दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा : 'कष्टकऱ्यांचा मतदारसंघ' कुणाच्या पाठीशी उभा राहणार?

शनिवार, 9 मार्च 2024 (16:51 IST)
मुंबई शहर हे संपूर्ण शहरच कष्टकऱ्यांचं असलं तरी आज मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये कष्टकरी जनता स्थिरावलेली दिसते.
 
यात मुख्यत्वे चेंबूर आणि धारावी यांचा समावेश होतो. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.
 
या मतदारसंघात इतर विभागांप्रमाणे मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहाते. या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते.
 
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे.
 
सध्या राजकीय ताकद कुणाची?
जर विधानसभा मतदारसंघानुसार विचार केला तर अणुशक्ती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले. ते या विधानसभेच्या पहिल्या अडीच वर्षांत मंत्रीही होते. ते सध्या अजित पवार गटाच्या बाकांवर बसतात.
 
त्यानंतर चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर विजयी झाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत.
 
धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. सायन कोळीवाडा येथे भाजपाचे कॅ. तमिलसेल्वन विजयी झाले तर वडाळ्यात विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आणि भाजपातर्फे उमेदवार असणारे कालीदास कोळंबकर विजयी झाले.
माहीममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर विधानसभेत गेले ते सध्या शिंदे गटात आहेत. यावरुन मतदारांचा साधारण कौल कोणत्या दिशेला असतो याचा अंदाज येतो.
 
आजवरचा इतिहास काय सांगतो?
1952 पासून या मतदारसंघात अनेक दिग्गजांनी निवडणूक लढवलेली आहे. तसेच अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी संधी दिल्याचं दिसतं. 1952 साली काँग्रेसतर्फे जयश्री रायजी विजयी झाल्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी 'चले जाव' तसंच असहकार आंदोलनात त्या सक्रीय होत्या. त्यानंतर 1957 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे विजयी झाले.
 
1962 साली काँग्रेसचे विठ्ठल गांधी या मतदारसंघातून लोकसभेत गेल्यावर डांगे यांना 1967 साली पुन्हा एकदा संधी मिळाली. 1971 साली काँग्रेसचे अब्दुल कादर सालेभाई विजयी झाले.
 
आणीबाणीनंतर आलेल्या जनता लाटेमध्ये 1977 साली झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीतर्फे बापू कांबळे इथून खासदार म्हणून लोकसभेत गेले तर पुढच्याच निवडणुकीत सत्तांतर होऊन 1980 साली काँग्रेसचे राजाराम रामजी भोळे या मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले.
 
1984 साली काँग्रेसची लाट असूनही या मतदारसंघात गिरण कामगारांचे नेते दत्ता सामंत अपक्ष निवडून आले आणि लोकसभेत गेले, 1989 साली मात्र वामनराव महाडिक यांच्यारुपाने हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. त्यानंतर एक अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहीला आहे.
 
1991, 1996, 1998, 1999, 2004 असं सलग पाचवेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेनेच्या मोहन रावले यांना मिळाली.
 
2009 साली काँग्रेसचे एकनाथ गायकवाड या मतदारसंघात विजयी झाले. मा्त्र 2014 आणि 2019 या सलग दोन निवडणुकांत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव करुन लोकसभेत प्रतिनिधित्व केले. राहुल शेवाळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत.
 
मतदारसंघाचं वैशिष्ट्य
मतदार हेच या मतदारसंघाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जाती असं या मतदारसंघाचं स्वरुप आहे.
 
धारावीमध्ये देशातील दक्षिण आणि उत्तर भागातून मतदार स्थायिक झाले आहेत.
 
समाजातील अनेक आर्थिक स्तरातील लोक या मतदारसंघात राहातात. मुंबईतले अनेक लहानमोठे उद्योग याच मतदारसंघात आहेत.
 
आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी
देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मध्यवर्ती वसलेल्या धारावीला आशिया खंडातील 'सर्वांत मोठी झोपडपट्टी' म्हणूनही ओळखलं जातं.
 
मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास 600 एकरवरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे. धारावीतल्या 60 हजारहून अधिक झोपड्यांमध्ये 10 लाख हून अधिक लोक राहतात. शिवाय, 13 हजारहून अधिक लघु उद्योग धारावीत आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीत धारावीत साधारण कोणत्या जाती धर्मातील लोक काम करतात त्याची माहिती मिळते. आदिद्रविड, नाडर, थेवर या तमिळ, महाराष्ट्रातला चर्मकार समाज, भटक्या-विमुक्तांमधील कोंचिकोरवे ही माकडवाली जमात, उत्तर प्रदेशमधल्या बरेलवी आणि देवबंदी या मुस्लीम पोटजाती, बिहार-पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे मुस्लीम, कर्नाटक गुलबर्ग्याचा गोंधळी समाज (भांडीवाले), राजस्थानचे मारवाडी भाषक, केरळमधून आलेले हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन, हरियाणातली वाल्मिक समाजातील लोकांनी धारावीत गेल्या 136 वर्षांमध्ये स्थलांतर केलं आहे.
 
काही जुन्या सरकारी नोंदींनुसार, कोळी हे धारावीचे मूळ निवासी. पण कालांतराने विविध समुदायाचे लोक धारावीत गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. अनेकांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढ्या आता धारावीत वास्तव्यास आहेत.
 
लेदरची मोठी बाजारपेठ धारावीत आहे. मातीच्या वस्तू हाताने बनवणारा कुंभारवाडा धारावीत वसलेला आहे. जवळपास अडीच हजार घरं या कुंभारवाड्यात आहेत. टेक्स्टाईल, गारमेंट आणि शिलाईचं कामही इथे मोठ्या प्रमाणात आहे. जरीकाम, सजावटीच्या वस्तू, प्लॅस्टीकच्या वस्तू, भंगारचा व्यवसाय अशी शेकडो छोटी-मोठी कामं करणारे लाखो हात धारावीत दिवस-रात्र कार्यरत असतात.
मुंबईत धारावी मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे.
 
अशा या धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता सुरू होत आहे. अदानी समुहाने लिलाव जिंकल्यानंतर आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला सुरूवात होईल.
 
धारावीच्या पुनर्विकासात केवळ झोपड्यांचा पुनर्विकास हाच केवळ कळीचा मुद्दा नाहीय. तर लघु उद्योग, असंघिटत, संघटित कामगार आणि विविध जाती,धर्माचे समुदाय अशा सगळ्यांच्या सहतमीने त्यांना सोबत घेवून हा प्रकल्प राबवण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे.
 
धारावीतलं आरोग्य संकट
धारावीतले लोक किती धोका पत्करून राहत आहेत याची दाहकता कोरोना आरोग्य संकट काळात स्पष्ट दिसली.
 
मुंबईत कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक धारावीत झाला होता. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि लोक आपल्या घरात सुरक्षित राहत असताना धारावीतल्या रहिवाशांकडे मात्र हा पर्याय नव्हता.
 
कारण धारावीत स्वच्छता राखण्यासाठी पुरेशी सोय नव्हती. तसंच विलगीकरणासाठी झोपडीधारकांकडे पुरेशी जागाही नव्हती.
 
धारावीतले 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालय वापरतात, त्यामुळे तिथे 24 तास पाणी, साबण आणि सॅनिटायझरची सोय करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती.
 
संसर्गजन्य आजार धारावीत वेगाने पसरतात. तसंच महिला आणि बालकांना आहारातून पुरेसं पोषण मिळत नसल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचंही आढळतं असं डॉक्टर्स सांगतात. तसंच आधुनिक तंत्रज्ञान आणि सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने त्यामुळेही आजार फोफावतात.
 
धारावीत टीबीचं प्रमाणही लक्षणीय आहे.
 
2024मध्ये कोणते घटक महत्त्वाचे?
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या धारावी महत्त्वाची आहे. कारण धारावीची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे आणि मोठ्या संख्येने अल्पसंख्याक लोक राहत असल्याने राजकीय पक्षांसाठी ती एक गठ्ठा ‘वोटबँक’ आहे असं जाणकार सांगतात.
 
धारावी मुंबई-दक्षिण मध्य या लोकसभा आणि विधानसभा मतदासंघात मोडतो. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेचं प्राबल्य आहे.
 
2009 पासून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या मतदारसंघात तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड याच मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.
 
तर शिवसेनेचे राहुल शेवाळे या मतदारसंघाचे खासदार आहेत.
 
धारावीत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाजवादी पार्टी या पक्षाचे उमेदवारही या भागात स्पर्धेत असतात.
 
2024 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट एकत्र आले आहेत आणि त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा असल्यामुळे या निवडणुकीत कोणाला यश मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती