ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

मंगळवार, 23 एप्रिल 2019 (17:25 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादीने याबाबत शंका उपस्थिती केली आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे मत व्यक्त केले. मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
 
पवार यांनी मुंबई इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते. ईव्हीएम मशीनसंदर्भात बोलताना म्हणाले, “प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. प्राप्तिकर विभागाद्वारे भाजपाविरोधकांच्या घरावर छापे टाकले जात आहे. आम्हाला ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे याचा परिणाम मतांवरही दिसू शकतो” अशी शंका व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती