नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारतातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इस्रायलने हा हल्ला संभाव्य दहशतवादी हल्ला मानला आहे. इस्रायलने यहुदी आणि इस्रायली नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली असून त्यांना संभाव्य धोका टाळण्याचा इशारा दिला आहे. इस्रायली दूतावास नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये आहे.
या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. इस्रायलने इस्त्रायली नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्यू नागरिकांना मॉल्स आणि मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना रेस्टॉरंट, हॉटेल, पब आणि इतर ठिकाणांसह सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्यूंना समूहाने एकत्र कुठेही जाणे टाळण्यास सांगितले आहे. कोणी कुठे कुठे जात असेल तर आपली ओळख सर्वसामान्यांसोबत शेअर करू नका आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे टाळा, असे अॅडव्हायझरीत म्हटले आहे.
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांना सर्वप्रथम मंगळवारी संध्याकाळी ५.४५ वाजता दूतावासाच्या मागे स्फोट झाल्याची माहिती मिळाली. इस्रायली दूतावासाच्या सुरक्षा रक्षकाने ही माहिती दिली. 100 मीटर अंतरावर त्याने स्फोटाचा आवाज ऐकला. माहिती मिळताच दिल्ली पोलीस, जिल्हा कर्मचारी, स्पेशल सेल, दिल्ली अग्निशमन सेवा आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून किंवा जवळून आग किंवा स्फोट झाल्याचे कोणतेही चिन्ह नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बॉम्ब शोधक श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
अलिकडेच इस्रायली दूतावासातील राजदूताला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार इस्रायली दूतावास आणि राजदूतांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर गृह मंत्रालयाने सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते. राजदूताला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.