पाकिस्तानी मॉडेल म्हणते, 'हमारा कल्चर, हमारा मियाँ...'

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:39 IST)
पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सदफ कंवल ही स्त्रीवादावर केलेल्या भाष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. पाकिस्तानात सोशल मीडियावर सदफ कंवलच्या बाजूने आणि विरोधात मोठ्या प्रमाणात मतं मांडताना दिसतायेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात #OurHusbandOurCulture ट्रेंड होताना दिसतोय.
 
ARY या पाकिस्तानी चॅनेलवर अँकरनं सदफला विचारलं की, स्त्रीवादावर तुझे विचार काय आहेत? पाकिस्तानातील महिला पीडित आहेत?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना सदफ म्हणाली, "महिला अजिबात पीडित नाहीत. महिला कणखर आहेत आणि मी स्वत:ही खूप कणखर आहे. किंबहुना, तुम्हीही कणखरच असाल. महिला 'बिचारी' नाहीये. महिलांवरील चर्चा पूर्णपणे वेगळी होईल. आपली संस्कृती काय आहे, पती आहे. मी लग्न केलंय. मला त्याच्या चपला पण उचलायच्या आहेत, त्याचे कपडेही इस्त्री करायचे आहेत, जे मी खरंतर करत नाही."
 
"मात्र, मला माहित असायला हवं की, माझ्या पतीचे कपडे कुठे आहेत. मला माहित असायला हवं की, माझ्या पतीची कुठली गोष्ट कुठे आहे. त्याला काय खायचंय, हेही मला माहित असायला हवं. कारण मी त्याची पत्नी आहे. कारण मी एक महिला आहे. त्यामुळे माझ्याबद्दल त्याला जास्त माहिती असायला नको, तर त्याची मला अधिक माहिती असायला हवी."
 
सदफ पुढे म्हणाली, "मी हेच पाहत मोठी झालीय. हल्ली खूप लिबरल्स आलेत. मला वाटतं की, स्त्रीवादात स्वत:च्या पतीची काळजी घ्यावी, आदर करावा आणि जे शक्य आहे ते करावं."
 
पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सदफच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोक विचारतायेत की, सदफला नक्की म्हणायचं काय आहे?
 
काही लोक असंही म्हणतायेत की, भारतातील महिला आणि पुरुषांची हॉकी टीम टोकियो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली असताना, आपल्याकडे काय होतंय तर 'आपली संस्कृती, आपला पती' ट्रेंड होतंय. पाकिस्तानी पत्रकार शिराज हसन यांनी यांनी हे मत ट्विटरवरून व्यक्त केलंय.
 

Indian men and women hockey teams reached semi finals of #Tokyo2020
Meanwhile in Pakistan: ‘Our husband is our Culture’ is trending.

— Shiraz Hassan (@ShirazHassan) August 2, 2021
लाहोरमधील वकील रीमा उमर यांनी सदफचा व्हीडिओ ट्वीट करून लिहिलंय, "हल्ली खूप लिबरल्स आलेत." यावर शाहरूख वानी नामक व्यक्तीनं लिहिलंय, "अशी संस्कृती जिथे पत्नी तिच्या पतीची काळजी एखाद्या लहान मुलासारखी घेते."
 
काही ट्विटर युजर्सनं विचारलंय की, पुरुषाला कामवाली हवी की पत्नी? अब्दुल्ला इमरान यांनी लहान मुलाच्या इमोजीच्या फोटोसह लिहिलंय, "सर्व पुरुष सदफ कंवलच्या मताशी समहत आहेत की, लग्नाचा अर्थ कामवाली घरात आणणं होय."
 
सोहेब नामक युजरनं लिहिलंय, "सदफ कंवल, तुमच्या पतीची नोकर बनून तुम्ही खुश आहात. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण मला नाही वाटत की, माझी मुलीने अशाप्रकारे विचार करावं."
 
पाकिस्तानी कॉमेडियन अली गुल पीर यांनी सदफच्या मुलाखतीचा ऑडिओ वापरून विनोदी व्हीडिओ तयार केलाय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
 
तर काही लोकांनी सदफचं समर्थनही केलंय. राना गुफरान नामक युजरनं लिहिलंय, "यात अडचण काय आहे? ती या उपखंडाच्या संस्कृतीबद्दल सांगतेय आणि तिचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. ज्या प्रकारे सदफची टर उडवली जातेय, त्यावरून लक्षात येतं की, लोकांना पुरुषांच्या अधिकारांप्रती काहीच आवडत नाही."
या मुलाखतीत सदफचे पती शहरोज सुद्धा होते.
 
शहरोज यांनी म्हटलंय, "महिला जे करू शकतात, ते पुरुषही करू शकत नाहीत. दोघांनाही आपापली जागा समजली पाहिजे. अल्लाहने दोघांनाही वेगवेगळी भूमिका दिलीय. जर असं नसतं, तर अल्लाहने दोघांना वेगवेगळं बनवलंच नसतं. महिला आणि पुरुष वेगवेगळा विचार करतात. जर दोघांनीही एकमेकांचा आदर केला, तर तीच समानता असेल."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती