इम्रान खान यांना अटक करायला पोहोचले पोलीस, इम्रान म्हणतात...

मंगळवार, 14 मार्च 2023 (23:55 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान पोलीस लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. पोलीस आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यावर संघर्ष देखील पाहायला मिळाला.
 
घटनास्थळी उपस्थित असलेल्या बीबीसी प्रतिनिधींनी सांगितले आहे की डीआयजी इस्लामाबादसह अनेक पोलीस कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
 
इम्रान खान यांच्याविरोधातील अजामिनपात्र अटकेचं वॉरंट रद्द व्हावं यासाठी केलेली याचिका इस्लामाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. यावर उद्या सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायाधीशांनी निश्चित केलं आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी तरहब असगर यांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यामध्ये काही कार्यकर्ते देखील जखमी झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील असल्याचे असगर यांनी सांगितले.
 
सध्या वातावरण तणावपूर्ण आहे. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या पोलीस त्यांच्या घराजवळच्या गल्लीत घुसली आहे. याआधी पोलीस इम्रान खान यांच्या निवासस्थानी इतक्या जवळ पोहोचू शकली नव्हती.
 
दरम्यान इम्रान खान यांनी सोशल मीडियावर आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे. अटकेनंतरही हा संघर्ष सुरूच राहील असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, "पोलीस मला तुरुंगात टाकण्यासाठी आली आहे. त्यांना असं वाटतं की इम्रान खानला तुरुंगात टाकलं तर समुदाय झोपी जाईल. तुम्ही या लोकांना चुकीचं ठरवा, तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुम्ही एक जिवंत समुदाय आहात. तुम्ही मोहम्मद मुस्तफा यांचे अनुयायी आहात आणि आपला समुदाय इलाहा इलल्लाह या नाऱ्यावर बनलेला आहे. "
 
"तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी संघर्ष करा, बाहेर पडा. इम्रान खानला अल्लाहने सर्वकाही दिलं आहे. ही लढाई मी तुमच्यासाठी लढत आहे. माझं सारं आयुष्य लढण्यात गेलंय आणि पुढे देखील लढत राहील. पण जर मला पुढे काही झालं माझा तुरुंगात मृत्यू झाला तर तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की इम्रान खान विना देखील हा समुदाय लढत राहील. आणि केवळ एकाधिकाराने निर्णय घेणाऱ्या या चोरांची गुलामी सहन केली नाही जाणार हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे." असं इम्रान यांनी आपल्या निवेदनात म्हटलं.
 
काय आहे प्रकरण?
इस्लामाबाद येथील कोर्टात तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. ते घेऊन इस्लामाबाद आणि लाहोर पोलिसांची टीम इम्रान खान यांच्या निवसस्थानी पोहोचली. त्यांच्या जमान पार्क येथील घराबाहेर मोठ्या संख्येत पोलीस तैनात आहेत.
 
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने( पीटीआयने) निवेदनात म्हटले आहे की इम्रान खान यांचा कुठल्याच प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, तरी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
इम्रान खान यांच्या विरोधात 80 हून अधिक प्रकरणं दाखल झाली आहेत, त्यापैकी चार प्रकरणात ते स्वतः न्यायालयात हजर झाले होते.
 
इम्रान खान हे लाहोरच्या जमान पार्क या भागात राहतात. या भागात पोलिसांव्यतिरिक्त कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
 
पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे की पोलिसांच्या टीमने चारबी बाजूने जमान पार्कला गराडा घातला आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती