श्रीस्वामीसमर्थ प्रकट दिन : श्रीस्वामीसमर्थांचे पद

बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:33 IST)
कर्दळीवनी गुप्त होती।
द्वितीयावतारी श्रीनृसिंह सरस्वती।
पंचशताब्दी नंतर प्रकटले। 
नरसिंह भान स्वामी समर्थ तेथे।।१।।
 
अजाणूबाहू दिव्य तेजकांती।
जणू रवि शशीस ही पडे भ्रांती।
तेथूनी प्राकट्य त्यांचे होई।
अक्कलकोटी ग्रामी अवतीर्ण होई।।२।।
 
चोळाप्पा भक्त अति भाग्यवान।
धन्य त्याचे ते निवासस्थान।
परीसस्पर्श लाभला स्वामींचा।
भाग्यास ही हेवा वाटे या भाग्याचा।।३।।
 
विरभद्र रुपात दर्शन स्वामी देती। 
त्रिशूळ, कोयता, ही आयुधे करी असती।
साडेसात फूट उंची ज्यांची। 
काय वर्णू मी थोरवी स्वामींची।।४।।
 
अंगरखा आणि रुद्राक्षमाळ। 
सोबत पादुका त्या निर्मळ।
अजून शक्तीस्रोत आहे तेथे। 
धन्य ती वास्तू, जेथे वास्तव्य होते।।५।।
 
याच वास्तूत विहीर कोरडी ती। 
स्वामी तिच्यात लघुशंका करिती।
गोड झरा अमृताचा फुटून वाही। 
अद्यापि आहे देण्यास प्रचीती।।६।।
 
वटवृक्ष मंदिरी स्वामींचे नित्य स्थान।
" हम गया नही, जिंदा है।" हे भक्तांसी अभिवचन।
" भिऊ नको, मी पाठीशी आहे," केवढा हा आधार।
या स्थितीत स्वामीच तारणार।।७।।
 
कृष्ण पक्षातील त्रयोदशी/चतुर्दशी तिथी।
मास चैत्र होता, चवथ्या प्रहरी।
स्वामी बैसले निजानंदास तेथे। 
चोळाप्पा वास्तू पुनः पुनः धन्य होते।।८।।
 
जय स्वामी समर्थ किती आळवावे।
या कठीण काळी तूच बा पाहावे।
नको अंत पाहू, देई शक्तीस अर्थ।
सतत आळवू आम्ही जय स्वामी समर्थ।।९।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती