गगनयान मोहीम: निवडलेले 4 पायलट कोण आहेत? यासाठी किती खर्च? सर्व प्रश्नांची उत्तरं

बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (12:10 IST)
भारत सरकारनं मंगळवारी (27 फेब्रुवारी) गगनयान मोहिमे अंतर्गत अंतराळात भारताच्या पहिल्या उड्डाणासाठी निवडलेल्या हवाई दलाच्या चार वैमानिकांची नावं जाहीर केली.
या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल, त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परतावं लागेल.
 
भारताची अंतराळ संस्था इस्रो या मोहिमेच्या तयारीसाठी सतत चाचण्या घेत आहे.
 
रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास क्रू सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो, असं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या चाचणीत समोर आलं.
 
चार पायलट कोण आहेत?
इस्रोच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये एक टेस्ट फ्लाईट रोबोटला अंतराळात घेऊन जाईल. यानंतर 2025 मध्ये अंतराळवीरांना अंतराळात नेलं जाईल.
 
तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या केंद्रात आयोजित कार्यक्रमात या चार अंतराळवीरांची देशाला ओळख करून देण्यात आली.
 
भारतीय हवाई दलातून निवड झालेल्या या चार अधिकाऱ्यांची नावे आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यांच्या गणवेशावर सोनेरी पंख असलेला बिल्ला लावला आणि त्यांना 'भारताचा अभिमान' असं म्हटलं.
 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ही फक्त चार नावं किंवा चार लोक नाहीत. 140 कोटी आकांक्षा अवकाशात घेऊन जाणाऱ्या या शक्ती आहेत. 40 वर्षांनंतर भारतीय अंतराळात जाणार आहेत. यावेळी वेळही आमची आहे, काऊंटडाऊनही आमचं आहे आणि रॉकेटही आमचं आहे." 
 
अंतराळवीरांची निवड कशी झाली?
या अधिकाऱ्यांची हवाई दलातील वैमानिकांच्या मोठ्या गटातून निवड करण्यात आली आहे. त्यांना कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्यांमधून जावं लागलं.
 
या अधिकाऱ्यांनी रशियात 13 महिने कठोर प्रशिक्षण घेतलं आणि आता ते भारतातही तेच प्रशिक्षण सुरू ठेवत आहेत. 
 
या कार्यक्रमादरम्यान, एक व्हीडिओ जारी करण्यात आला ज्यामध्ये हे अधिकारी जिममध्ये व्यायाम करताना तसंच पोहताना-योगासने करताना दिसत आहेत.
इस्रोनं मंगळवारी 'व्योम-मित्रा'ची झलकही दाखवली. व्योम-मित्र हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ अंतराळाचा मित्र आहे. हा एक रोबोट आहे जो या वर्षी अवकाशात पाठवला जाणार आहे.
 
गगनयान मिशन हे अंतराळातील भारताचं पहिलं मानवी उड्डाण आहे आणि त्यासाठी इस्रोच्या केंद्रात बरीच तयारी सुरू आहे. 
 
किती खर्च येईल?
या प्रकल्पावर एकूण 90 अब्ज रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात भारताला यश आल्यास मानवाला अवकाशात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.
 
याआधी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीननं मानवाला अवकाशात पाठवण्यात यश मिळवलं आहे. गेल्या वर्षी भारतानं अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात नवं यश संपादन केलं. 
 
ऑगस्ट 2023 मध्ये, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनला. काही आठवड्यांनंतर, इस्रोनं भारताचं आदित्य-L1 सूर्याच्या दिशेनं पाठवलं. सध्या ते त्याच्या कक्षेत असून  सूर्याचं निरीक्षण करत आहे.
 
या सर्व मोहिमांसह, भारतानं पुढील काही दशकांसाठी बहुप्रतीक्षित घोषणाही केल्या आहेत.
 
2035 पर्यंत पहिलं अंतराळ स्थानक स्थापन करण्यात येईल आणि 2040 पर्यंत आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात यश येईल, असंही भारतानं म्हटलंय.
 
कोणी काय म्हटलं?
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी हवाई दलाच्या वैमानिकांचे अभिनंदन केलं आहे.
 
त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिलंय की, "आपल्या पहिल्या अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयानसाठी निवडल्याबद्दल हवाई दलाच्या वैमानिकांचं खूप खूप अभिनंदन."
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही हा प्रसंग भारतासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.
 
त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये पंतप्रधान मोदी या ऑपरेशनसाठी निवडलेल्या हवाई दलाच्या वैमानिकांना भेटताना दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, "भारत अवकाश क्षेत्रात आघाडीची भूमिका बजावण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळे आज हे शक्य झालं आहे."
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ओळींचा पुनरुच्चार करताना लिहिलंय की, "ही वेळ आमची आहे, काउंटडाऊनही आमचंच आहे आणि रॉकेटही आमचंच आहे."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती