श्रीसद्गुरुलीलामृत अध्याय बारावा
 
	
		
			 
										    		शुक्रवार,  5 जानेवारी 2024 (13:12 IST)
	    		     
	 
 
				
											॥ श्रीसद्गुरुलीलामृत ॥
	अध्याय बारावा
	समास पहिला
	 
	समाधी पहातां समाधान होतें । तनूं कष्टवी त्यासि आनंद देते ॥
	मनीं भावितां कामना पूर्ण होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२ ॥
	जयजय सद्गुरु पूर्णब्रह्मा । विश्वचालका निष्कामा ।
	विश्वात्मय चित्सुखधामा । निर्विकारा सद्वस्तु ॥ १ ॥
	सजीव निर्जीव दोहीं ठायीं । अंतर्बाह्य व्यापून राही ।
	अलिप्त अखंड भेद नाही । निराकारा निरुपमा ॥ २ ॥
	प्रकृतिपुरुषांचा सोहळा । मायोद्भनव ब्रह्मांडगोळा ।
	अहंकार वासना जिव्हाळा । व्यापून वेगळा तूं येक ॥ ३ ॥
	आदि-मध्य-अंत रहित । सर्वव्यापि सकळातीत ।
	रंग-रूप-कल्पनातीत । सद्गुरुपद स्वयंप्रभ ॥ ४ ॥
	मनें शोधितां उन्मत्त झाले । बुद्धीचा निश्चय डळमळे ।
	चित्त दृश्य चिंतूं लागले । गुरुपद अदृश्य ॥ ५ ॥
	वेदशास्त्रें कशिली कंबर । उपनिषदें वदती आम्ही चतुर ।
	शोधूं निघाली परात्पर । ज्ञानमदेंकरोनी ॥ ६ ॥
	पूर्वपक्ष उत्तरपक्ष । करितां पडला शेष ।
	अलक्षीं लावूं वदती लक्ष । परि सिद्धांत होईना ॥ ७ ॥
	शब्दजननीं ॐकार । तेथेंचि ते जाहले स्थिर ।
	एवं शब्दांचे विचार । श्ब्दब्रह्मीं मावळले ॥ ८ ॥
	वायूनें शोधितां आकाश । तो स्वयेंचि पावला नाश ।
	तैसें शोधितां निःशब्दास । शब्द नाश पावले ॥ ९ ॥
	बर्फ बोले आपुली प्रौढी । सागरीं देवोनिया बुडी ।
	आणीन मी रत्नेंी गाढीं । क्षण स्थिर रहावें ॥ १० ॥
	ऐसें वदोन सागरीं गेला । तंवर वरतीच तरंगोनि विराला ।
	पुन्हां वार्ता सांगावयाला । आला नाहीं रत्नां॥ची ॥ ११ ॥
	ऐशी स्वरूपओळखण । जवळी असोन चुकले जन ।
	ज्ञानाज्ञान द्वैतभान । गुंतले देवा ऐलीकडे ॥ १२ ॥
	शाश्वतपद चित्तीं धरिले । ज्यांचे द्वैतभान हारपलें ।
	सद्गुरु भेटतांच जाहले । सद्गुरुरूप ॥ १३ ॥
	निजस्वरूप ओळखण । तेंचि तुमचें कृपादान ।
	सदानिकट सुप्रसन्न । परि पाहणें जड वाटे ॥ १४ ॥
	पाहों जातां दूर नाही । विचार करितां दुजें नाहीं ।
	मानीव पडळ जीव कांहीं । मानिलें तें सोडीना ॥ १५ ॥
	असत्याचा ऐसा स्वभाव । असत्य सामग्री हावभाव ।
	असत्य काळ बोलणें वाव । असत्य असत्या जमवीतसे ॥ १६ ॥
	जैसा नट नाट्यागारीं । असत्य क्रिया करी सारी ।
	पुरुष असोनिया नारी । भासवोन मोही बहुतांसी ॥ १७ ॥
	अमावस्ये चंद्रकिरण । चेतवी तयाचा मदन ।
	रात्रीं प्रखर सूर्यकिरण । ताप देती तयासी ॥ १८ ॥
	घराचें जाहलें रान । उजेडीं अंधार पडला दारुण ।
	सभेसी तस्कर येवोन । चोरी करी येकांती ॥ १९ ॥
	पाहणार मानिलें पाषाण । म्हणे हें निर्मनुष्य कानन ।
	कृत्रिम व्याघ्र येवोन । झडप घाली तयावरी ॥ २० ॥
	ऐसें असत्य कौतुक । जाणती सकळ प्रेक्षक ।
	परि गोडी लागली अधिक । असत्य प्रिय असत्या ॥ २१ ॥
	तैसें आम्हीं द्वैत मानिलें । अहंकारें वेगळें केलें ।
	म्हणोनि अदृश्य जाहलें । तुमचें स्वरूप अज्ञानें ॥ २२ ॥
	आतां हीच विनवणी । द्वैताची काढोन गवसणी ।
	स्वस्वरूप दावीं झणीं । कृपाळुवा गुरुमूर्ते ॥ २३ ॥
	कोसला कोंडी आपुला प्राण । स्वयेंचि कोश करोन ।
	तैसें आम्हीं संसारबंधन । अनंतजन्मी बांधिलें ॥ २४ ॥
	सकळ व्यसनांमाजीं व्यसन । संसार हें महाव्यसन ।
	सभाग्या दास करोन । दारोदार हिंडवितें ॥ २५ ॥
	अन्य व्यसन सुटे एक जन्मीं । हें न सुटे जन्मोजन्मीं ।
	इतराची कांहीं काल ऊर्मी । याची ऊर्मी सुटेना ॥ २६ ॥
	इतरां निंद्य मानिती । यासी सभाग्यांमाजीं गणती ।
	तेणें विशेष आसक्ती । चढतें बंधन मानवा ॥ २७ ॥
	ऐसें हें कोशबंधन । बांधिलें सुखेच्छा धरून ।
	परि शेवटीं कोंडोनि प्राण । इहपर नाश करेल ॥ २८ ॥
	पंचविषय देहासक्ति । ही संसारशब्दव्याप्ति ।
	आणिक लक्षणें बहुत ग्रंथी । बहुतां प्रकारें बोलिलीं ॥ २९ ॥
	ऐसी संसारगवसणी । तीमाजीं कोंडले स्वतंत्र प्राणी ।
	नरदेह छिद्रामधोनी । तुजला हांका मारितसे ॥ ३० ॥
	धांवोन येईं सत्वरी । अज्ञानग्रंथी मुक्त करीं ।
	बाहेरी येवोन चरणांवरी । लोळेन सगुणसाक्षित्वें ॥ ३१ ॥
	भज्य भजक आणि भजन । हें सगुणींच लाभे धन ।
	भक्तिसोहळा आनंदपूर्ण । अनंतजन्मीं भोगावा ॥ ३२ ॥
	परि व्हाया सगुणसेवा । मोकली गा वासनागोवा ।
	मग आनंदाचा मेवा । चाखितां रोगभय नाहीं ॥ ३३ ॥
	गुरुसेवा नाही घडली । बहुत शिष्यीं बहुत केली ।
	आम्हां अल्पकाळींच मुकली । सगुणब्रह्म गुरुमूर्ति ॥ ३४ ॥
	अज्ञानियां अदृश्य झालें । भाविकां भावनेनें दिसलें ।
	ज्ञानियां आलें ना गेलें । सद्गुरुपद शाश्वत ॥ ३५ ॥
	उपासकां उपासनेलागीं । समधीरूप नटले योगी ।
	अनंत कामना पुरविती वेगीं । साक्षात्कारें सेवकां ॥ ३६ ॥
	ती कथा कैसी झाली । वदाल नाही परिसिली ।
	तरी वंदोनि गुरुमाउली । गुरुप्रसाद कथन करूं ॥ ३७ ॥
	शके अठराशें पस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष ।
	नवम्योत्तर दशमीस । सतेज भानु मावळला ॥ ३८ ॥
	रविसोमसंधि वार । रविउदयापूर्वीं घडीभर ।
	समाधिस्थ झाले गुरुवर । योगनिद्रा घेतली ॥ ३९ ॥
	ब्रह्मानंदांची वाट पाहिली । मग गोठणीं चिता सिद्ध केली ।
	विमानीं मूर्ति बैसविली । पूजा आरत्या करोनी ॥ ४० ॥
	रामनामगजर करिती । बुक्का सुमनें उधळिती ।
	तुळशीमाळा कंठी घालिती । नमन करिती वेळोवेळां ॥ ४१ ॥
	जेव्हां बलभीमरूप देखिलें । तेव्हां भक्त आनंदले ।
	शोक आल्हाद एके वेळे । नांदतसे गुरुक्षेत्री ॥ ४२ ॥
	एकादशी भौमवारीं । गोठणीं राहिली स्वारी ।
	पंचभूतांची सामग्री । पंचभूतीं मेळविली ॥ ४३ ॥
	केळीचे खुंट बांधिले । दहनस्थान सुशोभित केले ।
	गोमयें सडे सिंचिले । रांगोळ्या गुलाल घालिती ॥ ४४ ॥
	आप्तसंबंधी श्रींचे । चुलतबंधु श्रीपती हस्तें त्यांचे ।
	वेदोक्त अंत्यविधीचें । कार्य करविलें ॥ ४५ ॥
	चितेसी दिधला अग्न । तंव भवानराव नामेंकरून ।
	भक्त होते भावसंपन्न । उडी घेऊं धांवती ॥ ४६ ॥
	बहुतीं तया आवरिला । दुःखाचा कडेलोट झाला ।
	गोंदवल्याचा आत्मा गेला । सोडोनि आम्हां दीनांसी ॥ ४७ ॥
	चहूंदेशी पसरली मात । धांवोन येती गुरुभक्त ।
	अंतयोग किं निमित्त । केला वदती गुरुरायें ॥ ४८ ॥
	अप्पासाहेब भडगांवकर । आले सोडून पंढरपूर ।
	गुरुचरणीं भाव थोर । दुःखी अत्यंत जाहले ॥ ४९ ॥
	ते दिवसापासोनि । व्यवस्था सर्व केली त्यांनी ।
	यात्रा भरली गुरुभुवनीं । नामगजर अखंड ॥ ५० ॥
	तिसरे दिवशीं रक्षा भरणें । करिती सर्वही दुःखानें ।
	आईसाहेब यांची कंकणे । निघालीं पूर्वींसारखीं ॥ ५१ ॥
	चतुर्दश दिनपर्यंत । अखंड नामगजर होत ।
	अन्नसंतर्पण वेदोक्त । विधि सर्व सांग केला ॥ ५२ ॥
	समाधीचे तिसरे दिवशीं । कांही वैश्य तेलंगण देशी ।
	आले अनुग्रह घ्यावयासी । तों विपरीत देखलें ॥ ५३ ॥
	धाय मोकलोन रडों लागले । संतसज्जनीं अव्हेरिलें ।
	आमुचें भाग्य नाहीं उदेले । आतां आम्हां गति कैसी ॥ ५४ ॥
	आम्ही सत्य प्रारब्धहीन । माय गेली आम्हां त्यजून ।
	समजाविती समस्त जन । स्थिर रहा म्हणोनी ॥ ५५ ॥
	ब्रह्मानंद शीघ्र येतील । तुम्हां अनुग्रह करतील ।
	गुरुरूप ज्ञाते सखोल । पूर्ण अधिकारी ॥ ५६ ॥
	ऐसें तयांसी कथिलें । हो, जी म्हणोनि राहिले ।
	रात्रीं तेथें अभिनव घडलें । तें परिसा सज्जनहो । ५७ ॥
	पहांटे सर्वांसी दृष्टांती । दर्शन देत गुरुमूर्ति ।
	ब्रह्मानंद शीघ्र न येती । मीच देतों अनुग्रह ॥ ५८ ॥
	संकल्प पूजा करवोन । अनुग्रह दिधला तयांलागोन ।
	सर्वांचे आनंदलें मन । वारंवार वंदिती ॥ ५९ ॥
	तुमचा कार्यभाग झाला । जावें वदती स्वस्थानाला ।
	तैसीच जपासाठीं माला । प्रत्यक्ष तेथें ठेविली ॥ ६० ॥
	प्रातःकाळी उठोन वदती । आम्हीं देखिली गुरुमूर्ति ।
	एकमेकांसी तेंचि कथिती । मज अनुग्रह दिधला सद्गुरूंनी ॥ ६१ ॥
	वृद्धा सांगे वृत्तांत । स्वप्नीं माळा मजप्रत ।
	दिधली ती पुढ्यांत । प्रत्यक्ष पाहोन आनंदती ॥ ६२ ॥
	ऐसा घडला चमत्कार । पाहों येती नारीनर ।
	नमन करिती वारंवार । गुरुप्रसादमाळेसी ॥ ६३ ॥
	आणिक बहुतां दृष्टांत । जाहले मी येथें सत्य ।
	मानूं नका मनीं किंत । भाव तैसा भेटेन ॥ ६४ ॥
	माझे आज्ञेनुसार चालतां । जवळचि असें मी सर्वथा ।
	अज्ञानापरी शोक करितां । यास काय म्हणावें ॥ ६५ ॥
	ऐसे बहुतां निरोपिलें । तेंचि आम्हीं अनुभविलें ।
	समाधी पाहतांच झालें । परम समाधान ॥ ६६ ॥
	संकटीं दृष्टांतें बोधिती । अपरोक्षपणें साह्य करिती ।
	भाविकापाशीं नित्य वसति । सद्गुरुमहाराजांची ॥ ६७ ॥
	असो दहनाचे तिसरे दिवशीं । काढोनि ठेविलें अस्थींसी ।
	रक्षा माहुली संगमासी । न्यावया भरोनि ठेविली ॥ ६८ ॥
	इकडे लोकव्यवहारकारण । नित्य देती पिंडदान ।
	मुक्तासी कैचें बंधन । आधींच त्रैलोक्य जिंकिलें ॥ ६९ ॥
	परि समर्थांची शिकवण ऐसी । सिद्ध असोन साधनासी ।
	आदरें करिती जिवानिशीं । वदती व्यवहार न सांडावा ॥ ७० ॥
	तोचि क्रम करिती येथ । क्रिया करिती वेदोक्त ।
	दशमदिनीं भागवत । आले संत गुरुक्षेत्रीं ॥ ७१ ॥
	ज्ञानदाता पित्यासमान । बहुतीं मानूनियां जाण ।
	ते दिनीं करिती मुंडण । मायबाप गुरुराव ॥ ७२ ॥
	ऐसा चतुर्दश दिनपर्यंत । उच्छाह केला अपूर्व बहुत ।
	पादुका स्थापोन तेथ । उपासना चालविती ॥ ७३ ॥
	गोप्रदानें धनदानें । अन्नदानें वस्त्रदानें ।
	करिती विप्रांची पूजनें । गुरुरूप मानोनी ॥ ७४ ॥
	कोणी तेथे लोळण घेती । विभूति अंगी लाविती ।
	पूजाअर्चा समग्र करिती । कोणी घालिती प्रदक्षिणा ॥ ७५ ॥
	येणेंपरी गुरुमाउली । समाधिरूप दृश्य नटली ।
	अखंडत्वें असे भरली । अंतर्बाह्य व्यापक ॥ ७६ ॥
	आतां मागील व्यवस्था । पुढील समासीं येईल कथा ।
	श्रोतीं स्थिर करोनि चित्ता । अमृतपान करावें ॥ ७७ ॥
	॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
	श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
	 
	अध्याय बारावा
	समास दुसरा
	 
	इकडे ब्रह्मानंदांनीं । गुरुआज्ञा आणोनि ध्यानी ।
	न येती गुरुसदनी । तेथेंचि उच्छाह मांडिला ॥ १ ॥
	व्यंकटापूर मंदिरांत । नामसप्ताह उभारित ।
	दातृत्वासी नाहीं मित । याचक बहु तोषविले ॥ २ ॥
	ते सिद्ध ज्ञानी विरक्त । परमप्रतापी गुरुपुत्र ।
	वियोग न शिवे तेथ । अनन्य भक्त सच्छिष्य ॥ ३ ॥
	गोप्रदानें धनदाने । नाना अन्नसंतर्पणें ।
	नाना उपदेशवचनें । अनंत जीव शांतविती ॥ ४ ॥
	इकडे गोंदवल्याची स्थिति । परिसा चालली कैशा रीति ।
	राम-दत्त-मंदिराप्रति । सेवा कैसी चालली ॥ ५ ॥
	समर्थें आधीं एक संवत्सर । यथाविधि नेमले मुखत्यार ।
	जमिनी वांटल्या सत्वर । राम दत्त शनीकडे ॥ ६ ॥
	कांही जमीन कुटुंबासी । ठेविली असे निर्वाहासी ।
	बाकी सर्व अधिकार पंचांसी । आपुलेपरी दिधले ॥ ७ ॥
	पंच परिसावे चतुर । ब्रह्मानंद भक्त थोर ।
	आप्पासाहेब भडगांवकर । साठये आणि त्यात्याराव ॥ ८ ॥
	थोरले राममंदिरांत । पुजारी गोपाळराव अद्वैत ।
	धाकटे मंदिरीं मेहुण्याप्रत । रामसेवा सांगितली ॥ ९ ॥
	दत्त आणि श्रीशनीश्वर । येथील पूजाधिकार ।
	बाळंभट्ट कुरवलीकर । यांसी दिधले गुरुरायें ॥ १० ॥
	नित्यनेम पूजाविधान । आल्या अतिथा अन्नदान ।
	यथाशक्ति समर्पून । रामसंस्थान चालवावें ॥ ११ ॥
	ऐसी व्यवस्था गोंदावलीसी । पंचांमार्फत केली खाशी ।
	कोणी करील कुचराईसी । तरी दुजा नेमावा ॥ १२ ॥
	जैसा देश तैसा वेश । म्हणोनि लेख विशेष ।
	येरवीं त्रिकाळ सत्ताधीश । सद्गुरु अंतर्बाह्य ॥ १३ ॥
	इकडे समाधिस्थानावरती । भवानराव व्यवस्था पाहती ।
	जतन करोनि अस्थि । उपासना चालविली ॥ १४ ॥
	अस्थि न्यावया प्रयागासी । मागों जातां तयांपासीं ।
	न देती अहर्निशीं । प्राणापरी सांभाळिती ॥ १५ ॥
	तंव ब्रह्मानंद यांनी । पत्र दिधलें लिहोनी ।
	हरिभाऊ हरिदास यांनीं । अस्थि न्याव्या प्रयागीं ॥ १६ ॥
	पत्र दावितां भवानरावांसी । निमूट देती अस्थींसी ।
	घेऊन चालले प्रयागासी । हरिभाऊ गुरुभक्त ॥ १७ ॥
	पंतोजी येरळवाडीकर । हेही निघाले बरोबर ।
	तंव पत्र देती जालनेकर । तोही प्रकार परिसावा ॥ १८ ॥
	आनंदसागर महाभक्त । श्रींचे आधीं देह ठेवत ।
	घेवोनि त्यांचे अस्थींप्रत । गंगास्नाना निघाले होते ॥ १९ ॥
	मार्गीं हर्द्यासी महाराज- । दर्शना अनुज्ञें गेले सहज ।
	तंव वदले सद्गुरुमहाराज । अस्थि येथेंच ठेवाव्या ॥ २० ॥
	आम्ही जाऊं नंतरे । तेव्हां नेऊं गंगेउदरीं ।
	म्हणोनि कपाटभीतरीं । स्वहस्तें अस्थि ठेविल्या ॥ २१ ॥
	याउपरि समर्थ कांहीं । हर्द्यासी पुन्हां गेले नाहीं ।
	योग दिसे ऐसाचि पाहीं । अस्थिसंगें अस्थि न्याव्या ॥ २२ ॥
	समर्थ निघाले स्नानासी । मुक्काम जाहला हर्द्यासी ।
	संगें घेवोनि सच्छिष्यासी । मार्ग क्रमिते जाहले ॥ २३ ॥
	जालना मठींचे पत्र आलें । तैसें हर्द्यासी उतरले ।
	जेथें गुरुआज्ञें होते राहिले । भैय्यासाहेब इंदुरकर ॥ २४ ॥
	मागें श्रीगुरुआज्ञापिती । आम्हीं येऊं पुढती ।
	तंववरी येथेंचि रहा निश्चितीं । रामसेवा करोनी ॥ २५ ॥
	विष्णुबुवा कुंभोजकर । हेही आले सत्वर ।
	अस्थि गेऊनि सपरिवार । त्रिवेणीसी चालले ॥ २७ ॥
	मसुरियादीन शिवमंगल । उपाध्ये श्रींचे तेथील ।
	अस्थि घेऊन भक्तमंडळ । पावलें तया ठायीं ॥ २८ ॥
	बाबूभट्ट काशीकर । पटाईत मावशी भाविक चतुर ।
	आल्या ताई इंदुरकर । अस्थिविसर्जनाकारणें ॥ २९ ॥
	आणिकही भक्त बहुत येती । कांहीं केली उपपत्ती ।
	नामगजरें दोन्ही अस्थि । त्रिवेणीसंगमीं मेळविल्या ॥ ३० ॥
	द्रव्यदानें गोप्रदानें । दिधली भक्त मंडळीनें ।
	नानापरीनें स्तवनें । मुखीं गाती समर्थांचीं ॥ ३१ ॥
	असो हरिभक्त हरिदास यांनीं । अस्थि विसर्जन करोनी ।
	निघाले शीघ्र तेथोनी । गुरुभुवनीं यावया ॥ ३२ ॥
	इकडे माहुलीसंगमाप्रत । रक्षा पोंचवावी हा हेत ।
	धरोनि निघाले भक्त । भडगांवकर आदिकरोनी ॥ ३३ ॥
	अण्णासाहेब घाणेकर । श्रीगुरूंचे भक्त थोर ।
	बाबासाहेब दांडेकर । इत्यादि भक्त निघाले ॥ ३४ ॥
	माहुली पवित्र संगमस्थानी । रक्षा दिधली सोडूनी ।
	सवेंचि निघाले तेथूनी । सज्जनगडीं पावले ॥ ३५ ॥
	तेथील समर्थसमाधी । पाहतां हरल्या मनोव्याधी ।
	ऐसीचि श्रींची समाधी । बांधूं ऐसें योजिती ॥ ३६ ॥
	दर्शन घेवोन परतले । मनीं चिंतिती पाउलें ।
	बहुत उदासीन झाले । संतसंगतीवियोगें ॥ ३७ ॥
	प्रयाग माहुलीसी जन । आले कार्यें करून ।
	मनी ध्याती श्रीगुरुचरण । वियोगदुःख अनिवार ॥। ३८ ॥
	ब्रह्मानंद सच्छिष्य । आले रामनवमीस ।
	उत्साह दहा दिवस । आनंदीआनंद बहु केला ॥ ३९ ॥
	बोध करूनी सकळांसी । वदती समर्थ नसती दूरदेशी ।
	प्रकट गुप्त भेदासी । दुजा भेद असेना ॥ ४० ॥
	गुरुआज्ञा जे मानिती । वचनीं विश्वास ठेविती ।
	साधनीं देह झिजविती । तयां पूर्वींसारिखे ॥ ४१ ॥
	तयांसी घडे दर्शन । तयांसवें संभाषण ।
	नाना संकटी धांवोन । पाठींपोटीं रक्षिती ॥ ४२ ॥
	सद्गुरु त्रिकाळ शाश्वत । ये विषयीं न धरावा किंत ।
	भाव ठेवाल तैसा हेत । पुरेल जाणा निश्चयें ॥ ४३ ॥
	जेथ भाविक सच्छिष्य । तये ठायीं अखंड वास ।
	गोंदावलीं नित्य प्रत्यक्ष । समाधिठायीं वास करिती ॥ ४४ ॥
	याची पहावी प्रचीति । समाधि घेतल्यावरती ।
	तैलंगणचे लोकांप्रति । अनुग्रहमाला दिधली असे ॥ ४५ ॥
	कित्येकांसी दृष्टांत झाले । कित्येकां प्रत्यक्ष भेटले ।
	कित्येकांसी आज्ञापिलें । साधनमार्ग साधाया ॥ ४६ ॥
	समाधीची सेवा करितां । पुरविती भाविकांचे आर्ता ।
	रामनाम मुखीं गातां । हृदयीं वास प्रत्यक्ष ॥ ४७ ॥
	वारंवार वदत होते । सगुण जाईल विलयातें ।
	शाश्वत सद्गुरुपदातें । दृढ ध्यानीं धरावें ॥ ४८ ॥
	येथें आळस ज्यानें केला । तया वियोग भासला ।
	आज्ञाधारकांसी भरला । अंतर्बाह्य सद्गुरु ॥ ४९ ॥
	तुम्ही श्रींचे सच्छिष्य । विवेकी ज्ञानी विशेष ।
	तरी शोकें न व्हा उदास । अज्ञानियांसारिखे ॥ ५० ॥
	गुरुचरणीं भाव धरा । अखंड नाम पीयुष झरा ।
	सेवितां वियोग न स्मरा । क्षणार्धही माउलीचा ॥ ५१ ॥
	असो ऐसें बोधून सकळां । दुःखभार दूर केला ।
	मग पुढील कार्याला । आंखोन देती ॥ ५२ ॥
	आप्पासाहेब भडगांवकर । दुजे दामले भाविक चतुर ।
	यांसी नेमून मुखत्यार । समाधिसेवा चालविली ॥ ५३ ॥
	सज्जनगडीं जैशा रीती । भूगर्भीं श्रींची वसति ।
	वरती ठाण रघुपती । ध्यान शोभे साजिरें ॥ ५४ ॥
	तैसेंचि गोठणी सुंदर । दहनस्थानीं काढिलें विवर ।
	पाया भरोनि सत्वर । चिरेबंदी बांधिलें ॥ ५५ ॥
	दूरदेशींचे पाषाण । आणिले शुभ्र शोभायमान ।
	मृदुत्वें दुजे दर्पण । चित्रविचित्र रंगाचे ॥ ५६ ॥
	मुंबापुरीहून सिंहासन । घाणेकर देती करवोन ।
	श्रीभागवत कुर्तकोटीहून । पादुका आणविती ॥ ५७ ॥
	पूर्वींच श्रींचे आज्ञेवरोनी । करविल्या होत्या भागवत यांनीं ।
	सुशोभित नागभूषणीं । चित्त वेधिती सकलांचे ॥ ५८ ॥
	असो श्रीब्रह्मानंद । साहित्य जमविती शुद्ध ।
	कारागीर आणवोनि प्रसिद्ध । समाधिस्थान शोभविलें ॥ ५९ ॥
	शके अठराशें छत्तिसांत । मार्गशीर्ष कृष्णपक्षांत ।
	प्रतिपदीं शुभमुहूर्त । वेदोक्त पादुका स्थापिल्या ॥ ६० ॥
	विद्वान् सत्त्वस्थ ब्राह्मण । आणविले देशोदेशींहून ।
	वेदोक्त विधिविधान । आणिक प्रचंड नामगजर ॥ ६१ ॥
	जे स्वानंदसुखाचे भोक्ते । ब्रह्मानंद स्थिपिती स्वहस्तें ।
	अनंत भावना एकचित्तें । गुरुरूपें दृढ झाल्या ॥ ६२ ॥
	गोमयें स्थान शुद्ध केलें । वरी श्री शोभविले ।
	ब्रह्मानंदी प्रकट केले । वेदोक्त भक्तिमार्गानें ॥ ६३ ॥
	अनंत जीवांच्या यातना । हरती घडलिया दर्शना ।
	समाधी पाहातां समाधाना । वरितें मन ॥ ६४ ॥
	प्रत्यक्ष नांदे गुरुराव । किती वर्णूं मी वैभव ।
	समक्ष पहावा अनुभव । विकल्परहित भावनेनें ॥ ६५ ॥
	असो प्रतिपदेपासोनि । उच्छाह पुण्यतिथीदिनीं ।
	दशमी दिधला नेमोनी । ब्रह्मानंदसाधुवरें ॥ ६६ ॥
	नामस्मरण अन्नदान । पुराण कीर्तन आणि भजन ।
	पादुका शिबिकारोहण । मिरवणूक रामभेटीं ॥ ६७ ॥
	दहा दिवसपर्यंत । उच्छाह नामगजरांत ।
	चहूं देशींचे येती भक्त । गुरुपदीं नत व्हाया ॥ ६८ ॥
	श्रीसमर्थ संस्थान गोंदवलें । हें संस्थेचें नाम ठेविलें ।
	सुज्ञ पंच नेमियेले । ब्रह्मानंद सिद्धांनी ॥ ६९ ॥
	दामले आणि भडगांवकर । श्रींचा प्रसाद तयांवर ।
	अंतरीं राहोनि गुरुवर । कार्यभाग चालविती ॥ ७० ॥
	लोकसंग्रही कार्यकर्ते । अति लीन गुरुपदातें ।
	साधनीं दक्ष जे निरुते । गुरुभक्त पुढारी ॥ ७१ ॥
	समाधी प्रथम संवत्सरीं । श्रीब्रह्मानंद यांची स्वारी ।
	स्वयें करोन चाकरी । मार्ग आंखोन ठेविला ॥ ७२ ॥
	तैसाचि चालिला परिपाठ । नाम भेदी स्वर्गकपाट ।
	अन्नसंतर्पण अफाट । देव प्रसाद वांच्छिती ॥ ७३ ॥
	देशोदेशींचे गुरुभक्त । साधक सिद्ध पंडित ।
	वैदिक भाविक सत्त्वस्थ । किती येती गणवेना ॥ ७४ ॥
	पुराणिक आणि हरिदास । गायक करिती स्तुतीस ।
	नवसीकही बहुवस । नवस फेडिती नानापरी ॥ ७५ ॥
	कोणी लोटांगणे घालिती । कोणी शर्करा वांटिती ।
	वार्याो तरी किती करिती । गुरुवार आणि पौर्णिमा ॥ ७६ ॥
	कोणी प्रदक्षिणा घालिती । कोणी गुरुद्वारीं झाडिती ।
	सेवा ऐसी नानारिती । किती प्रकार सांगावा ॥ ७७ ॥
	कामना पुरती अनेक । देहव्याधी कितीयेक ।
	मुक्त करिती गुरुनायक । सेवा करितां भक्तीनें ॥ ७८ ॥
	असो प्रपंच आणि परमार्थ । समाधी पुरविते आर्त ।
	साक्षात् सद्गुरु समर्थ । तेथें वास करिताती ॥ ७९ ॥
	ऐसें तीर्थ श्रीक्षेत्र । विख्यात होईल सर्वत्र ।
	बहुत साधितील अर्थ । प्रपंचीं आणि परमार्थीं ॥ ८० ॥
	॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
	॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
	अध्याय बारावा
	समास तिसरा
	 
	॥ श्रासद्गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः ॥
	समाधी क्षेत्र स्थापिलें । पाकगृह भव्य केलें ।
	धान्याचें कोठार भरलें । अन्नछत्र गुरुगृहीं ॥ १ ॥
	सज्जनगडीं उच्छाहपद्धति । तैसीच येथेंहे ठेविती ।
	दुर्लभ सेवा अंगीकारिती । सच्छिष्य बहुतांपरी ॥ २ ॥
	श्रींची मूर्ती उचलणे । हें जालना मठानें करणें ।
	भालदार चोपदार ललकारणें । आटपाडी आणि पंढरी ॥ ३ ॥
	येथील मंदिरवासी यांनी । सेवा घेतली नेमोनी ।
	अबदागिर्यार श्रींचे स्थानीं । धरिती तेही परिसावे ॥ ४ ॥
	मोरगिरी आणि सोलापूर । येथील मठपती साचार ।
	सूर्यपानें सद्गुरुवर । धरिती बहुप्रीतीनें ।
	विटेंकर भांडारे । गोंदवलेंवासी दुसरे ।
	नित्य वारिती चामरें । महोत्साहीं गुरुगृहीं ॥ ६ ॥
	बेलधडी आणि गिरवीकर । मंदिरवासी भक्त थोर ।
	मोर्चलें वारिती साचार । विंझणेकरी परिसावे ॥ ७ ॥
	म्हासुर्णें आणि कुरवलीकर । मंदिरवासी भक्त थोर ।
	विंझणें वारिती प्रेमें फार । श्रीचरणीं प्रीतीनें ॥ ८ ॥
	नामधारक भक्त प्रजा । छत्रपति गुरुमहाराजा ।
	यांचे सोहाळ्यांतील समाजा । कर्हातड मठपति छत्र धरी ॥ ९ ॥
	रुमालवाले दोघेजण । बाळकूबुवा कलेढोण ।
	गोविंदबुवा कुरवलीकर जाण । प्रेमळ भक्त श्रींचे ॥ १० ॥
	धनुष्यबाण चौघे धरिती । कागवाड पाटण खेर्डी वदती ।
	तैसीच सांगली मंदिराप्रती । सेवा दिधली नेमोनी ॥ ११ ॥
	दिवट्या पाजळिल्या कोणी । तेंही परिसावें सज्जनीं ।
	हरदा आणि शेंदुरजणी । मांडवें आणि दहिवडी ॥ १२ ॥
	नित्य पूजाअर्चन भीमराव । मोडक कुशल पूर्ण ।
	चित्रविचित्र शृंगारून । मन वेधिती सकळांचें ॥ १३ ॥
	म्हासुर्णेकर शास्त्रीबुवा गुणी । पुराण वाचिती श्रीसदनीं ।
	कीर्तनसेवेलागोनी । बहुत येती गुणीजन ॥ १४ ॥
	परि सांगलीकर हरिदास । लळित नेमलें सेवेस ।
	सांगलीकर फडणवीस । आरती धरिती भक्तीनें ॥ १५ ॥
	शालिग्राम गुरुजी विद्वान् । सेवा करिती तबक व्यंजन ।
	देशपांडे आटपाडीकर जाण । घोडा धरिती श्रींपुढे ॥ १६ ॥
	माळी भक्त दहिवडीचे । वाहन झाले श्रींचे ।
	पालखे धरोन साचे । गुरुसेवा साधिती ॥ १७ ॥
	शिवणीकर नापित येवोन । दर्पण दावित श्रींलागोन ।
	गरुडटके धरिती जाण । हुबळीचे मठपती ॥ १८ ॥
	रांगोळ्या घालिती केतकर । चित्रविचित्र मनोहर ।
	गंध उपाध्याय चतुर । सकळांसी लाविती ॥ १९ ॥
	बारसवडे गोंदवींचे । काज करिती उच्छिष्टाचें ।
	गोमयगोळा घेवोन वेंचे । उच्छिष्टें तेही परिसावी ॥ २० ॥
	दत्तोपंत इंदोरकर । लेखक भाविक सात्त्विक थोर ।
	गोरक्षणीं साह्यकार । श्रीचरणीं देह लाविती ॥ २१ ॥
	दाढे उपनामक अंताजीपंत । कीर्तनसमयीं बुका लावित ।
	आरती श्रींसी ओंवाळित । खिरापत वांटिती ॥ २२ ॥
	अत्तरगुलाव तांबूलोपचार । पुष्पमालादि सोपस्कार ।
	श्रींचे दरबारीं पुणेंकर । सेवा घेती नेमोनी ॥ २३ ॥
	ऐसे हे गुरुभक्तजन । मिळवतील दुर्लभ स्थान ।
	तयांसी सद्भाकवें नमन । करूं सेवा एवढीच ॥ २४ ॥
	पुढेंही येतील आणीक । सेवितील गुरुसेवासुख ।
	परमार्थी प्रापंचिक । त्यांची गणती कोण करी ॥ २५ ॥
	असो समर्थांची गोशाळा । वांटिली होता पाळावयाला ।
	परि अवर्षणें दिधला झोला । आणूनि सोडिती गुरुचरणीं ॥ २६ ॥
	पुनरपि गोरक्षणसंस्था । स्थापन झाली जी तत्त्वतां ।
	आलीं अनाथांचे नाथा- । पाशीं मूक जनावरें ॥ २७ ॥
	अश्वपालक विश्वनाथ । नारायण कर्नाटकी भक्त ।
	इंदूरकर दत्तोपंत । गोरक्षणीं बहु झटती ॥ २८ ॥
	बसाप्पा तेलंगणदेशी । नामस्मरणें अघ नाशी ।
	देह झिजवी सामाधीपाशीं । मौनव्रत धरोनी ॥ २९ ॥
	ऐसे अनेक सेवा करिती । कांहीं केली उपपत्ती ।
	आतां परिसावी श्रोतीं । समाधिलीला ॥ ३० ॥
	समाधिस्थान विवरीं झालें । वरती मंदिर बांधिलें ।
	गोठणीं गोपाल शोभलें । कैसे तेंही अवधारा ॥ ३१ ॥
	समर्थ जातां गोशाळेसी । विनोदें वदती सर्वांसी ।
	येथें गोपालमंदिरासी । करितां बहु शोभेल ॥ ३२ ॥
	ऐसें वदले बहुत वेळां । तें आठवले जी सकळां ।
	गोशाळे घनसांवळा । श्रीं सन्निध असावा ॥ ३३ ॥
	ब्रह्मानंद सिद्ध यांनी । तेंचि कथिले येवोनि ।
	तेव्हां समाधिशिरस्थानी । गोपालमंदिर बांधलें ॥ ३४ ॥
	कामें वाढलीं बहुवस । तेणें गोपालस्थापना लांबली विशेष ।
	शके अठराशें बेचाळीस । वैशाखीं मुहूर्त शोधिला ॥ ३५ ॥
	श्रीमत् भागवत यांनी । मूर्ति दिधली आणवोनी ।
	पाहतां प्रेम ये भरोनी । गोंडस तेजस हास्यमुख ॥ ३६ ॥
	तें मुरलीधराचें ध्यान । पाहतां वेधितसे मन ।
	यास्तव सुवासिनी येवोन । दृष्ट काढिती वेळोवेळां ॥ ३७ ॥
	सात दिवस नामगजर । केला उत्साह बहु थोर ।
	भक्त येती अपार । गोपालमूर्ति पहावया ॥ ३८ ॥
	वैशाख शुद्ध त्रयोदशी । मूर्ति स्थापिली विधींसी ।
	साठये उपनाम जयांसी । गुरुभक्त यांचेकरवीं ॥ ३९ ॥
	सप्त ठायींची जीवनें । घालिती कृष्णा मंगलस्नानें ।
	वेदघोषे नामस्मरणें । मुरलीधरा बैसविलें ॥ ४० ॥
	हुबळीकर मल्लाप्पा यांनी । खर्च केला ते समयीं ।
	नित्य पूजा उच्छाहीं । नेमणूक करून दिधली ॥ ४१ ॥
	असो ऐसे देव भक्त । एकेस्थळीं शोभा पावत ।
	अनन्याचे अनंत हेत । पुरवावया राहिले ॥ ४२ ॥
	सद्गुरुवास निरंतर । ऐसा रोकडा साक्षात्कार ।
	भाविकांस पैलपार । भावबळें पावविती ॥ ४३ ॥
	नाना नवसांतें पावती । संकटीं दृष्टांती बोधिती ।
	सेवा करितां पुरविती । कामना बहुपरींच्या ॥ ४४ ॥
	अंतरसाक्ष अंतरीं कळे । बाह्य दृश्य तें आढळे ।
	वर्णितां होईल आगळें । ग्रंथसंख्याप्रमाण ॥ ४५ ॥
	परि एखादा दृष्टांत । देऊन पुरवूं मनोरथ ।
	समाधीमाहात्म्य अत्यद्भुत । कोण वर्णूं शकेल ॥ ४६ ॥
	अप्पासाहेब कागवाडकर । स्मृतिहीन झाले फार ।
	ब्रह्मसमंधें जर्जर । केले पूर्वींसारिखे ॥ ४७ ॥
	पुत्रकलत्रा पीडीतसे । गृहकर्त्यासी लाविलें पिसें ।
	तमोबुद्धि गृहीं वसे । उपाय सुचों देईना ॥ ४८ ॥
	ऐसे गेले कांहीं दिवस । चिंता उपजली सर्वांस ।
	मग समाधीसमीप सेवेस । धाडिले मायबंधूंनीं ॥ ४९ ॥
	सेवा करितां बहुवस । श्रीमंत आले स्मृतीस ।
	वारंवार नमिती पदास । ब्रह्मचैतन्यगुरूंच्या ॥ ५० ॥
	पुर्वी जैसे साह्य होती । त्याहून अधिक शीघ्रगति ।
	समाधीसेवेसी पावती । आश्चर्य नारीनरांसी ॥ ५१ ॥
	देहव्याधिमुक्त करिती । निपुत्रिकां पुत्र होती ।
	मुमुक्षुजनां संरक्षिती । पाठी पोटी राहोनी ॥ ५२ ॥
	शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । यांचे स्नुषेसी निशाचर ।
	पीडीतसे वारंवार । घालिती समर्थचरणांवरी ॥ ५३ ॥
	सेवा करितां अतिगहन । पीडा निवारिली दारुण ।
	ऐसें समाधि महिमान । श्रोतेजनीं परिसावें ॥ ५४ ॥
	श्रीचरणीं जे अनन्य । तयांसी प्रत्यक्ष दर्शन ।
	देवोनि करिती समाधान । ब्रह्मचैतन्य सद्गुरु ॥ ५५ ॥
	॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
	॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
	 
	अध्याय बारावा
	समास चवथा
	 
	श्रीसमाधिस्थ झाल्यावरी । मागें वर्तलें कैशापरी ।
	तें आतां श्रोतीं चतुरीं । स्थिरचित्तें परिसावें ॥ १ ॥
	आनंदसागर अनन्य भक्त । जालनामंदिरीं होते वसत ।
	उपासना वाढविली बहुत । कीर्ति पसरली चहूं देशीं ॥ २ ॥
	अंबड येथें मंदिर । बांधोनि स्थापिले रघुवीर ।
	अन्नदान नामगजर । सिद्धपणें वाढविले ॥ ३ ॥
	समर्थ असतां सगुणदेहीं । आनंदसागर झाले विदेही ।
	परिसतां आनंद होई । सिद्धकरणी अघटित ॥ ४ ॥
	माघ शुद्ध पौर्णिमेसी । निघाली स्वारी भिक्षेसी ।
	दासनवमीउत्सवासी । सामग्री पाहिजे ॥ ५ ॥
	मातेसी केला नमस्कार । जे बहुतां दिवशीं होता स्थिर ।
	पाहोनि आश्चर्य नारीनर । मनीं मानूं लागले ॥ ६ ॥
	विदेशप्रयाण निमित्त । करोनि आज्ञा घेतली त्वरित ।
