'नावात काय आहे?' असे शेक्सपिअर बोलून गेला असला तरी नामामाहात्म्य काही कमी होत नाही. व्यवहारात जिथे विशिष्ट रूप आहे तिथे विशिष्ट नावही आहे, त्याशिवाय व्यवहाराचे काम चालतच नाही. केवळ माणसाच्या जगातच वेगवेगळी नावं ठेवली जातात असे नाही. डॉल्फिनसारखा बुद्धिमान जीवही समाजात वावरत असताना आपल्या मित्र व शत्रूंची ओळख मनात ठेवण्यासाठी त्यांना विशिष्ट संबोधन वापरत असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. पोपट, वटवाघूळ, हत्ती आणि चिम्पांझीसारखे जीव विशिष्ट आवाज काढून हाक मारत असतात. त्यापासून त्यांचा एकमेकांशी संवाद होत असतो. डॉल्फिनमध्येही एक विशिष्ट अशी शीळ घालण्याची पद्धत असते. मात्र, त्याहीपेक्षा त्यांच्या मेंदूत आजूबाजूच्या प्रत्येकाची विशिष्ट नावाने ओळखही असते. याबाबत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील स्टेफनी किंग यांनी संशोधन केले आहे. माणसाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जीवात अशी क्षमता असल्याचे यापूर्वी दिसून आलेले नाही. अगदी दोन जीवांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध असले तरीही असा प्रकार एरव्ही आढळून येत नाही. डॉल्फिनमधील ही विशिष्ट ओळख त्यांच्यामधील विशिष्ट शीळ घालण्याच्या पद्धतीधून येते. ज्यावेळीदोन समूह किंवा दोन डॉल्फिन एकमेकांना भेटतात त्यावेळी ते अशी शिट्टी वाजवतात. ही शिट्टी दुसरा समूह किंवा दुसरा डॉल्फिन लक्षात ठेवतो व नंतर अशी शीळ ऐकल्यावर त्याला संबंधितांची आठवण येते. ही शीळ म्हणजेच विशिष्ट समूह किंवा डॉल्फिनचे नाव असल्यासारखेच कार्य करते.