार यांनी तीनच जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांना महायुतीत अजून जागा मिळणार की या तीनच जागांवर समाधान मानावं लागणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
मोशी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या एका मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. अलीकडेच मंचरमध्ये झालेल्या सभेत कोल्हेंनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते.
दुसरीकडे महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार की अजित पवार गटाकडे यासंबंधी चर्चा सुरू होत्या. या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे.
अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता.
2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.