Israel-Hamas war : गाझातील मृतांचा आकडा या संघर्षाबद्दल काय सांगतो?

शनिवार, 23 डिसेंबर 2023 (16:20 IST)
-मर्लिन थॉमस
हमासकडून 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने केलेल्या कारवाईत किमान 20,000 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
 
पण मृतांचा हा आकडा या संघर्षाबद्दल नेमकं काय सांगतो याची बीबीसी व्हेरिफायने पडताळणी केली आहे.
 
गाझामधील हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या संघर्षाला सुरुवात झाल्यापासून दररोज सरासरी किमान 300 लोक मृत्युमुखी पडले आहेत. शिवाय यामधून सात दिवसांच्या युद्धबंदीचा कालावधी वगळण्यात आला आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक आपत्कालीन संचालक रिचर्ड ब्रेनन यांनी या आकडेवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
 
कोणत्याही युद्ध प्रदेशात मृतांच्या आकडेवारीचा नेमका अंदाज बांधणं हे एक अवघड काम असतं.
 
गाझामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे कारण गाझामधील इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबले गेलेले किंवा ज्यांना रुग्णालयात नेता आलं नाही अशा लोकांची मोजणी अद्याप झालेली नाही.
 
बीबीसी व्हेरिफायने या आकडेवारीची अतिशय गंभीरपणे पडताळणी केली आहे.
 
या प्रक्रियेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय की इतर संघर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत ही आकडेवारी कशी वेगळी आहे आणि भविष्यात गाझामधील तरुण लोकसंख्येवर त्यांचा नेमका काय परिणाम होईल?
 
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोपासून ते कोलंबियातील गृहयुद्ध आणि 2003 च्या इराक युद्धापर्यंतच्या संघर्षांमधील मृतांच्या आकडेवारीचं विश्लेषण करणारे तज्ज्ञ प्राध्यापक मायकल स्पागट म्हणतात की, या युद्धात अतिशय कमी कालावधीत खूप जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.
 
ते म्हणतात, “गाझामध्ये 2008 साली सुरू झालेला संघर्ष लक्षात घेता, मृतांची आकडेवारी आणि ज्या क्रूरपणे लोकांची हत्या झाली ते पाहता हे युद्ध अभूतपूर्व आहे."
 
लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिल्यास 20,000 हा आकडा गाझाच्या 22 लाख लोकसंख्येच्या एक टक्के आहे.
 
बीबीसीने अनेक लष्करी तज्ज्ञांशी संवाद साधला, ज्यांनी या युद्धात इस्रायलकडून वापरल्या जाणाऱ्या बॉम्बची माहिती दिली आहे.
 
यापैकी काही बॉम्बचं वजन 45 किलोपर्यंत आहे तर काही 900 किलोपेक्षाही मोठे आहेत.
 
अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटागॉनमध्ये काम केलेले आणि संयुक्त राष्ट्राचे गुन्हे अन्वेषक मार्क गार्लास्को म्हणतात की, एखाद्या मोठ्या बॉम्बच्या लक्ष्याच्या आजूबाजूला असणं म्हणजे ती जागा नामशेष होताना याची देही याची डोळा पाहण्यासारखं आहे. गार्लास्को सध्या नेदरलँड येथील ‘पीएएक्स’ या संस्थेमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
 
गाझाच्या लोकसंख्येची घनता लक्षात घेता परिस्थितीचं गांभीर्य आणखी वाढतं. फक्त 41 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद असलेल्या गाझा पट्टीमध्ये तब्बल 22 लाख लोक राहतात.
 
युद्धापूर्वी गाझामध्ये प्रति चौरस किलोमीटरमध्ये सरासरी 5700 लोक राहात होते. लोकसंख्येची ही घनता लंडनइतकी आहे.
 
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये आपल्या लष्करी कारवाई सुरूवात केलेली. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1200 इस्रायलींची हत्या केली होती. यामध्ये सैनिकांची संख्या खूप कमी होती.
 
या हल्ल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी सामान्य पॅलेस्टिनी लोक मृत्युमुखी पडू लागल्याने इस्रायलवर दबाव वाढतोय.
 
‘ॲक्शन ऑन आर्म्ड वॉयलन्स’च्या माहितीनुसार, 2011 ते 2021 या काळात जगभरात झालेल्या संघर्षांमध्ये 90 टक्के सामान्य नागरिक मारले गेले आहेत.
 
‘सीएनएन’ने पाहिलेल्या अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने गाझावर 29,000 बॉम्ब टाकले आहेत. यापैकी 40 ते 45 टक्के बॉम्ब कोणालाही लक्ष्य न करता टाकण्यात आले आहेत.
 
गार्लास्को म्हणतात की, कोणालाही लक्ष्य न करता टाकण्यात आलेले बॉम्ब साधारणपणे तीस मीटरच्या परिप्रेक्षात कुठेही फुटू शकतात. उदाहरणार्थ, हमासच्या मुख्यालयाच्या दिशेने टाकलेला बॉम्ब नजिकच्या निवासी इमारतीवरही पडू शकतो.
 
इस्त्रायली लष्कराचं म्हणणं आहे की, सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी ते सावधगिरीने पावलं उचलतात. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हल्ला करण्यापूर्वी त्यांच्याकडून आगाऊ इशारा दिला जातो.
 
इस्त्रायलने असंही म्हटलंय की, जगभरातील युद्धांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांची संख्या पाहता त्यांची आकडेवारी खूपच बरी आहे.
 
इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की, “एखाद्या ठिकाणी सामान्य नागरिक आहेत असं कळल्यावर आम्ही आमचे तिथले हल्ले थांबवतो. आम्ही प्रत्येक लक्ष्यानुसार बॉम्बची निवड करतो, जेणेकरून अनावश्यक नुकसान टाळता येईल.”
 
इस्रायलचा दावा आहे की, हमास सामान्य लोकांचा वापर मानवी ढाल म्हणून करत आहे.
 
सामान्य नागरिकांची संख्या किती?
हमासचं म्हणणं आहे की युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 70 टक्के महिला आणि मुलांचा समावेश आहेत.
 
मात्र हमासच्या आकडेवारीत सशस्त्र आणि सामान्य नागरिक अशी वर्गवारी केलेली आढळत नाही.
 
19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या हमासच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या 19,667 होती. त्यांचा असा दावा आहे की, त्यामध्ये 8000 मुलं आणि 6200 महिलांचा समावेश होता.
 
याशिवाय या आकडेवारीत 310 वैद्यकीय कर्मचारी, 35 नागरी संरक्षण कर्मचारी आणि 97 पत्रकारांचाही समावेश होता.
 
गाझामधील मुलांवर युद्धाचा सर्वात वाईट परिणाम झालाय. गाझाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या 18 वर्षाखालील आहे.
 
हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत सुमारे 52,000 लोक जखमी झाले आहेत. मात्र, जखमी झालेल्या मुलांची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही.
 
3 नोव्हेंबर रोजी जखमींची संख्या 24,173 होती. यामध्ये 8,067 मुलं, 5,960 महिला आणि 10,146 पुरुषांचा समावेश होता.
 
संयुक्त राष्ट्र संघाची लहान मुलांसोबत काम करणारी संस्था ‘युनिसेफ’ने यापूर्वीही म्हटलंय की, जगातील कोणत्याही मुलासाठी सध्या गाझा हे सर्वात धोकादायक ठिकाण आहे.
 
‘युनिसेफ’चे प्रादेशिक संचालक अदेल खोद्रा म्हणाले, "ज्या ठिकाणी मुलं खेळायची आणि शाळेत जायची त्या जागा आता दगडांच्या ढिगाऱ्यात रूपांतरीत झाल्या आहे."
 
इतर युद्धांच्या तुलनेत हे युद्ध किती वेगळे आहे?
प्रत्येक संघर्षाची एक वेगळी ओळख असते. परंतु बीबीसीने ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला ते या गोष्टीशी सहमत आहेत की, गाझामधील या युद्धादरम्यान सामान्य नागरिकांचा मृत्यूदर हा इतर अनेक संघर्षांपेक्षा खूप जास्त आहे.
 
2014 पासून युद्धे आणि संघर्षांमध्ये नागरिकांच्या मृत्यूचा मागोवा घेणाऱ्या एअरवॉर्सच्या संचालिका एमिली ट्रिप म्हणतात की, "या युद्धादरम्यान आम्ही पाहिलेल्या नागरिकांच्या मृत्यूदर हा इतर अनेक संघर्षांपेक्षा खूप अधिक आहे."
 
मार्क गार्लास्को म्हणतात, "एवढ्या छोट्या निवासी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर केला गेल्याचं दुसरं उदाहरण शोधायचं झालं तर आपल्याला व्हिएतनाम युद्धाच्या काळाकडे पहावं लागेल. आणि आपल्याला 1972 च्या ख्रिसमस बॉम्बस्फोटासारखं उदाहरण सापडू शकेल, जेव्हा ऑपरेशन लाइनबेकर द्वितीय दरम्यान हनोईवर वीस हजार टनचे बॉम्ब टाकण्यात आले होते. या बॉम्बहल्ल्यात सुमारे 1,600 व्हिएतनामी मुलं मृत्यूमुखी पडली होती.”
 
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, 2017 मध्ये सीरियन शहर रक्कामधून इस्लामिक स्टेटला हुसकावून लावण्यासाठी चालवण्यात आलेल्या चार महिन्यांच्या लांबलचक मोहिमेदरम्यान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हवाई आणि तोफांच्या हल्ल्यांमुळे दररोज सरासरी 20 नागरिक मारले जात होते.
 
त्यावेळी तिथे राहणाऱ्या सर्वसामान्यांची आकडेवारी स्पष्टपणे माहित नव्हती. पण ही संख्या 50,000 ते 1,00,000 च्या दरम्यान असावी, असा संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
 
यासोबतच या संघर्षामुळे सुमारे 1,60,000 सामान्य लोकांना विस्थापित व्हायला लागलेलं.
 
असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केलेल्या तपासणीत असं आढळून आलंय की, अमेरिकेचे समर्थन असलेल्या इराकी सैन्य आणि इस्लामिक स्टेट यांच्यात इराकी शहर मोसुलसाठी झालेल्या नऊ महिन्यांच्या लढाईत 9,000 ते 11,000 नागरिक मारले गेले. या संघर्षातही दररोज सरासरी 40 नागरिक मृत्यूमुखी पडले होते.
 
2014 मध्ये जेव्हा इस्लामिक स्टेटने मोसुलचा ताबा घेतला तेव्हा त्याची लोकसंख्या अंदाजे 20 लाखापेक्षा कमी होती.
 
युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्राचा असा अंदाज आहे की, जवळपास दोन वर्षात किमान 10,000 नागरिक मारले गेले आहेत.
 
तथापि, युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स मॉनिटरिंग मिशनने चेतावणी देत म्हटलंय की, मृत्यूमुखी पडलेल्यांचा वास्तविक आकडा खूप जास्त असू शकतो. कारण आकडेवारीची सत्यता तपासणं हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यासाठी खूप वेळसुद्धा लागू शकतो.
 
याव्यतिरिक्त, वेगवेगळ्या संघर्षांमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या आकडेवारीची तुलना करणं खूप कठीण काम असतं, कारण मृतांची गणना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती भिन्न असू शकतात.
 
हमासचे किती हल्लेखोर मारले गेले?
हमासचा सर्वनाश करणं हा आपला उद्देश असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी हमासच्या किती हल्लेखोरांना मारलं आहे, हे सांगितलेलं नाही.
 
इस्रायली अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की त्यांनी हमासचे हजारो हल्लेखोर मारले आहेत. एके ठिकाणी इस्रायलने असंही सांगितलंय की, आतापर्यंत हमासचे 7000 हल्लेखोर मारले गेले आहेत.
 
इस्रायल, ब्रिटन आणि जगातील अनेक शक्तीशाली देश हमासला एक दहशतवादी संघटना मानतात.
 
जेव्हा इस्रायली लष्कराला थेट प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'हमासच्या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अचूक आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध नाही.'
 
एका इस्रायली अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांनी इस्रायलच्या मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे हमासच्या दोन हल्लेखोरांना ठार केलं आहे.
 
‘सीएनएन’सोबत केलेल्या संभाषणात इस्रायली लष्कराचे प्रवक्ते जोनाथन कॉनरिक्स यांना हे प्रमाण 'अत्यंत सकारात्मक' वाटतं.
 
पण बीबीसी हमासच्या मृत्युमुखी पडलेल्या हल्लेखोरांची नेमकी आकडेवारी खात्रीलायकपणे सांगू शकत नाही.
 
प्राध्यापक मायकल स्पागट म्हणतात, "गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांपैकी 80 टक्के सामान्य नागरिक असतील, तर त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही."
 
इराक युद्धामध्ये मृत्यूंच्या आकडेवारीचा अभ्यास करणारी संस्था ‘इराक बॉडी काउंट’चे हमित दार्दागन आणि जॉन स्लोबोडा यांचं म्हणणं आहे की, गाझामधील लष्करी आणि निमलष्करी लोकांच्या मृत्यूंच्या संख्येबद्दल कोणतीही विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही.
 
(बैकी डेल यांच्या अतिरिक्त अहवालासह)
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती