सोमवारी रात्री उशिरा उत्तर-पश्चिम तुर्कीमध्ये असलेल्या स्की रिसॉर्ट हॉटेलला आग लागल्याने 66 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले. दूरचित्रवाणीवर दाखवलेल्या आगीच्या व्हिज्युअलमध्ये हॉटेलच्या छताला आणि वरच्या मजल्यांना आग लागली होती. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलांच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रिसॉर्टमध्ये गर्दी होती. हॉटेलमध्ये 234 पाहुणे थांबले होते. हे रिसॉर्ट खडकाळ टेकडीवर बांधले आहे, त्यामुळे अग्निशमन दलाला तिथे पोहोचणे कठीण आहे. गार्डियन वृत्तपत्रातील वृत्तानुसार, तिथे राहणाऱ्या लोकांनी सांगितले की 161खोल्यांच्या हॉटेलचे स्मोक अलार्म काम करत नव्हते.
आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी चादरीचा वापर केला, तर काहींनी छतावरून उड्याही मारल्या. छतावरून उडी मारल्याने 2 जणांचा मृत्यू झाला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीचे कारण तपासले जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30 ट्रक आणि 28 रुग्णावहिकांना पाठवण्यात आले आहे.