कॅनडाला जाण्यासाठी IELTS पास तरुणीवर 45 लाखांचा खर्च, नंतर तिच्यावरच फसवणुकीचा आरोप

गुरूवार, 28 डिसेंबर 2023 (21:14 IST)
- सरबजित सिंग दहिवाल
"मुलानं मुलीशी फक्त कॅनडाला जाण्यासाठी लग्न केलं. मुलगी मुलाला कॅनडाला बोलावेल आणि मुलाला त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागेल. कपुरथला येथील दोन कुटुंबांदरम्यान झालेल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधील या अटी आहेत. जानेवारी 2023 मध्ये हे सगळं ठरलं होतं."
 
हा करार अधिकृत स्टॅम्प पेपरवर सह्या करून करण्यात येतो आणि त्याची शक्यतो नोटरी केली जाते.
 
खरं तर या प्रकरणामध्ये मुलीला 12 वी पास केल्यानंतर IELTS पास करून कॅनडाला पुढील शिक्षणासाठी जायचं होतं.
 
शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी एका मुलाकडून उचलली जाणार होती. त्या मोबदल्यात मुलगी मुलाला पार्टनर किवा स्पाऊस व्हिसावर कॅनडाला नेणार असं ठरलं होतं.
 
विवाह झाला, नातेवाईक आले तसंच विवाहाची नोंदणीही करण्यात आली.
 
पण आई वडिलांनी मुलीला पाठवलं नाही. कारण त्यांच्या नजरेत हा विवाह नव्हता तर कॅनडाला जाण्यासाठीचा एक करार होता. त्याआधीच मुलगी कॅनडाला गेली. त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये वाद झाले आणि प्रकरण पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोहोचलं.
 
मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात मुलाच्या कुटुंबानं केलेल्या तक्रारीवरून नुकतेच दोन एफआयआर दाखल करण्यात आले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी या तक्रारी करण्यात आल्या. कपुरथला पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
 
45 लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण
पहिल्या केसमधील तक्रारदार होते बलजित जग्गी (नाव बदललेले). ते पंजाबच्या कपुरथला येथील रहिवासी आहेत.
 
जग्गी यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांचा मोगामधील कविता (नाव बदललेले) नावाच्या महिलेशी संपर्क झाला. बलजित यांच्या मते, कविता यांनी त्यांना त्यांची मुलगी स्वाती (नाव बदलेले) हिला परदेशात पाठवायचं असल्याचं सांगितलं.
 
त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बलजित यांचा लहान भाऊ सौरभ (नाव बदललेले) आणि स्वाती यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सौरभ आणि स्वाती यांच्या वयात 9 वर्षांचा फरक होता.
 
या करारानुसार बलजित जग्गी यांच्या कुटुंबीयांना विवाहाचा आणि कॅनडातील स्वातीच्या शिक्षणाचा आणि परतण्याचा खर्च उचलावा लागणार होता. त्या मोबदल्यात स्वातीला कॅनडाला जाऊन तिच्या पतीला सौरभला कॅनडाला बोलवायचं होतं.
 
स्वाती आणि सौरभ यांचा 2019 मध्ये विवाह झाला. एफआयआरनुसार लग्नाचा खर्च हा मुलाच्या कुटुंबीयांना उचलावा लागणार होता. सप्टेंबर 2019 मध्ये स्वातीच्या कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज करण्यात आला आणि ती कॅनडाला गेली.
 
त्या सर्वावर जवळपास 40 लाख रुपये खर्च केल्याचं मुलाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
 
तक्रारदार जग्गी यांच्या मते, कॅनडाला जाण्यापूर्वी मुलीनं तिथं गेल्यानंतर तीन महिन्यांनी सौरभला तिथं बोलावून घेईल असं आश्वासन दिलं होतं. पण तिनं तसं केलं नाही. या दरम्यानच्या काळात भारतात सौरभचा मृत्यू झाला.
 
त्यानंतर 2023 मध्ये स्वाती भारतात आली आणि तिनं सौरभच्या मोठ्या भावाशी म्हणजे बलजित जग्गी यांच्याशी मार्च महिन्यात विवाह केला. त्या दोघांच्या वयात 13 वर्षांचा फरक होता.
 
जग्गी यांच्या मते, हे लग्न कोणत्याही दबावाशिवाय झालेलं होतं. यावेळीही लग्नाचा संपूर्ण खर्च जग्गी यांच्या कुटुंबानंच केला. भारतात 20 दिवस राहिल्यानंतर स्वाती परत कॅनडाला गेली आणि यावेळी तिनं जग्गी यांना कॅनडाला बोलवण्याचं आश्वासन दिलं.
 
बलजित जग्गी यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितलं की, स्वातीनं त्यांना कॅनडाला बोलावलं नाही आणि त्यांचा फोनही तिनं उचलला नाही. स्वाती आणि तिची आई कविता यांनी आपली 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप जग्गी यांनी केला.
 
कॅनडात राहणाऱ्या मुलीची बाजू
बीबीसीनं याबाबत कविता आणि स्वाती यांच्याशी बोलून त्यांची बाजूही जाणून घेतली. बलजित जग्गी यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचं मुलीनं सांगितलं.
 
"असा विवाहाचा कोणताही करार झालेला नव्हता तर हे खरंखुरं लग्न होतं," असं ती म्हणाली.
 
व्हिसा आणि कॅनडासाठीचा खर्च मुलाच्या कुटुंबाकडून करण्यात आल्याचं तिनं मान्य केलं. तसंच सौरभला कॅनडाला बोलावण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले पण दुतावासाकडून मान्यता मिळाली नाही, असंही तिनं सांगितलं.
 
त्यानंतर सौरभचा मृत्यू झाला. मार्च 2023 मध्ये परस्पर सहमतीनं सौरभचा मोठा भाऊ बलजित जग्गी याच्याशी लग्न केल्याचं स्वातीनं सांगितलं.
 
स्वाती यांच्या मते, बलजित जग्गी यांनी त्यांना वारंवार फोन करून कॅनडात जाण्याबाबत विचारत त्रास दिला. त्यामुळं त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. बलजित यांनी कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज केला नाही, याची कबुलीही स्वाती यांनी दिली.
 
दुसरीकडं बलजित जग्गी यांच्या मते, स्वाती यांनी जून 2023 पासून त्यांच्याशी बोलणं बंद केलं. त्यांच्या सासूही काहीच मदत करत नव्हती. त्यांनी फसवणूक आणि त्यांच्याबरोबर जे काही झालं त्याबाबत पोलिसांत तक्रार केली.
 
स्वातीच्या आई कविता यांनीदेखिल स्वाती आणि बलजित यांच्यात फोनवरून काही मुद्द्यांवर वाद झाले होते, आणि त्यावरूनच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं.
 
विदेशात जाण्याची प्रवृत्ती
विदेशात आणि विशेषतः कॅनडाला जाण्यासाठी अशाप्रकारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा प्रकार पंजाबमध्ये बऱ्याच काळापासून सुरू आहे.
 
अशा प्रकरणांमध्ये मुली IELTS परीक्षा पास करतात आणि विदेशात जाण्याची इच्छा असलेल्या आणि कॅनडातील शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी असलेल्या मुलांशी लग्न करतात.
 
मुली कॅनडाला पोहोचल्यानंतर त्यांना काही काळानंतर मुलांना कॅनडाला बोलवायचं असतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास मुलांसाठी ते कॅनडाला जाण्याचं तिकिट असतं.
 
2021 मध्ये बरनाला जिल्ह्यातील कोठे गोविंदपुरा जिल्ह्यातील लवप्रित सिंह यांच्या कथित आत्महत्येवेळीही असंच प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळीही लवप्रित सिंह यांनी IELTS पास केलेल्या बीनत कौर या मुलीशी लग्न केलं आणि तिचा विदेशात जाण्याचा सगळा खर्च उचलला.
 
मुलगी कॅनडाला पोहोचल्यानंतर लवप्रित सिंग आणि बीनत कौर यांनी फोनवर बोलायला सुरुवात केली. पण एकेदिवशी लवप्रित सिंग यांनी आत्महत्या केली.
 
मुलाच्या कुटुंबीयांनी लवप्रित यांच्या या आत्महत्येसाठी बीनत कौर जबाबदार असल्याचा आरोप केला.
 
हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. लवप्रित यांचे काका हरविंदर सिंग सिद्धू म्हणाले की, त्यावेळीही अशा प्रकरणांत बळी पडलेले अनेक तरुण पुढं आले. पण कॅनडाला जाण्याचा ट्रेंड एवढा वाढला आहे की, अनेक लोक अजूनही समोर येत नाहीत.
 
तज्ज्ञ काय म्हणतात?
पतियालाच्या पंजाबी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक ग्यान सिंह म्हणाले की, IELTS ची परीक्षा देणाऱ्या मुलींशी लग्नाचा ट्रेंड हा संपूर्ण पंजाबमध्ये पाहायला मिळतो.
 
"कॅनडातील झगमगाट आणि पंजाबमध्ये असलेली बेरोजगारी हे यामागचं कारण आहे. जेव्हा मुली कॅनडाला पोहोचतात तेव्हा मुलगा आणि मुलगी यांच्यातील दृष्टीकोनामुळं सर्वकाही अधिक क्लिष्ट होत जातं," असं ते म्हणाले.
 
"पंजाबमध्ये सामान्य वर्गातील लोकांमध्ये अशा IELTS देणाऱ्या मुलींशी विवाह करण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत."
 
मुलांचं शिक्षणाचं कमी प्रमाण किंवा IELTS परीक्षेत स्कोर करण्यात येणारं अपयश यामुळं मुलं मुलींच्या मदतीनं विदेशात जाण्याचा प्रयत्न करतात.
 
मुलगी जेव्हा कॅनडामध्ये जाते तेव्हा अनेकदा मुलगा आणि मुलगी यांच्या विचारांतील फरकामुळं बऱ्याच गोष्टींध्ये गोंधळ निर्माण होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती