सिंथेटिक ओपियॉइड्स : अमेरिकेलाही वाटतं, 'या ड्रग्जशी आपण एकट्याने लढू शकत नाही'

रविवार, 16 जून 2024 (14:02 IST)
मार्च 2024 मध्ये व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थांसबंधी आयोगाची बैठक झाली.
तिला संबोधित करताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी माहिती दिली की, अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयाच्या लोकांमध्ये मृत्यूचं एक मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्ज किंवा ओपियॉईड्स.
 
अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, 2022 या वर्षात सिंथेटिक ड्रग्स च्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला.
 
लॅबमध्ये तयार केल्या जाणाऱ्या सिंथेटिक ओपियोइड्सच्या नशेपासून सुटका मिळवणं कठीण असतं आणि त्यांचा चुकीचा वापर ही जगातल्या अनेक देशांसाठी मोठी समस्या बनली आहे.
 
अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, की जगातला कुठलाही देश एकट्यानं या समस्येचा सामना करू शकणार नाही.
 
ओपियॉइड्स काय आहेत?
रिक ट्रेबल एक फॉरेन्सिक केमिस्ट आणि युके सरकारच्या ड्रग्सच्या गैरवापराविषयी समितीचे सल्लागार आहेत. ते सांगतात की, सिंथेटिक ओपियॉइडमुळे तोच परिणाम होतो, जो ओपियम म्हणजे अफूच्या सेवनानं होतो.
 
“ओपियम म्हणजे अफूपासून जे पदार्थ तयार केले जातात, त्यांना ओपियॉइड्स म्हटलं जातं. मॉर्फिन आणि हेरॉईन ही याची उदाहरणं झाली. तर सिंथेटिक ओपियॉईड्स लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळेत तयार केले जातात. मॉर्फिनच्या तुलनेत सिंथेटिक ओपियॉईड शेकडो पटींनी शक्तीशाली असतात.”
सिंथेटिक ड्रग्स किंवा सिंथेटिक ओपियॉइड्स आपल्या मेंदूच्या त्याच भागावर परिणाम करतात ज्या भागावर अफूपासून बनवलेले अंमली पदार्थ परिणाम करतात.
 
पेन-किलर म्हणजे वेदनाशामक म्हणून ओपियॉइड्सचा वापर केला जातो.
 
रिक ट्रेबल माहिती देतात, “सिंथेटिक ओपयॉइड्समध्ये एक रिसेप्टर असतो, ज्याचा वापर वेदना कमी करण्यासाठी किंवा रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. पण त्याचा वाईट परिणामही होतो, या रिसेप्टरमुळे श्वसन प्रणालीवर दबाव पडतो. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केलं तर त्या व्यक्तीचा घुसमटून मृत्यू होतो.”
 
1950 च्या दशकात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ओपयॉइड्सच्या फायदेशीर गुणांची नक्कल करून त्यावर सिंथेटिक ओपियॉइड्स बनवायला सुरुवात केली होती.
 
आता बाजारात शेकडो प्रकारची सिंथेटिक ओपियॉइड्स उपलब्ध आहेत. फेंटानिल हे त्यापैकीच एक.
रिक ट्रेबल सांगतात की अनेकदा एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेआधी बेशुद्ध करण्यासाठी सिंथेटिक ओपियॉइड दिलं जातं. त्यावेळी रुग्णाचा श्वास सुरु राहावा यासाठी त्याला ऑक्सिजनचा पुरवठाही केला जातो.
 
मॉर्फिनचा वापर केला तर रुग्णाला बराच काळ डोकं गरगरत असल्यासारखं वाटतं. पण सिंथेटिक ओपियॉइडच्या वापरानं असं होत नाही.
 
प्रसुतीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठीही सिंथेटिक ओपियॉइड वापरली जातात. कॅन्सरच्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठीही सिंथेटिक ओपियॉइड पॅचचा वापर केला जातो.
 
अनेक देशांत सिंथेटिक ओपियॉइडचा वापर पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध म्हणून केला जातो. पण 1990 च्या दशकात याच्या दुरुपयोगाची प्रकरणं समोर येऊ लागली
रिक ट्रेबल सांगतात, “अमेरिकेत काही डॉक्टरांनी सिंथेटिक ओपियॉइडचं ओव्हर प्रिस्क्रिप्शन दिलं म्हणजे गरजेपेक्षा जास्त डोस दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना याचं व्यसन लागलं.
 
“अमेरिकन सरकारनं गरजेपेक्षा जास्त प्रिस्क्रिप्शन रोखण्यासाठी पावलं उचलली, तेव्हा ज्यांना या औषधांचं व्यसन लागलं होतं, त्यांनी दुसरे पर्याय शोधायला सुरुवात केली. या ओपियॉइडनं अमेरिकन ड्रग मार्केटमध्ये हेरोइनची जागा घेतली. लोकांनी हेरोइनऐवजी फेंटानिलचं सेवन सुरू केलं.”
 
अनेक देशांतल्या सरकारांनी यातल्या काही औषधांवर आणि ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर बंदी घातली आहे. पण ड्रगची अवैध निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी या पदार्थांत वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीत बदल करून नवे ओपियॉइड बनवायला सुरुवात केली आहे.
रिक ट्रेबल सांगतात की अनेक ठिकाणी सध्या निटाझिन ओपियॉइडची विक्री होताना दिसते. निटाझिन फेंटानिलपेक्षाही अधिक तीव्र आहे.
 
बंदी असलेल्या देशांतही अनेक जण इंटरनेटद्वारा हे ड्रग मिळवतात आणि आपसापसच्या परिसरात विकतात.
 
सिंथेटिक ड्रगची समस्या
अँजेला मे संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्स आणि गुन्हाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेत रिसर्च विभागाच्या प्रमुख आहेत. त्या सांगतात की जगात ड्रग्स आणि ओपयॉइडच्या गैरवापराविषयी खूपच कमी माहिती आहे.
 
“आपण अंदाज लावू शकतो की जगभरात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 70 टक्के मृत्यू हे ओपियॉइडच्या गैरवापरामुळे होतायत. म्हणजे इतर ड्रग्सपेक्षा ओपियॉइडची समस्या किती भयंकर आहे.”
 
अमेरिकेत या समस्येचं मुख्य कारण फेंटानिलचं सेवन हे आहे. पण जगातल्या इतर देशांमध्ये सिंथेटिक ओपियॉइड्समुळे ही समस्या वेगानं पसरते आहे.
 
नशेसाठी सिंथेटिक ओपियॉइडचा वापर जगभर होत असल्याचं अँजेला सांगता.
 
“पश्चिम आशिया आणि पश्चिम आफ्रिकेत नशेसाठी ट्रॅमाडोलचा वापर केला जातोय. आमच्याकडे केवळ नायजेरियातली ठोस आकडेवारी आहे, जिथे किमान पन्नास लाख लोक नशेसाठी ट्रॅमाडोलचं सेवन करतात. पण घाना, सेनेगल आणि बेनिन मध्येही हा प्रश्न गंभीर बनतो आहे.”
 
दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबाननं अफूच्या शेतीवर निर्बंध घातले, ज्यानंतर हेरॉइनची उपलब्धता घटली. त्यामुळे काही युरोपिय देशांमध्ये नशेसाठी सिंथेटिक ओपियॉइडचा वापर वाढला होता.
 
पण साल 2001 च्या अखेरीस अमेरिकेनं अफगानिस्तानवर हल्ला करून तालिबानला हटवंल तेव्हा अफूच्या शेतीवरची बंदी उठली.
 
वीस वर्षांनी 2022 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी अफूच्या शेतीवर बंदी घातली.
अँजेला सांगतात की अनेक देशांत शक्तीशाली सिंथेटिक ओपियॉइड्स हेरॉइनची जागा घेत आहेत आणि ही चिंतेची गोष्ट आहे.
 
“जगभरातली आकडेवारी पाहिली तर हेरोइनचा वापर करणाऱ्यांमध्ये महिलांचं 25 टक्के आहे, म्हणजे हेरोइनचा वापर पुरुषांमध्ये जास्त होतो आहे.
 
“पण नशेसाठी सिंथेटिक ओपियॉइड वापरणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे.
 
“कारण अनेक ठिकाणी औषधांच्या दुकानातही त्यांची खरेदी करता येते. वरवर पाहता यात काही गैर असल्याचं लोकांना वाटत नाही. दुसरं म्हणजे बेकायदेशीरपणे हेरॉइन विकणाऱ्या जागी ड्रग्स खरेदी करण्यास महिला फारशा धजावत नाहीत.”
 
पण सिंथेटिक ओपियॉइडच्या वाढत्या प्रसाराचं कारण काय आहे?
अँजेला सांगतात की अफूच्या रोपांपासून बनणाऱ्या ड्रग्सचं उत्पादन अफगाणिस्तान, म्यानमार आणि मेक्सिकोसारख्या मोजक्या देशांत होतं. कारण तिथली जमीन याला पोषक आहे.
 
याउलट सिंथेटिक ओपियॉइडची निर्मिती कुठल्याही देशात लॅबमध्ये कमी किंमतीत करता येते. त्याची तस्करी करणंही त्यामुळे तुलनेनं सोपं असतं.
 
नशेच्या साखळीच्या कड्या
शोधपत्रकार आणि फेंटानिल इंक या पुस्तकाचे लेखक बेन वेस्टहॉफ सांगतात की अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या बहुतांश फेंटानिलचं उत्पादन चीनमध्ये केलं जातं.
वेस्टहॉफ अंडरकव्हर म्हणजे स्वतःची ओळख लपवून चीनमधल्या अशा कारखान्यांमध्ये गेले, जिथे फेंटानिल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचं उत्पादन घेतलं जातं.
 
तिथे प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आपण एक तस्कर असल्याचं भासवलं, आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात फेंटानिल खरेदी करायचं आहे, असा बनाव केला.
 
“मी शांघाय शहराजवळ एका लॅबोरेटरीमध्ये गेलो. ती जागा छोटी होती आणि तिथे पाच सहाजणच काम करत होते. पण तिथे मोठ्या प्रमाणात फेंटानिल उत्पादनं तयार केली जात होती.
 
“मी त्यांच्याशी माल खरेदी करण्याविषयी बातचीत केली पण आमच्या पैशाचा कुठला व्यवहार झाला नाही. त्यानंतर मी वुहानमध्ये एक अशीच लॅब पाहिली जी कदाचित फेंटानिलमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांची जगातली सगळ्यात मोठी फॅक्ट्री असावी.
 
“त्या कंपनीत जवळपास 700 जण काम करत होते. यातले अनेक जण एका हॉटेल मधून काम करायचे. तिथे शेकडो लोकांची सेल्स टीम होती.”
चीन या सिंथेटिक ओपिओइड उत्पादनाचं केंद्र का बनलं आहे, कारण म्हणजे तिथे या रसायनांचे उत्पादन करणं इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. असं वेस्टहॉफ सांगतात.
 
“चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित केमिस्ट आणि वैज्ञानिक आहेत. चीनमध्ये बऱ्याच औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत जा वैध औषधांची निर्मिती करतात. पण काही कंपन्या अशीही रसायनं आणि औषधं बनवतात जी चीनमध्ये तर वैध आहेत पण अमेरिका आणि इतर देशांमध्ये त्यावर बंदी आहे.”
 
ही रसायनं थेट अमेरिकेत जात नाहीत, तर आधी मेक्सिकोमध्ये पाठवली जातात. ती इतकी शक्तिशाली आणि प्रभावी असतात की एक किलो रसायनापासून लाखो गोळ्या तयार करता येऊ शकतात.
 
त्यामुळे 10-12 किलो रसायन कंटेनरमध्ये लपवून पाठवणं सोपं असतं. मेक्सिकोमध्ये ड्रग कार्टेल म्हणजे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आहेत. ते त्यांच्या कारखान्यात या रसायनांचा वापर करून फेंटानिलसारखी ओपियॉइड्स बनवतात.
बेन वेस्टहॉफ माहिती देतात, “मेक्सिकोमधले कार्टेल्स जंगलात छोटे मोठे कारखाने तयार करून अवैधरित्या सिंथेटिक ड्रग तयार करतात. ड्रग तयार करणारे लोक प्रशिक्षित नसतात आणि आपण काय बनवतो आहोत हे त्यांना माहिती नसतं. मी ऐकले की आता कार्टेल आशा लॅबोरेटरीज शहरांमध्येही उभारत आहेत.”
 
मेक्सिकोमध्ये तयार झालेलं हे अवैध सिंथेटिक ड्रग मग अमेरिकेत पाठवले जाते. अमेरिकेत सीमा सुरक्षा दलानं या ड्रग्सची तस्करी रोखण्यासाठी नाड्या आवळल्या आहेत.
पण ही तस्करी थांबवणं कठीण का आहे, हे वेस्टहॉफ स्पष्ट करून सांगतात.
 
“फेंटानिल हेरॉइनच्या तुलनेत 50 टक्क्यांनी जास्त शक्तिशाली किंवा प्रभावी आहे. एखाद किलो फेंटानिल पकडणं कठीण जातं कारण ते अगदी आरामात लपवता येऊ शकतं. हे स्वस्तात बनवलं जात असल्यानं तस्करांना पकडल्यावर या साखळीच्या कड्या तुटणार नाहीत.”
 
“त्याऐवजी आपण फेंटानिलचा वापर करणार् या लोकांना अधिक जागरूक करू शकतो. नशा किती खतरनाक आहे याविषयी सांगू शकतो.”
 
एखाद्या पार्टीमध्ये खाल्लेली अवैध फेंटानिलची एक गोळी एखाद्याचा जीव घेण्यासाठी पुरेशी ठरू शकते.
 
आरोप प्रत्यारोप
गेल्या तीन वर्षात अमेरिकेनं सिंथेटिक ड्रग्सची समस्या सोडवण्यासाठी 179 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत, पण अमेरिकेला एकट्यानं यावर नियंत्रण मिळवता येणार नाही, असं डॉक्टर वेंडा फेलबेब-ब्राऊन सांगतात. त्या ब्रूकिंग्स इंस्टीट्यूशन मध्ये संरक्षण आणि रणनीतीविषयाच्या वरिष्ठ संशोधक आहेत.
वेंडा सांगतात की अवैध फेंटानिल आणि अन्य सिंथेटिक उपयोगची समस्या निर्माण झाली, यासाठी अनेक देश एकमेकांना जबाबदार ठरवतात.
 
“देशात अवैध सिंथेटिक उप यायच्या समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेनं जी पावले उचलली आहेत गरजेची आहेत. त्यावर मार्गक्रमण करत राहायला हवं. पण चीन आणि मेक्सिको या दिशेनं पावलं उचलत नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे.”
 
सध्या या दोन्ही देशांचे अमेरिकेसोबतचे संबंध राजनैतिक कारणांमुळे तणावाचे बनले आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये या दृष्टीनं थोडीफार प्रगती नक्कीच झाली आहे..
डॉक्टर वेंडा फेलबेब ब्राऊन सांगतात, “2017 ते 2019 या काळात चीननं या बाबतीत सहकार्य वाढवलं होतं. त्यादरम्यान चीननं तिथून फेंटानिल पुरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली होती.
 
“2019 मध्ये चीन फेंटानिल क्लासच्या औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बंध आणले. त्या बदल्यात तत्कालीन ट्रम्प सरकारनं चीनवरचे निर्बंध थोडे शिथील करावे आणि चीनचे निर्यातीवरती लावला जाणाऱ्या जाणाऱ्या करात सवलत मिळावी अशी चीनची अपेक्षा होती.”
पण अमेरिकेनं चीनची ही मागणी पूर्ण केली नाही. मग दोन वर्षांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेत आल्यावरही अमेरिकेच्या चीनविषयक धोरणांमध्ये बदल झाला नाही आणि चीन या बाबतीत सहकार्य करणं बंद केलं.
 
वेंडा फेलबेब ब्राउन सांगतात की अमेरिकाच तर इतर ज्या ज्या देशांसोबत चीनचे संबंध चांगले नाहीत त्यांच्या बाबतीत चीन असं धोरण अवलंबलं आहे. फेंटानिलचं व्यसन ही अमेरिकेची देशांतर्गत समस्या असून त्यासाठी आपण जबाबदार नसल्याचाही चीनचा दावा आहे.
 
अर्थात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कॅलिफोर्नियात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात बातचीत झाली, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावर एकमेकांचं सहकार्य करायचं याविषयी एकमत झाले आहे.
 
चीननं अशा अनेक कंपन्या बंद केल्या आहेत, जिथून मेक्सिकोतल्या कार्टेलला फेंटानिलमध्ये वापरली जाणारी रसायनं विकली जात होती.
अर्थात, फेंटानिलमध्ये वापरली जाणारी सगळी सामुग्री पुरवणं चीननं बंद केलं, तरीही प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसेपर्यंत काही काळ जावा लागेल असं तज्ज्ञ सांगतात.
 
कारण मेक्सिकोसारखे देश तस्करी रोखण्यासाठी पुरेशी पावलं उचलत नाहीयेत असं वेंडा फेलबेब ब्राऊन नमूद करतात.
 
मेक्सिकोनं काही मोठ्या कार्टेलच्या प्रमुखांना अटक करून अमेरिकेच्या ताब्यात जरूर दिला आहे पण तिथून फेंटानिलच्या तस्करीच्या विरोधात तुलनेन खूपच कमी पावलं उचलली जात आहेत असा आरोप आहे.
 
पण मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्रालयाने देशात फेंटानिलचे उत्पादन होत असलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्यूल लोपेज ओब्राडोर सांगतात की मेक्सिको कुठल्याही परदेशी सरकारसाठी पोलिसांचं काम करणार नाही.
 
अर्थात ही समस्या सोडवायची तर केवळ तस्करी रोखून चालणार नाही, तर मुळात लोकांना सिंथेटिक ओपिओइडचं व्यसन लागण्यापासून रोखण्यासाठी कडक पावलं उचलायला हवीत.
 
अमेरिका कॅनडा आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये सिंथेटिक ओपिओइडचं व्यसन आणि दुरुपयोग ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.
 
एखाद्या देशात या तस्करी आणि उत्पादनावरती बंदी घातली जाते तेव्हा तस्कर लगेचच दुसऱ्या मार्गांनी याचं उत्पादन आणि तस्करी सुरू करतात. ते नवी बाजारपेठ शोधू लागतात. त्यामुळे ज्या देशांमध्ये सध्या सिंथेटीक ओपिऑइड्स सेवेन ही मोठी समस्या बनलेली नाहीत तिथेही भविष्यात हा प्रश्न उद्भवू शकतो.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती