२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले. मात्र सत्तेत आल्यापासून तर आजपर्यंत मोदींनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ एरंडोल येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्य प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. पवार यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. राफेल प्रकरण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा प्रश्नांवरुन त्यांनी मोदींना चांगलेच धारेवर धरले.
शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, अन्न खाणाऱ्यांचा विचार आमच्या मनात आहेच, पण अन्न पिकवणाऱ्याच्या धान्याला योग्य भाव मिळाला नाही तर परदेशातून धान्य आणावे लागेल असा टोला त्यांनी मोदींना लगावला. राफेल कोणाच्या फायद्यासाठी आणले, याचा पैसा कुठे गेला? असा प्रश्न त्यांनी विचारताच उपस्थितांमधून ‘चौकीदार ही चोर’ च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर, डॉ.उल्हास पाटील, आमदार सतिश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, जिल्हाकार्याध्यक्ष विलास पाटील, प्रवक्ते योगेश देसले, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागूल यांच्यासह माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.