मागील तीन वर्षांच्या कालावधीत ग्रीक तटरक्षक दलामुळे भूमध्य समुद्रात अनेक स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. ग्रीक तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांनी नऊ स्थलांतरितांना जाणीवपूर्वक समुद्रात फेकल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे.
बीबीसीने केलेल्या तपासात अशी माहिती आढळली की 40 जण प्रवास करत होते. त्यापैकी 9 जणांना कोस्ट गार्डने समुद्रात फेकले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
ग्रीक तटरक्षक दलाने हे आरोप फेटाळले आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की 'हे आरोप बेकायदेशीर असून आम्ही हे आरोप ठामपणे नाकारतो.'
बीबीसीने त्यांना एका माजी वरिष्ठ ग्रीक कोस्ट गार्ड अधिकाऱ्याचे फुटेज दाखवले. त्यात फुटेजमध्ये असं दिसत होतं की कोस्ट गार्डने 12 लोकांना आधी बोटीवर बसवले आणि नंतर एका छोट्या होडीत सोडले.
मुलाखत सुरू असताना हे अधिकारी खुर्चीवरुन उठले, त्या वेळी त्यांचा माइक सुरू होता. यात ते म्हणाले अर्थातच ही घटना बेकायदा आहे आणि हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे.
ग्रीक सरकारवर लोकांना जबरदस्तीने समुद्रात फेकल्याचा आरोप केला जात आहे. ते तुर्कस्तानातून येणाऱ्या लोकांना आपल्या हद्दीतून बाहेर काढतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे.
ग्रीक तटरक्षक दलाच्या कृत्यांमुळे झालेल्या मृत्यूंसह बीबीसीने प्रथमच अशा घटनांची संख्या नोंदवली आहे.
'ग्रीक अधिकाऱ्यांनी समुद्रात फेकले'
बीबीसीने मे 2022-23 दरम्यान 15 घटनांचे विश्लेषण केले. त्यात 43 जणांचा मृत्यू झाल्याचे आढळले. प्राथमिक स्रोत प्रामुख्याने स्थानिक माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि तुर्की तटरक्षक दल आहेत.
अशा घटनांची तपासणी करणं अत्यंत अवघड आहे, कारण साक्षीदार अनेकदा बेपत्ता होतात किंवा बोलण्यास घाबरतात. परंतु बीबीसीने साक्षीदारांशी बोलून यापैकी चार प्रकरणांची पुष्टी केली.
आमचे संशोधन बीबीसीच्या नवीन माहितीपट 'डेड काम: किलिंग इन द मेड?' मध्ये दाखवण्यात आले आहे.
पाच घटनांमध्ये, स्थलांतरितांनी सांगितले की त्यांना ग्रीक अधिकाऱ्यांनी थेट समुद्रात फेकले.
त्यापैकी चार जण ग्रीक बेटांवर कसे पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना कसं पकडण्यात आलं हेही त्यांनी सांगितलं. इतर अनेक घटनांमध्ये स्थलांतरितांनी सांगितलं की, त्यांना मोटार नसलेल्या, तराफ्यांमध्ये बसवण्यात आलं. हे तराफे नंतर पंक्चर झाल्यासारखे वाटले.
सर्वांत भयानक घटना कॅमेरूनमधील एका व्यक्तीने सांगितली.
तो म्हणाला की सप्टेंबर 2021 मध्ये तो सामोस बेटावर उतरल्यानंतर ग्रीक अधिकारी त्याच्या मागावर गेले.
या माणसाला ग्रीकच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात निर्वासित म्हणून नोंदणी करायची असल्याचे त्याने सांगितले.
त्याने पुढे सांगितलं, "आम्ही कसंबसं बेटावर पोहोचलो आणि लगेच पोलीस आले. दोन पोलीस कर्मचारी काळ्या पोशाखात होते आणि इतर तीन जण साध्या पोशाखात होते."
त्यांनी मास्क घातलेले होते. फक्त त्यांचे डोळे दिसत होते. त्यानंतर कॅमेरून आणि आयव्हरी कोस्टमधील व्यक्ती आणि इतर दोन पुरुषांना ग्रीक कोस्टगार्ड बोटमध्ये बसविण्यात आलं.
आयव्हरी कोस्टचा माणूस म्हणाला, "कोस्टगार्ड्सनी दुसऱ्या कॅमेरोनियनपासून सुरुवात केली. त्यांनी त्याला पाण्यात फेकले. तो म्हणत होता, मला वाचवा, मला मरायचं नाहीये. शेवटी शेवटी फक्त त्याचा हात पाण्याबाहेर होता, शरीर पाण्याखाली होतं. हळूहळू त्याचा हातही पाण्यात गेला आणि तो पाण्यात बुडून गेला."
पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचेही एका साक्षीदाराने सांगितले
"त्यांनी त्याच्या डोक्यात अनेक वेळा ठोसे मारले. ते एखाद्या प्राण्याला बुक्की मारत असल्यासारखं वाटत होतं. नंतर त्यालाही लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात टाकण्यात आलं. तो पोहत किनाऱ्यावर पोहोचला पण सिदी केटा आणि डिडिएर मार्शल कोमो नाना या दोघांचे मृतदेह तुर्कीच्या किनाऱ्यावर सापडले," असं पुढे त्यांनी सांगितलं.
ग्रीक अधिकाऱ्यांवर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी बचावलेल्यांचे वकील करत आहेत.
जून 2023 मध्ये, प्रवाशांनी भरलेली ट्रॉलर बोट ग्रीक किनाऱ्याच्या रक्षक दलाच्या गस्ती नौकेसमोर उलटली. या दुर्घटनेत 600 पेक्षा जास्त पुरुष, महिला आणि मुले मृत्युमुखी पडले. पण या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची आहे?
सोमालियातील आणखी एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, तो मार्च 2021 मध्ये चिओस बेटावर आला तेव्हा त्याला ग्रीक सैन्याने पकडलं आणि नंतर त्याला ग्रीक तटरक्षकांच्या ताब्यात दिलं.
तो म्हणाला की, कोस्ट गार्डने त्याला पाण्यात टाकण्यापूर्वी त्याचे हात पाठीमागे बांधले. त्यांनी मला समुद्राच्या मध्यभागी फेकून दिले. त्यांना मी मरावं असं वाटत होतं.
त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचा एक हात सुटण्यापूर्वी तो त्याच्या पाठीवर तरंगण्यात यशस्वी झाला. त्याच्या गटातील तीन लोकांचा मृत्यू झाला. आमचा मुलाखतकर्ता अखेरीस घटनास्थळी पोहोचला आणि तुर्कीच्या तटरक्षकांनी त्याला पाहिले.
सप्टेंबर 2022 मध्ये सर्वांत जीवघेणी घटना घडली. 85 स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट रोड्स ग्रीक बेटाजवळ घसरली.
सीरियातील मोहम्मदने आम्हाला सांगितलं की त्याने ग्रीक तटरक्षकांकडून मदत मागितली आणि ग्रीक तटरक्षकांनी त्याला परत तुर्कीच्या दिशेने जाणाऱ्या तराफ्यात पाठवून दिलं. मोहम्मदच्या म्हणण्यानुसार, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुरवलेल्या तराफ्याची झडप नीट बंद नव्हती.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही लगेच बुडू लागलो. ते आम्हाला पाहू शकत होते, त्यांनी आम्हा सर्वांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. तरीही त्यांनी आम्हाला तसंच सोडलं."
"माझ्या चुलत भावाचा मुलगा आधी जीव गेला, नंतर दुसरा मुलगाही गेला. मग माझा चुलत भाऊ स्वतः गायब झाला. सकाळपर्यंत सात-आठ मुलं मेली होती."
ग्रीक कायद्यानुसार आश्रय शोधणाऱ्या सर्व स्थलांतरितांना काही बेटांवरील नोंदणी केंद्रांवर त्यांचं नाव नोंदवण्याची परवानगी आहे.
आम्ही ज्या लोकांची मुलाखत घेतली त्यांच्याशी स्थलांतर मदत संस्थेच्या मदतीने संपर्क साधला होता. या केंद्रांवर पोहोचण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
अटक करणाऱ्या लोकांनी त्यांचा गणवेश परिधान केलेला नव्हता, त्यांचे चेहरे झाकलेले होते.
युरोपमध्ये आश्रय मागणारे हजारो लोक बेकायदेशीरपणे ग्रीसमधून तुर्कीला परतले असल्याचा आरोप मानवाधिकार गटांनी केला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय आणि युरोपियन युनियन कायद्यानुसार आश्रय घेण्याचा अधिकार देण्यात आला नाही.
ऑस्ट्रियन मानवाधिकार कार्यकर्ते फयाद मुल्ला यांनी आम्हाला सांगितलं की अशा प्रकारची कामं गुप्तपणे चालवली जातात.
ज्या ठिकाणी लोकांना जबरदस्तीने परत आणलं जात आहे त्या दिशेने मुल्ला जात असताना त्यांना एका टोपी मास्क घातलेल्या व्यक्तीने थांबवलं.
तो माणूस नंतर पोलिसांसाठी काम करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुल्ला यांच्या गाडीचे डॅशकॅम फुटेज हटवण्याचा प्रयत्न केला.
पण पुढील कारवाई झाली नाही.
स्त्रिया आणि लहान मुलांसह एका गटाला व्हॅनच्या मागून खाली उतरवण्यात आलं आणि जेटीवर असलेल्या छोट्या बोटीत बसविण्यात आले.
त्यानंतर त्यांना ग्रीक कोस्ट गार्ड जहाजातून समुद्रात नेण्यात आले. नंतर त्यांना तराफ्यावर बसवून सोडून देण्यात आलं. त्यानंतर तुर्कीच्या तटरक्षकांनी त्यांची सुटका केली.
मुलाखतीदरम्यान आम्ही ते फुटेज ग्रीक कोस्टगार्डच्या ऑपरेशन हेडला दाखवले. पण त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. आमच्याशी केलेल्या मागील संभाषणात ग्रीक कोस्टगार्डने बेकायदेशीर कृत्य केल्याचं त्यांनी नाकारलं होतं.
पण ब्रेक दरम्यान, ऑफ-कॅमेरा असताना त्यांनी ग्रीकमध्ये बाहेरच्या एका व्यक्तीशी बोलताना असं म्हटलं आहे की, "मी त्यांना फारसं सांगितलं नाही. ते अगदी स्पष्ट आहे ना? ते काही अणुशास्त्र नाहीये. त्यांनी हे उघडपणे का केलं हे मला समजत नाही. हे उघडपणे बेकायदेशीर आहे... तो आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे."
ग्रीसच्या सागरी व्यवहार आणि इन्सुलर धोरण मंत्रालयाने बीबीसीला सांगितले की, सध्या देशाच्या स्वतंत्र राष्ट्रीय पारदर्शकता प्राधिकरणाद्वारे फुटेजची तपासणी केली जात आहे.
आम्ही सामोस बेटावरील एका शोध पत्रकाराशी बोललो. या महिला पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ग्रीक स्पेशल फोर्सच्या सदस्यासोबत डेटिंग ॲप्लिकेशन टिंडरच्या माध्यमातून चॅटिंग केले.
त्या महिला पत्रकाराने त्या व्यक्तीला त्याच्या कामाबद्दल प्रश्न केला. जेव्हा त्याच्या सैन्याने निर्वासितांची बोट पाहिली तेव्हा काय केलं हेही विचारलं.
तो व्यक्ती म्हणाला की, अशा लोकांना "परत पाठवले" जात आहे आणि तसा आदेश मंत्र्यांनी दिला आहे. ही बोट जर पुढे आली तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते.
लोकांना जबरदस्तीने परत पाठवलं जात असल्याचे आरोप ग्रीसने नेहमीच नाकारले आहेत.
ग्रीस हे अनेक स्थलांतरितांसाठी युरोपचे प्रवेशद्वार आहे. गेल्या वर्षी समुद्रमार्गे 2 लाख 63 हजार 48 लोक आले होते. त्यापैकी 41 हजार 561 ग्रीसने स्वीकारले. स्थलांतरित आणि निर्वासितांना ग्रीसमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी तुर्कीने 2016 मध्ये युरोपियन युनियनशी करार केला, परंतु 2020 नंतर ते या कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आम्ही आमच्या तपासणीचे निष्कर्ष ग्रीक कोस्टगार्डला सादर केले. ते म्हणाले की त्यांचे कर्मचारी अत्यंत कार्यक्षमतेने, उत्तरदायित्व आणि मानवी जीवन आणि मूलभूत अधिकारांचा आदर समोर ठेऊन काम करतात. ते आंतरराष्ट्रीय नियमांचे पूर्णपणे पालन करतात.
ते पुढे म्हणाले, "हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 2025 ते 2024 पर्यंत हेलेनिक कोस्टगार्डने 6 हजार 161 घटनांमध्ये 2 लाख 50 हजार 834 निर्वासित, स्थलांतरितांची सुटका केली आहे. या उदात्त मिशनच्या निर्दोष अंमलबजावणीला आंतरराष्ट्रीय समुदायाने सकारात्मकतेने मान्यता दिली आहे."
भूमध्य समुद्रातील सर्वात मोठे स्थलांतरित जहाज बुडवण्याच्या भूमिकेबद्दल ग्रीक तटरक्षक दलावर टीका होत आहे. एड्रियाना बुडल्यामुळे ग्रीसच्या सीमांकित बचाव क्षेत्रात 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. ग्रीक अधिकाऱ्यांनी बोट कोणत्याही अडचणीत नसल्याचं सांगितलं. ती सुरक्षितपणे इटलीला जात होती. त्यामुळे तटरक्षक दलाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.