	माउली खोंचली मनांत । पुढील भविष्यार्थ जाणोनि ॥ ७ ॥
	आज्ञा घेवोनि निघाले । एके ग्रामीं वसतीस आले ।
	तेचि दिनीं ग्रस्त केलें । राहूनें चंद्रासी ॥ ८ ॥
	भजन निर्याणअ्भंग । करुणारसें होती दंग ।
	चतुर श्रोतयां तगमग । होवों लागली अतिशय ॥ ९ ॥
	वासुदेव नामें सुतारासी । पाचारिलें एकांतासी ।
	वदले आम्ही जाऊं वैकुंठासी । तुज इच्छा असेल तें माग ॥ १० ॥
	तों तो करूं लागला शोक । हास्य करी गुरुनायक ।
	अरे हें शोकाचें कौतुक । पुढें आहे ॥ ११ ॥
	सगुणीं सगुण लोपलें । निर्गुण जैसें तैसें भरले ।
	यांत विपरीत काय झालें । वायां शोक न करावा ॥ १२ ॥
	ऐसें करितां सांत्वन । हस्त जोडोनि बोले दीन ।
	इच्छा होईल तें दर्शन । येचि स्वरूपीं मज द्यावें ॥ १३ ॥
	बरें म्हणोनि तयासी । आले पुनरपि भजनासी ।
	प्रेमें अश्रु नयनांसी । आणिले समस्त जनांच्या ॥ १४ ॥
	वारंवार पुसों लागले । ग्रहण सुटलें वा न सुटलें ।
	सुटलें म्हणतांच संपविलें । निरूपण ते समयीं ॥ १५ ॥
	नामगजर सुरू केला । देह श्रीचरणीं ठेविला ।
	आत्मा रामरूपीं मिळाला । ठायींचे ठायीं ॥ १६ ॥
	शोक करिती नारीनर । मग केला अग्निसंस्कार ।
	समाधि बांधावी हा विचार । शिष्यांअंतरीं प्रगटला ॥ १७ ॥
	तंव आज्ञा झाली दृष्टांतासी । करितां रामसेवेसी ।
	आम्हा पावेल निश्चयेंसी । समाधी वेगळी करूं नये ॥ १८ ॥
	आनंदसागर वैराग्यशील । समाधि उपाधि केवळ ।
	त्यजोनि राहिले निश्चळ । रामरूप होवोनी ॥ १९ ॥
	असो जननी भार्या दोन सुत । दोन कन्या तयांप्रत ।
	पांडुरंगबुवा जामात । समर्थें शोधोनि काढिला ॥ २० ॥
	रामजीबुवा शिष्य भले । पांडुरंग दुजे वहिले ।
	दोहीं संस्थान चालविलें । श्रींचे आज्ञेवरोनी ॥ २१ ॥
	वडील सुत नामस्मरणीं । देह ठेविता झाला धरणीं ।
	धाकटा पुरुषोत्तम म्हणोनी । अज्ञान बालक मठपती ॥ २२ ॥
	श्रींचे दुजे शिष्य ब्रह्मानंद । ज्यांनी जाणिले गुरुपद ।
	तयांची कथा प्रसिद्ध । अल्पशीं कथन करूं ॥ २३ ॥
	श्रींची समाधि स्थापिली । उत्सव पूजा आंखोन दिली ।
	उपासना अत्यंत वाढविली । कर्नाटकप्रांतीं ॥ २४ ॥
	परि स्वयें राहिले अलिप्त । कृष्णातीरीं समाधिस्थ ।
	जाहले तो प्रकार संत- । सज्जनीं थोडा परिसावा ॥ २५ ॥
	शके अठराशेंचाळीस । भाद्रपद कृष्णमास ।
	फिरत आले कागवाडास । रामभेटीनिमित्त ॥ २६ ॥
	विश्रांती घेऊं चार दिवस । म्हणोनि सांगती सर्वांस ।
	मुंडलाप्पा नामें शिष्यास । कर्नाटकीं धाडिलें ॥ २७ ॥
	एकही शिष्य ते वेळीं । नसे ठेविला जवळीं ।
	गुरुभक्तांचे मेळीं । काळ क्रमित राहिले ॥ २८ ॥
	सांगलीहूनि हरिदास । आले तेथें दर्शनास ।
	बरें म्हणोन तयांस । ठेवोन घेती आनंदें ॥ २९ ॥
	आम्हां पोंचवावें आणि जावें । ऐसें वदती स्वभावें ।
	परि सूक्ष्म अर्थाचे गोंवे । उमजतीना कवणासी ॥ ३० ॥
	वद्य चतुर्दशी गुरुवार । प्रातःकाळी उठोनि सत्वर ।
	रामदासी कागवाडकर । आणि हरिभाऊंस पाचारिलें ॥ ३१ ॥
	सहज विनोदें बोलती । क्वचित् झाल्या देहगेति ।
	अग्नि न द्या तयाप्रति । कृष्णागर्भीं सोडावा ॥ ३२ ॥
	स्नाम करोनि मोकळें । व्हावें दुःखावेगळें ।
	संतमाहात्म्य न कळे । कोणाएकासी ॥ ३३ ॥
	आप्पासहेब कागवाडकर । गुरुभक्त इनामदार ।
	नवबाग नामें सुपीक थोर । कृष्णातीरीं मळा असे ॥ ३४ ॥
	तेथें गेले स्नानासी । वाळेश्वर क्षेत्रासी ।
	स्नान करोनि वस्तीसी । राहिले तेथें गुरुवारीं ॥ ३५ ॥
	गुरुसेवा उपोषण । करिती शेवटचा म्हणोन ।
	हरिभाऊ संगती जाण । एकले एक ॥ ३६ ॥
	अनंत शिष्य अनंत शरण । सकलां दूर करोन ।
	राहिले करीत नामस्मरण । नवबागीं कदंबछाये ॥ ३७ ॥
	सायंकाळी केले भजन । आळविले दयाघन ।
	गुरुपादुका वंदोन । स्तवन करिती बहुपरी ॥ ३८ ॥
	त्यांतचि निरूपण केलें । हरिदास श्रोते भले ।
	देहबंधनानें भुलले । मानोनि जीवदशा ॥ ३९ ॥
	ही देहरूप उपाधि । मानीव चाळविते बुद्धि ।
	सत्याची दवडोन शुद्धि । जीवात्म्यासी गुंतवी ॥ ४० ॥
	चार देह चार अवस्था । ज्ञानी राहे यांपरता ।
	तयासी लिंगदेह सोडितां । गुंतीं नाहीं तिळभरी ॥ ४१ ॥
	ऐसें करोनि निरूपण । पुनरपि करोनि भजन ।
	धूप दीप आरती करोन । सांग केली गुरुसेवा ॥ ४२ ॥
	एक प्रहर राहतां निशी । नाम श्वासधारेसरसीं ।
	स्थिर करोनि वृत्तीसी । एकलयें चालविली ॥ ४३ ॥
	तेज फांकले चहूंकडे । दृष्टीसी दृष्टी न भिडे ।
	स्थूलापासोन मुरडे । चैतन्न्य श्रीरामरूपीं ॥ ४४ ॥
	प्रातःकाळसमयासी । रामचरणतीर्थासी ।
	घेवोनि आले रामदासी । ब्रह्मानंदां द्यावया ॥ ४५ ॥
	आनंदें मुख पसरोनि । तीर्थ घेतलें तयांनी ।
	श्रीरामप्रभूचे चरणीं । वंदन केलें हस्तद्वयें ॥ ४६ ॥
	इकडे चालिला नामगजर । ब्रह्मानंद झाले स्थिर ।
	पाहतां पाहतां व्यापार । दृश्य तें स्थिर झालें ॥ ४८ ॥
	मग नामगजरें कलेवर । नेलें सन्निध बाळेश्वर ।
	पूजा आरत्या करोनि सत्वर । जलसमाधि दीधली ॥ ४९ ॥
	सकळांसी जाहलें दुःख । अनिवार करिती शोक ।
	दुजे आमचे गुरुनायक । तिहीं त्यजिलें आम्हांसी ॥ ५० ॥
	असो नवबागीं बांधिती समाधी । दर्शना येते भक्तमांदी ।
	श्रीमंतें पूजाअर्चनविधी । व्हावया भूमि दिधली असे ॥ ५१ ॥
	तिकडे व्यंकटापूर देवस्थानीं । समाधी पूर्वींच बांधोनी ।
	तेथेंच पादुका स्थापोनी । भक्त करिती उत्सव ॥ ५२ ॥
	श्रीपादभट्ट व जोगळेकर जाण । साधक शिष्य अनन्य ।
	तयांसी कथिलें संस्थान । चालवावें श्रीसेवे ॥ ५३ ॥
	बेलधडी आणि बिदरहळ्ळी । येथील देवस्थानें भलीं ।
	पूर्वींच व्यवस्था केली । जेथील तेथें ॥ ५४ ॥
	गोंदावलीं कळली मात । सकलही झाले दुःखित ।
	आईसाहेब वदती तेथ । तेंही श्रोतीं परिसावें ॥ ५५ ॥
	समर्थ गेलियानंतर । ब्रह्मानंदे केलें स्थिर ।
	वदती असतां मी तुमचा कुमर । शोक कासया करावा ॥ ५६ ॥
	वारंवार उपदेशुनी । बोधें चित्त शांतवुनी ।
	गुरुभक्तां गुरुजननी । वाटे दुजी अवतरली ॥ ५७ ॥
	तोही झाला समाधिस्थ । आतां काय करणें जिवित ।
	म्हणोनि अन्न वर्जित । गुरुभार्या गोंदावलीं ॥ ५८ ॥
	पयःपान क्वचित् करिती । मनीं पतिचरण ध्याती ।
	एक मासाउपरांतीं । देह धरणीं ठेविला ॥ ५९ ॥
	आश्विन कृष्ण दर्शतिथी । आईसाहेब आम्हां सोडिती ।
	दहन करून समाधी करिती । श्रींचे वामभागप्रति ॥ ६० ॥
	प्रतिवर्षीं उत्सवास । करिताति अमावस्येस ।
	स्नान पूजा नैवेद्यास । नित्य चाले उपासना ॥ ६१ ॥
	बत्ताशा श्रींचे वाहन । परम भक्त जो अनन्य ।
	तेणेंही त्यजिला प्राण । श्रींचे चरणांसमोर ॥ ६२ ॥
	तयाची बांधिली समाधी । श्रींचे पुढें भक्तमांदी ।
	दर्शन घडे श्रींचे आधीं । गुरुसेवा परम भाग्य ॥ ६३ ॥
	असो ऐसा इतिहास । समाधीचा कथिला निःशेष ।
	श्रवण करितां वैराग्यास । वरील मन निश्चयें ॥ ६४ ॥
	उपजेल तितुकें मरेल । घडेल तितुकें बिघडेल ।
	परि सत्कीर्ति श्रवणीं पडेल । अनंतकाल पर्यंत ॥ ६५ ॥
	सत्कर्म अथवा दुष्कर्म । उभयतांचा एकचि धर्म ।
	भोग भोगवील परम । सुखदुःख निश्चयें ॥ ६६ ॥
	यास्तव संतचरित्र । विवरोन व्हावें स्वतंत्र ।
	कर्मबंधनाचें सूत्र । बंधनापासोन सुटावें ॥ ६७ ॥
	नरदेह रत्नेपेटी । भोगें न करावी करंटी ।
	सद्धर्मीं लावोन शेवटीं । अलिप्त असावें ॥ ६८ ॥
	असो महाभागवत कुर्तकोटी । जगद्गुरु झाले करवीरमठीं ।
	एकी करोन शेवटीं । स्वयें राहिले अलिप्त ॥ ६९ ॥
	भय्यासाहेब इंदूरकर । श्रीचरणीं ठेवाया शरीर ।
	आले सांडोन इंदूर । गुरुभक्त बहु ज्ञानी ॥ ७० ॥
	सकलां सांगती मात । गुरुक्षेत्रीं महिमा अनंत ।
	तेथें ठेवितां देहाप्रत । पुनरपि जन्म त्या नाहीं ॥ ७१ ॥
	कोणी माझे अस्थींसी । न न्याव्या प्रयागासी ।
	अर्पितों श्रीचरणासी । परम पावन क्षेत्र हे ॥ ७२ ॥
	ऐसें बोलतां चालतां । देह ठेविला तत्त्वतां ।
	गुरुभक्तीनें गुंता । सोडविला बहुजन्मींचा ॥ ७३ ॥
	असो ऐसी भक्तमंडळी । समाधी समाधान पावली ।
	उपासना कैसी चालली । तीही श्रोतीं परिसावी ॥ ७४ ॥
	सद्गुरु समर्थांचे शिष्य । तैसेचि जे शिष्यानुशिष्य ।
	बहु मंडळी लक्षानुलक्ष । दुरित नाशिती कलियुगीं ॥ ७५ ॥
	जागोजागी नामसप्ताह । पुण्यतिथि-आदि महोत्साह ।
	अखंड चालिला प्रवाह । हृदयीं ध्याती कितीएक ॥ ७६ ॥
	श्रवणीं संगतीं किती तरती । त्यांची नाहीं नाहीं मिती ।
	घरोघरीं पादुका स्थापिती । पूजाअर्चा करावया ॥ ७७ ॥
	वर्हाीडी ग्राम सेंदुरजन । तेथें मठ ब्रह्मचैतन्य ।
	दक्षिणे करवीरक्षेत्री जाण । ब्रह्मचैतन्यमंदिर स्थापिलें ॥ ७८ ॥
	ऐसी उपासना चालली । दिगंत कीर्ति पैसावली ।
	तेंही लिहितां लेखणी भागली । गुरुलीला अगम्य ॥ ७९ ॥
	आतां ही सद्गुरुलीला । त्रयोदशीं जाय विश्रांतीला ।
	हृदयीं ध्याऊं पदाला । म्हणजे प्रसाद होईल ॥ ८० ॥
	गुरुलीलाबोधरसा । जरी उमटे हृदयीं ठसा ।
	तरी चुकेल हा वळसा । जन्ममृत्युचा ॥ ७१ ॥
	इति श्रीसद्गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
	पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ८२ ॥
	॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
	॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वादशोऽध्यायः समाप्तः ॥
