‘नमो टीव्ही चॅनल आलं तरी कुठून?’ निवडणुकांच्या तोंडावर ट्विटरवर गोंधळ

गेल्या काही दिवसांपासून देशात निवडणूक आयोगापासून ते राजकीय पक्ष आणि मीडियामध्ये एक गोष्टीची भलतीच चर्चा आहे - हे 'नमो टीव्ही' चॅनल नक्की आलं कुठून? त्याचा मालक कोण? ते कुठून चालवलं जातं आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे चॅनल कसं काय लाँच झालं?
 
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही 'नमो टीव्ही' लाँच झाल्यामुळे निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे बुधवारी स्पष्टीकरण मागितलं. याआधी याच आठवड्यात आम आदमी पक्षाने कथितरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या या चॅनलविरोधात तक्रार केली होती.
 
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कुणा एका पक्षाला 24 तास चालणार चॅनल सुरू करायची परवानगी कशी मिळू शकते, असा सवाल आपने उपस्थित केला होता. या चॅनलवर प्रसिद्ध होणाऱ्या कंटेटकडे कोण लक्ष ठेवणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
 
काँग्रेसनेही या चॅनलविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.
 
डायरेक्ट-टू-होम किंवा DTH सेवा देणाऱ्या टाटा स्कायवर हे चॅनल स्वतःच दिसू लागल्याने आधी प्रेषकांमध्येही गोंधळ उडाला. लोकांनी "आमच्या इच्छेविरुद्ध, आम्ही न मागता हे चॅनल आमच्यावर का थोपवलं जात आहे," अशा आशयाच्या तक्रारी ट्विटरवर केल्या.
 
याविषयी टाटा स्कायने 29 मार्चला केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं की 'चॅनल 512 वर येणारं नमो टीव्ही एक हिंदी न्यूज चॅनल आहे आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या देतं."
 
एका ग्राहकाच्या ट्वीटला उत्तर देताना टाटा स्कायने म्हटलं होतं की, "लाँच ऑफर असल्यामुळे या चॅनलची सेवा सगळ्या ग्राहकांना दिली जात आहे आणि याला काढून टाकायचं काही पर्याय नाही."
 
पण नंतर ते ट्वीट डिलीट करण्यात आलं. यानंतर त्यांनी यु-टर्न घेत 'हिंदी न्यूज सेवा' नाहीये, असं सांगितलं. "ही एक खास सुविधा आहे, जी इंटरनेटव्दारे मिळवता येऊ शकते आणि याच्या प्रसारणासाठी लायसन्सची गरज नाहीये," असं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं.
 
वरवर पाहाता हे चॅनल भाजपचंच वाटतं, पण अजून भाजपने या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
 
शुक्रवारी सकाळी ABP वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आलेल्या एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "काही लोक आहेत, जे (हे चॅनल चालवण्याचं) काम करत आहेत. मीसुद्धा अजूनपर्यंत ते पाहू शकलेलो नाहीये."
 
NDTVने दिलेल्या एका बातमीनुसार एका प्रश्नाचं उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, "संबधित अधिकारी याचं उत्तर देतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच निवडणूक आयोग यांना याविषयी बोलू द्या. आम्ही यात पडणं योग्य नाही."
 
नमो टीव्हीच्या साईटवर प्रायव्हसीशी संबंधित एक पेज आहे ज्यात 22 डिसेंबर 2017 ची तारीख दिली आहे.
 
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीनुसार 31 मार्च 2019 पर्यंत देशात एकूण 901 टीव्ही चॅनल काम करत आहेत. या यादीत नमो टीव्हीचं नाव कुठेही नाही.
 
याव्यतिरिक्त संचार उपग्रह लिंकसॅटव्दारे मिळणाऱ्या DTH सेवांच्या यादीतही 'नमो टीव्ही'चं नाव नाही आहे. मंत्रालायच्या वेबसाईटच्या एका यादीमध्ये त्या 31 चॅनल्सचं नाव आहे, ज्यांना 31 जानेवारी 2019 ला परवानगी मिळाली होती. यातही 'नमो टीव्ही'चं नाव नाही आहे.
 
नमो टीव्हीवर काय दिसतं?
नमो टीव्हीला कंटेट टीव्ही म्हणूनही ओळखलं जातं. या चॅनलच्या वेबसाईटवर सरळ सरळ लिहिलं आहे की या चॅनलवर नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांचं लाईव्ह प्रसारण, त्यांच्याशी संबंधित बातम्या आणि त्यांची भाषणं दाखवण्यासाठी आहे.
 
या चॅनलच्या लोगोमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो आहे आणि हे चॅनल टाटा स्काय, डिश टीव्ही आणि अशा DTH अनेक प्लॅटफॉर्म्सवर पाहता येतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती