चीनमधील भूकंपातील मृतांची संख्या 149 पोहोचली असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. चीनच्या उत्तर-पूर्व भागात 18 डिसेंबर रोजी 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. गेल्या नऊ वर्षांतील हा या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली भूकंप होता, ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता. त्यामुळे चीनच्या गान्सू प्रांतातील जिशिशान काउंटी, मिन्हे काउंटी आणि शेजारील किंघाई राज्यामध्ये खूप नुकसान झाले आहे.
किंघाई राज्यात या भूकंपामुळे 32 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. येथे 200 जण जखमीही झाले आहेत. गांसू राज्यात 117 लोकांचा मृत्यू झाला असून 781 लोक जखमी झाले आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी भूकंपग्रस्त भागाचा दौरा केला. जखमींपैकी 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे सरकारकडून भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य वाटप करण्यात येत आहे. ज्यामध्ये उबदार अंथरुण आणि कपडे देखील समाविष्ट आहेत.