मुख्य लढत : कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
कांचन यांचे पती राहुल कुल हे याच मतदारसंघातील दौंडचे आमदार आहेत. कांचन यांच्या सासूबाई आणि सासरेदेखील आमदार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या त्या जवळच्या नातेवाईक आहेत. खडकवासलाचे भाजप आमदार भीमराव तापकीर आणि शिवसेनेचे विजय शिवतारे (राज्यमंत्री) यांनी आपली ताकद कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे. सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे या भागातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेस आमदार संग्राम अनंतराव थोपटे हेही सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे आहेत.सुप्रिया यांचे बंधू अजित पवार बारामतीचे आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.