तज्ज्ञांच्या मते हंता विषाणू हा करोना इतका घातक विषाणू नाही. हा संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेंशन संस्थेनुसार “उंदीर घराच्या आत-बाहेर करत असल्याने हंता विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अगदी ठणठणीत निरोगी व्यक्तीही उंदरांच्या संपर्कात आल्यास त्याला हंता विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.”
हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून तोच हात व्यक्तीच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श झाल्यास हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
हंताची लक्षणे
हंताचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळेत उपचार मिळा नाही तर फुफुसांमध्ये पाणी साचतं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.