श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा

बुधवार, 14 जुलै 2021 (10:39 IST)
१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे...
सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनि द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन, त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले.
 
२. अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नानाविना पुजार्‍याचे उत्पन्न बुडणे...
स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे. त्यामुळे त्या पुजार्‍याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले. पुजार्‍याने अनेक उपाय योजले; पण सर्व व्यर्थ ठरले.
 
३. पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दांत पुजार्‍याला त्याची चूक सांगून उपायही सांगणे...
कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योगसमाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजार्‍याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्‍वरच आहेत. त्यांनी पुजार्‍याला पुढील कठोर शब्दांत समज दिली, धनलोभे पूजिता देव त्रिकाल । धनार्थ लोकांचा करिता छळ ॥ ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल । आचरिता कैशी दुर्मती ॥ आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला, सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे । मृदुवचने संतोषवावे ॥ सद्धर्मानेच धन अन् यश मिळेल.
 
४. पुजार्‍याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्याच्यावर कृपा करणे...
नंतर या पुजार्‍याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली. श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल, तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजार्‍याच्या मस्तकावर कृपावरदहस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजार्‍याने वर्तन पालटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्‍च धनलाभ होऊ लागला.
 
५. लोभ सोडा अन् धर्माने वागा, हा संदेश...
श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजार्‍याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रांतील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे.
 
 
|| जय जय श्रीस्वामी समर्थ ||

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती