पक्ष, घड्याळ, झेंडा या सगळ््यांची चोरी झाली. किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, हे सगळ््या देशाला माहिती आहे. जे घेऊन गेले त्यांनी मागील निवडणुकीत कोणाच्या नावाने मते मागितली, तर नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने … ज्याचा पक्ष होता, घड्याळ चिन्ह होते, हे सर्व घेऊन काही मंडळी गेली, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. यासोबतच पक्ष आणि चिन्ह गेल्यावर काही लोक नाराज झाले.परंतु मी त्यांना सांगितले की, नाराज व्हायचे नाही. पक्ष चिन्ह गेले असले तरी आपण नव्याने पक्ष उभा करू, असेही पवार म्हणाले.
बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात पवारांनी सत्ताधा-यांवर आसूड ओढले. पवार पुढे म्हणाले की, अनेकांना मी मंत्री केले, अनेकांना आमदार केले, अनेकांना खासदार केले, केंद्रात मंत्री केले. नवनवीन धोरणे राबवली. महिलांसाठी धोरण केले. या देशात महिलांना प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता. तो अधिकार त्यांना दिला. परंतु आताच्या सत्ताधा-यांचा राज्य चालवण्याचा प्रकार देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही, तिथे बदल व्हायला पाहिजे. त्यासाठी आलेली लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, म्हणत पवारांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.