नागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा

सोमवार, 4 मार्च 2024 (14:35 IST)
नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.
 
नागपूर शहराची स्थापना गोंड राजा बख्त बुलंद याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. नागपूर ही आधी मध्य प्रदेशची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि नागपूरने आपली राजधानीची ओळख गमावली आणि तेव्हापासून ते उपराजधानीचंच शहर म्हणून ओळखलं जातं.
 
नागपूरची लोकसंख्या 46,53,570 इतकी आहे. जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असूनसुद्धा तिथे कायमच काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.
 
2014 मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं. 2014 मध्ये 5,86,857 मतं आणि 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं गडकरींनी दणदणीत विजय मिळवला खरा, पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
इतिहास आणि समीकरण
नागपुरात ओबीसी, एससी, आणि मुस्लीम मतदारांचं वर्चस्व आहे. तेली, कुणबी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात अनुसुया बाई पहिल्यांदा खासदार झाल्या.
 
1956 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. 1962 मध्ये माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
 
1967 मध्ये पुन्हा काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला. तेव्हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीने जोर धरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाहेर गेली..
 
1971 मध्ये विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळवला. 1977 मध्ये ते पराभूत झाले आणि 1980 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. या जागेवर आतापर्यंत काँग्रेसने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर संघाचं मुख्यालय असूनसुद्धा भाजपाने चार वेळा विजय मिळवला आहे.
 
जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला चांगलाच फटका बसला.
 
त्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे इथले ओबीसी नाराज आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करणं हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे.
 
आतापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे. असं असलं तरी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली आहेत.
 
2019 च्या निवडणुकीत अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीतही ‘आप’ च्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती.
 
संघाचं मुख्यालय असूनही इथे कायमच भाजपचा पराभव होत आला आहे. आधीच्या काळात भाजपचे उमेदवार पराभूत व्हायलाच निवडणूक लढायचे अशी वदंता होती.
 
आता मात्र भाजप उमेदवार त्वेषाने निवडणूक लढवतात. काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार न देणं हेही भाजपच्या विजयाचं एक कारण मानलं जातं. निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकीट देतात आणि तेवढ्या वेळात काँग्रेसच्या उमेदवारांना लढत द्यावी लागते. त्यामुळे मतदारसंघ उभा करण्यात त्यांना फारसा वेळ मिळत नाही.
 
'विकासपुरुष' असतानाही समस्यांची जंत्री
2014 पासून नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेतच. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. भारतात रस्तेबांधणीच्या कामात ते कायमच अग्रेसर आहेत.
 
तरी त्याचं प्रतिबिंब नागपूर शहरात दिसत नाही. नागपुरात अनेक नवीन रस्ते तयार झाले आहेत, फ्लायओव्हर तयार झाले आहेत, मेट्रोही जोमात धावते आहे. रस्त्यांचं सिमेंटीकरण होत आहे.
 
असं असलं तरी रस्त्याची समस्या नागपुरात सुटलेली नाही. अनेक अंडरपास बांधले गेले. मात्र नागपुरात येणारा पूर ही एक नवी नागरी समस्या म्हणून उदयाला आली आणि त्यात हे अंडरपास पाण्याखाली गेल्याचं नागपुरकरांनी पाहिलं.
 
सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने शहराची पुरती दैना झाली. मदतकार्य वेगाने झालं तरी नागरिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे.
 
हा पूर नागपूरच्या लोकांच्या असंतोषाचं मुख्य कारण झाला आहे. मिहान या औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या येणार आहेत हे वाक्य ऐकून नागपुरातल्या अनेक तरुण पिढ्या आता चाळिशीकडे गेल्या आहेत. तरी मिहानचा विकास व्हायला तयार नाही. IIM, NLSIU, AIIMS सारख्या संस्था नागपुरात आल्या तरी नोकरीसाठी इथल्या तरुणांना नागपूरच्या बाहेरच जावं लागतं.
 
त्यामुळे नागपूरचा विकास हा खरंच विकास आहे का हाही प्रश्न यानिमित्ताने नागपूरकरांना पडला आहे.
 
काँग्रेसतर्फे उमेदवार कोण?
नितीन गडकरी यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गडकरींची कामगिरी आणि त्यांची प्रतिमा पाहता त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार उभा करणं हे काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे. यावेळी मतदारांना चहा सुद्धा पाजणार नाही ज्यांना मतं द्यायची आहेत त्यांनी द्या असं वक्तव्य एकदा त्यांनी केलं होतं.
 
मतदारसंघात न जाता असं वक्तव्य न करता अशी वक्तव्यं करून निवडणूक जिंकण्याचा धोका पत्करू नये असं जाणकारांना वाटतं. कारण नागपूरच्या मतदारसंघाने अनेकदा धक्के दिले आहेत.
 
नितीन गडकरी हे भाजपच्या सध्याच्या पठडीतले राजकारणी नाहीत. ते पारंपरिक भाजपचे आहेत. ते विरोधकांना मान देतात, त्यांची बूज राखतात. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध आहेत.
 
त्यामुळे विरोधकांनाही त्यांना विरोध करावासा वाटत नाही. 2014 आणि 2019 च्या मतांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसच्या उमेदवारांना इतकीही कमी मतं मिळालेली नाहीत.
 
काँग्रेसचं बोलायचं झालं तर अभिजित वंजारी यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या संदीप जोशींचा पराभव केला होता. ते संयमी आहेत आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे.
 
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हेही भाजपच्या वाटेवर आहेत असंही बोललं जातं. ते जर भाजपमध्ये गेले नाहीत तर त्यांनाही लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
 
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. त्यात अनेक दिग्गजांची नावं जाहीर करण्यात आली आहे पण नितीन गडकरींचे नाही. त्यावरुन तर उद्धव ठाकरे यांनी देखील शरसंधान साधले आहे.
 
नितीन गडकरींना तिकीट दिले जाईल की नाही याबाबत जाणकार शंका व्यक्त करत आहेत.
 
महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित सांगतात की राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये भाजपने दिलेलं धक्कातंत्र पाहता नागपूरच्या जागेचं गडकरींना तिकीट मिळेल की नाही अशी शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त होते आहे.
 
मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापताच विधानसभेच्या दहा-बारा जागा बाधित होत असतील तर लोकसभेच्या लढाईत कामात वाघ असलेल्या गडकरींची लोकप्रियता “अंगावर घेण्याची” रिस्क पक्षश्रेष्ठी घेतील असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया अपराजित यांनी दिली.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती