श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय अकरावा

शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (13:05 IST)
॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय अकरावा
समास पहिला
 
तनू जीर्ण झाली बहु कार्य केले । रघूनायकें शीघ्र पाचारियेले ॥
तदा रामरूपीं समाधिस्थ होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११ ॥
 
जयजय श्रीसद्‌गुरु माहेरा । करुणार्णवा अघहरा ।
मायबाप सोयरा । निश्चयात्मक तूं एक ॥ १ ॥
सूक्ष्म वासने जन्म झाला । तिनें अहंता पति वरिला ।
औट चाहूर वतनाला । भूल पडली पाहोनी ॥ २ ॥
द्वैत सासू आणि श्वशूर । मजवरी प्रेम तयांचे फार ।
लोभ मोह दोघे दीर । साहित्य पुरविती ॥ ३ ॥
आशा ममता पतिभगिनी । काय सा>न्गूं तयांची करणी ।
ब्रह्मांड संसार उभारोनी । प्रप।ची गोविती मजलागीं ॥ ४ ॥
मी मी म्हणावया शिकविलें । माझें म्हणोन वेड लाविलें ।
बळेंचि संसारीं अडकविलें । निःसंगासी ॥ ५ ॥
अहंपतीचें प्रेम भारी । न विसंबे क्षणभरी ।
माहेरींची स्मृति सारी । बाळपणींची विसरली ॥ ६ ॥
मी आणि माझा संसार । हेंचि एक भासलें सार ।
सासू सासरे आणि दीर । नणंदांचे प्रेम बहु ॥ ७ ॥
ऐसा संसार थाटला । मद संपत्तीनें भरला ।
तत्क्षणीं फळा आला । क्रोध सुपुत्र ॥ ८ ॥
दुर्वच शर्करा वांटिली । आपली प्रौढी मिरविली ।
दुरित गुढी उभारिली । आनंद थ्र मानिला ॥ ९ ॥
तंव आणीकही अपत्यें झालीं । भय शोक बालकें वाढणीं ।
मानिलें सुखाची समाप्ती केली । त्रिवर्ग सुतांनी ॥ १० ॥
वासना विषय सूक्ष्मतंतें । मजला आणिलें या पंथें ।
कष्त करोनि मरतें । तरी सुखलेश नाहीं ॥ ११ ॥
मोहें केला हव्यास । तो झाला सासुरवास ।
जाच परि सुखास । इच्छितसें तयामध्यें ॥ १२ ॥
तंव संत मायबहिणी । भेटल्या संसारकाननीं ।
कथिली तयांसी कहाणी । सुख सत्य कीं मिथ्या ॥ १३ ॥
त्या संगती संसार । दुःखराशींचे डोंगर ।
अंती घात करणार । अंधवापींत बुडवोनी ॥ १४ ॥
सुखासी केली खटपट । ती अवघीच पोंचट ।
पोंचट असोन बळकट । सुटणार नाहीं ॥ १५ ॥
तेलियाचा फिरता बैल । म्हणे मार्ग कधी सरेल ।
सत्य पाहतां घरींच हा खेळ । होत जातो ॥ १६ ॥
तैसाचि हा संसारपंथ । सारितां सरेना सत्य ।
अहंता अंधारीं काधितां व्यक्त । क्षणिक भासे ॥ १७ ॥
सत्य म्हणता स्वप्नवत्‍६ । स्वप्न म्हणतां भासे सत्य ।
गुरुमाय दुरोनि पहात । कौतुक सारें ॥ १८ ॥
ऐसें तयांनी कथिलें । तेव्हां बाळपण आठवलें ।
माहेरीं जावें म्हणितलें ।परि पति हट्टी सोडिना ॥ १९ ॥
यास्तव करितसें विनवणी । माये स्वहस्तें धरोनी ।
घेऊन जाईं स्वसदनीं । प्रेमपान्हा पाजवीं ॥ २० ॥
संतसज्जन मुर्हानळी । पाठवोन लाविली कळी ।
जाचती हीं अधिक सगळीं । धीर मजसी धरवेना ॥ २१ ॥
जीव द्यावा म्हणाल झणीं । तरी पति विलक्षणी ।
चौर्यांाशी लक्ष योनी । कूपीं फ्रता पाठीं असे ॥ २२ ॥
बहुत येवोन काकुलती । माये हीच विनंती ।
माहेर दाखवी स्वहस्तीं । कृपादृष्टी करोनि ॥ २३ ॥
असो ऐसी गुरुमाउली । आम्हीं आतां आठविली ।
कृपा करील ते काळीं । सौख्य भोगूं ॥ २४ ॥
बहुतांलागीं पावली । इहपर सौख्यद झाली ।
मज दीनासी भेटली । तेचि पुढतीं निरूपिजेल ॥ २५ ॥
कागवाडकर रामदासी । गणूबुवा वदती जयांसी ।
सदा ध्याती गुरुचरणांसी । रामभक्त महाभले ॥ २६ ॥
गृहीं बांधोनि मंदिर । मूर्ति स्थापिल्या सुंदर ।
सेवा करिती अत्यादर । गृहस्थाश्रमीं राहती ॥ २७ ॥
गुरुदर्शनीं अतिप्रीति । वरचेवरी धांव घेती ।
प्रपंची उदास वागती । आवडी रामसेवेची ॥ २८ ॥
एकदां स्थिति ऐसी झाली । हनुमानमूर्ति भंगली ।
चित्तवृत्ति दुश्चित झाली । आता कैसें करावें ॥ २९ ॥
धांव घेतली गुरूंकडे । वदती झालें जें सांकडें ।
मारुति नसतां रामापुढें व्यंग दिसे आम्हांसी ॥ ३० ॥
कृपा करोन दीनावरी । चरण लागावे मंदिरीं ।
मारुतीची स्थापना बरी । स्वहस्तें करावी ॥ ३१ ॥
संतचरण लागतां सहज । सुफल होईल धरिलें काज ।
एवढें द्यावें प्रेमव्याज । कृपादृष्टी करोनी ॥ ३२ ॥
वारंवार प्रार्थना करिती । सद्‌गुरु तयां अभय देती ।
येऊं तुमचे गृहाप्रती । सत्य सत्य जाणावें ॥ ३३ ॥
ऐसें आश्वासन दिलेन । दुःखित चित्ता शांतविलें ।
परि आज उद्यां करितां गेले । बहुत दिवस ॥ ३४ ॥
संत येणार माझे घरीं । सूक्ष्म अहंकार अंतरीं ।
उठला तो जाणिला चतुरीं । म्हणोनि विलंब लाविला ॥ ३५ ॥
बहुत केली प्रार्थना । उपवास करिती नाना ।
श्रीगुरु वदती हठयोग जाणा । कदापि करूं नये ॥ ३६ ॥
तुम्ही जावें आतां गृहासी । आम्ही येऊं अमुक दिवशीं ।
हर्षें भरोन रामदासी । स्वगृहीं परतले ॥ ३७ ॥
नाना साहित्य जमा केलें । मंदिर सर्व शृंगारिलें ।
गुरुदर्शन घडेल वहिलें । आनंद नगरवासियां ॥ ३८ ॥
पदें रचोनि मेळा केला । तो प्रसाद मजसी मिळाला ।
कीर्ति परिसोनि कवित्वाला । रचिलें जनप्रीतीस्तव ॥ ३९ ॥
कलियुगीं साधु नसती । ऐसी मज भावना होती ।
अनुग्रह घ्या कोणी वदती । उगाच होकार देतसे ॥ ४० ॥
ठरली वेळे निघोन गेली । गुरुमूर्ति नाहीं आली ।
तैं उदासीनता आली । रामदासीबुवांसी ॥ ४१ ॥
आमुचा नसे अधिकार । कां कृपा करील गुरुवर ।
ऐसा निराशेचा उद्भवोनि अंकुर । उपोषण सुरू केलें ॥ ४२ ॥
सात दिवसपर्यंत । उपोषणें देह कष्टवित ।
जरी न येती समर्थ । तरी प्राण त्यजावा ॥ ४३ ॥
ऐसा निश्चय करोनि । सात दिवस काढिले त्यांनी ।
तरी गुरुजननी येण्याची वार्ता दिसेना ॥ ४४ ॥
चित्त अत्यंत दुखावलें । जिणें निरर्थक भासलें ।
सोमल घेऊं आरंभिलें । औदासिन्य येवोनि ॥ ४५ ॥
तंव पूर्वींच दोंदवलीसी । सद्‌गुरु कथिती दोघाजणांसी ।
शीघ्र जावें कागवाडासी । अंताजीपंत आणि व्यंकणभट ॥ ४६ ॥
इकडे रामदासियांनी विष कालविलें । तंव हे दोघे दारीं उभे ठेले ।
सद्‌गुरु यावया निघाले । ऐसी अमृतवाणी कथियेली ॥ ४७ ॥
आम्हां पाथविले पुढती । समर्थ मागोन शीघ्र येती ।
सत्वर करावी आयती । रामदासें विष दडविलें ॥ ४८ ॥
अंतर्ज्ञानी गुरुराव । करणी करिती अभिनव ।
शरण्या देती अनुभव । परि निष्ठा पहती ॥ ४९ ॥
आगगाडीचे अड्ड्यावरी । पावली सद्‌गुरूंची स्वारी ।
निरोप येतांच सत्वरीं । सामोरे धांवती ॥ ५० ॥
रांगोळ्या सडे घातले । ताशे मर्फे थडथडले ।
भजनीसमुदाय निघाले । टाळ वीणा घेवोनी ॥ ५१ ॥
सुस्वर कंठें मेळे गाती । आणूं चला गुरुमूर्ति ।
हातीं टिपर्याम वाजविती । शोभा दिसे अपूर्व ॥ ५२ ॥
असो ऐसी आयती झाली । वेळीं मंडळीं समीप आली ।
लोळती श्रींचे चरणकमळी । पोटीं आनंद न समाये ॥ ५३ ॥
वाजतगाजत मिरवीत । रामनामें गर्जवीत ।
माय पावली ते पेठेंत । सुवासिनी आरत्या ओंवाळिती ॥ ५४ ॥
तेच क्षणीं दृष्टादृष्ट । होतां फळले अदृष्ट ।
अंतरींचे निघालें क्लिष्ट । सर्वभावें नत झालों ॥ ५५ ॥
कृपादृष्टीचा महिमा । वर्णूं न शके चतुर्मुख ब्रह्मा ।
शब्द खटाटोप रिकामा । अनुभवेंचि जाणावें ॥ ५६ ॥
आनंदातील शुद्ध कंद । तो हा सद्‌गुरुप्रसाद ।
समरसें होवोनि धुंद । मायामोहीं गवसेना ॥ ५७ ॥
असो उत्साह चालिला थोर । समुदाय लोटला फार ।
रामनामध्वनीनें नगर । सर्वही दुमदुमलें ॥ ५८ ॥
दोनशें माणसांचें अन्न । शतशः पात्रें उठलीं जाण ।
परि ते वेळीं आठवण । कोणासीच न झाली ॥ ५९ ॥
जितुके लोक दर्शना येती । तितुके प्रसादा सेविती ।
चक्रावळीनें पंक्ती उठती । वारंवार कित्येक ॥ ६० ॥
गणपतराव रामदासी । यांचे निमित्तें आम्हांसी ।
दर्शन घडलें चरणासी । धन्य धन्य गुरुपद ॥ ६१ ॥
बाजारी नारळ मिळेना । म्हणती पत्रावळी ना ना ।
यावरोनि पहाना । किती समुदाय लोटला ॥ ६२ ॥
तोगग्रस्तां नाहीं मिती । भुतें त्रस्त किती जमती ।
साधुदर्शना भाविक येती । बैसाया ठाव मिळेना ॥ ६३ ॥
इतुकियांचे करिती समाधान । सकळां देती भोजन ।
लहानथोर समसमान । मधुरभाषणें शांतविती ॥ ६४ ॥
खेड्याचें शहर बनलें । जागोजागीं थवे बैसले ।
संतमाहात्म्य आगळें । अभाग्यासी उमजेना ॥ ६५ ॥
शके अथराशें एकतीस । सौम्यनाम संवत्सरास ।
शुद्धपक्ष आषाढ मास । दिनशुद्धि पाहिली ॥ ६६ ॥
मघां पंचमी सुप्रभातीं । बुधवारीं मिथुनावरती ।
स्वहस्तें स्थापिला मारुति । सद्‌गुरूंनीं कागवाडी ॥ ६७ ॥
दुसरे दिवशी गुरुवार । गुरुभक्तां शुभ फार ।
तेव्हां अनुग्रह केला मजवर । पतिता हातीं धरियेलें ॥ ६८ ॥
अनंत सुकृतें फळा आलीं । चुकली माय भेटली ।
बोधामृत श्रवणीं घाली । धन्य सुदिन आयुष्यीं ॥ ६९ ॥
निर्धना दाविलें धन । आंधळ्या दिधले नयन ।
मृता करविलें अमृतपान । आनं अकाय सांगावा ॥ ७० ॥
विश्वबंधुत्व मिळालें । समर्थ पाथिराखे झाले ।
धन्य भाग्य उदेलें सेवक मी समर्थांचा ॥ ७१ ॥
असो ऐसे कागवाडासी । ब्रह्मचैतन्य हनुमदंशी ।
सद्‌गुरु भेटले आम्हांसी । पुढील कथा अवधारा ॥ ७२ ॥
चार दिवसपर्यंत । सोहळा झाला अद्भुत ।
श्रवण करा सावचित्त । श्रोते तुम्ही गुणभोक्ते ॥ ७३ ॥
अवगुणांते त्यजोनी । सद्‌गुणांतें शोधोनी ।
गुरुलीला ही म्हणोनि । अव्हेर न करावा ॥ ७४ ॥
पुढील समासीं निरूपण । कागवाडी श्रीज्ञानघन ।
बहुत चमत्कार दावोन । उपासना वाढविती ॥ ७५ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय अकरावा
समास दुसरा
 
ॐ नमो सद्‌गुरुराया । भीति दाविते मज माया ।
यास्तव धरिलें पायां । दासउ पेक्षा न करावी ॥ १ ॥
ज्ञान अज्ञान कळेना । वरी पाअतां न ये अनुमाना ।
कागवाड क्षेत्रामाजीं पहा ना । महारीण उद्धरिली ॥ २ ॥
ती कथा आहे कैसी । श्रोते परिती प्रश्नासी ।
तरी परिसा सविस्तरेंसी । कथन करूं ॥ ३ ॥
संताबाई नामेंकरून । होती तेथें महारीण ।
नित्य मंदिरीं येवोन । झाडलोट करितसे ॥ ४ ॥
महाराज श्रीगोंदवलेकर । कधीं ना पाहिले साचार ।
परि पुसे वारंवार । कधीं येती म्हणोन ॥ ५ ॥
बुवा पुसती तियेसी । समर्थ येतां काय करिसी ।
महारीण वदे तयांसी । मरणमुक्ति मागेन ॥ ६ ॥
जंव ते दिवस जवळीं आले । तंव स्वल्प धन मिळविलें ।
शेजारियापाशीं दिलें । उत्तरकार्य करा म्हणे ॥ ७ ॥
थट्टेवरी चालिली गोष्ट । तंव आली समर्थभेत ।
महारीण पावली नीट । समर्थचरना वंदन करी ॥ ८ ॥
विनवीतसे कर जोडोन । ’आतां सोडव भवांतून ।
संचित होतें तें दारुण । भोगून सारिलें आजवरी ॥ ९ ॥
कांही शेष उरला असेल । तरी दर्शनें विलया जाईल ।
तीर्थप्रसाद शमवील । संतमाहात्म्य अगाध ।
तीर्थप्रसाद देवोनी । निरोप द्यावा मजलागोनी ।
आतां सोडवीं ही जाचणी । मलिन देहाची’ ॥ ११ ॥
सद्‌गुरु मनीं संतोषले । चरणतीर्थ तियेसीं दिलें ।
प्रसाद देवोनि कथिलें । ’शीघ्र जाईं स्वस्थाना’ ॥ १२ ॥
वारंवार भेवोन दर्शन । वदे ’पतिता केले पावन ।
दीन दयाळु कृपाघन । येतें, लोभ असूं द्यावा’ ॥ १३ ॥
गृहीं जावोन सकळांसी । निरोप मागे अति हर्षीं ।
मग ;राम; म्हणोन देहासी । सोडती झाली ॥ १४ ॥
महार आले। सांगत । ’महारीण झाली मृत’ ।
सद्‌गुरु वदती पुण्यशील बहुत । सांग संस्कार करावा ॥ १५ ॥
पूर्वजन्मार्जित तिजसी ज्ञान । परि संचित राहिलें दारुण ।
इहजन्मीं भोगिलें सारून । आतां मुक्त जाहली’ ॥ १६ ॥
तिनें द्रव्य ठेविलें होतें वरी दिधलें समर्थें ।
अन्नदानें सकळांतें । तृप्त केलें ॥ १७ ॥
असो सांगावया कारण । साधीभोळी महारीण ।
परि तिजसी असेल ज्ञान । हें स्वप्नींही नसे कवणाच्या ॥ १८ ॥
ज्ञानस्थिति सांभाळणें किती कथीण देव जाणे ।
आम्ही अर्धशब्दज्ञानें । घरोघरीं बडबडतों ॥ १९ ॥
अप्पासाहेब पाटील थोर । श्रीगुरूंसी करुनी नमस्कार ।
वदती ’गृहीं चलावें सत्वर । आटींव दूध करविलें।’ ॥ २० ॥
शुद्धभाव पाहोनि । श्रीगुरु गेले त्यांचे सदनीं ।
क्षीर असे कळशीभरोनी । समुदाय तरी तीन शतक ॥ २१ ॥
स्वस्तें पात्रें भरोनी । सकलां पाजी गुरुजननी ।
अभिनव केली करणी । प्रसाद राहिला दोन शेर ॥ २२ ॥
जेथें होतें राममंदिर । तेथें जवळींच असे विहीर ।
परि पाणी असे बहु क्षार । मुखीं कांहीं घालवेना ॥ २३ ॥
समर्थ वदती बुवांसी । ’श्रीउत्साहसमयासी ।
घेत जा जल पाकासी । राम गोडी आणील’ ॥ २४ ॥
तेच क्षणी गोसावी एक । रामेश्वरीं निघाला देख ।
मार्गीं तया आकस्मित । दृष्टांत होय शंभूचा ॥ २५ ॥
येथून जवळीं कागवाड नगरीं । सद्‌गुरु ब्रह्मचैतन्य स्वारी ।
गंगा तया घालीं सत्वरीं । म्हणजे आम्हां पावेल ॥ २६ ॥
यास्तव गोसावी तेथें । आला गंगा घालावयातें ।
त्यांतील गंगा घेऊन हस्तें । विहिरीमाजी सोडिली ॥ २७ ॥
क्षर पाणी गोड झालें । मंदिरीं उपयोगा आलें ।
प्रत्यक्ष परमात्मा अवतरले। म्हणती सर्व ॥ २८ ॥
अत्मारामपंत कुळकर्णी । श्रींसी नेती स्वसदनीं ।
सद्भावें पद पूजोनी । फराळासी घालिती ॥ २९ ॥
ते समयीं मेळ्यांतील पदें । मुलें म्हणती आनंदे ।
सद्‌गुरु पुसती विनोदें । ’कोणी रचिलीं मज सांगा’ ॥ ३० ॥
मुलें म्हणती ’गोपाळराव । फडके असे उपनांव ।
तयांनीं रचिलीं सर्व । श्रीचरणीं वहावया’ ॥ ३१ ॥
तोचि प्रसाद ये समयीं । अर्पिलासे समर्थपायीं ।
तन्निमित्तें सेवा सर्वही । पहाप्रसाद संतांचा ॥ ३३ ॥
अप्पासाहेब कागवाडकर । मामासाहेब इनामदार ।
दोघेही नेती गुरुवर । स्वगृहीं भोजना ॥ ३४ ॥
श्रीगुरु करविती पायस । वांटिती अन्य यातींस ।
जैन आणि लिंगाइतांस । त्यांचे हस्तें वाढविती ॥ ३५ ॥
आपुला धर्म सोडूं नये । दुजियाचा धरूं नये ।
बोधिती सद्‌गुरु स्वयें ध्यानीं धरा भाविकहो ॥ ३६ ॥
असो ऐसा उत्साह थोर । होतां आनंदलें नगर ।
दर्शना येती असंख्य नर । गांवोगांवींचे ॥ ३७ ॥
मुरारजी भाते गिरणीवाले । भाविक श्रीमान गृहस्थ भले ।
श्रीगुरूंचे दर्शना आले । आनंदले मानसीं ॥ ३८ ॥
प्रसाद व्हावा गिरणीवरी । ऐसें विनविती परोपरी ।
गुरु वदती ते अवसरीं अवश्य येऊं म्हणोनि ॥ ३९ ॥
परि अठरापगड यातींसी । बोलवावें प्रसादासी ।
जैन आणि लिंगायतांसी । निराळा पाक करावा ॥ ४० ॥
हो जी म्हणोनि अंगिकारिलें । स्थान सर्व श्रृंगारिलें ।
बल्लव चतुर आणिले । षड्रसान्नें करावया ॥ ४१ ॥
ग्रामवासी समस्त जन । केलें तयां निमंत्रण ।
सद्भावें श्रींसी पूजोन । वस्त्रें अर्पिली बहुमोल ॥ ४२ ॥
प्रेमें केलें गांवभोजन । पाहतां श्रीगुरु झाले प्रसन्न ।
आशीर्वाद देती ’संतान । होईल तुजसी’ म्हणोनी । ४३ ॥
संतान नाहीं म्हणोनी । चिंता करीत होता मनीं ।
श्रींनी हें जाणोनी । कृपा केली तयावरी ॥ ४४ ॥
पुढती तया पुत्र झाला । आशीर्वाद फळा आला ।
ऐसा सद्‌गुरु पावला । बहुतांसी ॥ ४५ ॥
कगुडराय पुरातन । स्थान भुयारीं असे गहन ।
श्रीगुरु तेथें जाऊन । शालिग्राममूर्ति पाहती ॥ ४६ ॥
आणि अंतर्भुयारांत । योगमार्गें सद्‌गुरु जात ।
योगी बैसले ध्यानस्थ । म्हणोनि सांगती सकळांसी ॥ ४७ ॥
आंत कोणी जाऊं पाहती । तरी भुंगे डसों धांवती ।
शोधूण जातां सद्‌गुरु वदती । ग्रामास घडेल अपाय ॥ ४८ ॥
असो ऐशी गुरुमाउली । कागवाड क्षेत्रीं बहु रमली ।
रामउऐपासना वाढविली । अनुग्रह देवोनिया ॥ ४९ ॥
तेथून निघाले सकल आडवे पडती । वियोगें दुःखाश्रु ढाळिती ।
चार दिवस गृहाप्रती विसरले होते ॥ ५० ॥
बोधून सकळां शांतविती । येऊं म्हणती शीघ्र पुढतीं ।
नामधारकापाशीं वसति । अहर्निश असे आमुची ॥ ५१ ॥
असो नामाच्या गजरांत । निघते झाले श्रीरघुनाथ ।
भक्त उगारग्रामीं घेऊन जात । अत्याग्रह करोनी ॥ ५२ ॥
तेथून पुढें मिरजेसी । जाते झाले ज्ञानराशी ।
अनंत भक्त दर्शनासी । आजूबाजूचे धांवती ॥ ५३ ॥
श्रेतीं आशंका घेतली । हीच भेटी सविस्तर वर्णिली ।
सद्‌गुरु जाती अनेक स्थळीं । उत्तर दक्षिण भागांत ॥ ५४ ॥
साच प्रशन बरवा केला । साग्र वर्णावी सद्‌गुरुलीला ।
परी शक्ति कैंची मानवाला । सद्‌गुरुलीला अगाध ॥ ५५ ॥
काशीपासोन रामेश्वरी । बारा वेळ पादचारी ।
फिरती झाली श्रीगुरुस्वारी । मार्गीं गांव कित्येक ॥ ५६ ॥
जे गांवचे नांव घ्यावें । वदती आम्हां असें ठावें ।
बाळपणीं गेलों होतों स्वभावें । खाणाखूणा सांगती ॥ ५७ ॥
प्रत्येक ठायीं परोपकार । कांही घडती चमत्कार ।
लिहितां ग्रंथ वाढेल फार । अशक्य असे आम्हांसी ॥ ५८ ॥
येविषयीं एक दृष्टांत । आठवला तो कथितों येथ ।
त्यावरोन जाईल किंत । अशक्य दुर्लंघ्य म्हणोनी ॥ ५९ ॥
बालपणीं फिरतां मही । हल्याळग्रामीं पाहीं ।
गेले परि ठवठिकाणा नाहीं । कोण कोथील म्हणोनी ॥ ६० ॥
तेथें एका विप्रसुतासी । ज्वर भरला प्राणनाशी ।
सद्‌गुरु अकस्मात्‌ त्या समयासी । भिक्षामिषें गृहीं गेले ॥ ६१ ॥
माउली दिसे सचिंत । नयनीं अश्रु ढाळित ।
द्रवले श्रीगुरुनाथ । वृत्तांत सर्व परिसला ॥ ६२ ॥
शीघ्र जावोन गृहांत । मुलाकरवीं उदक हातांत ।
स्वयें घेवोनि निश्चिंत । रहा म्हणती तयासी ॥ ६३ ॥
पुढें वासुदेवभट्ट नामेंकरोनी । ओळखीचे गृहस्थ होते कोणी ।
कथिती तयांलागोनी । ’घेतला ज्वर भोगणें असे ॥ ६४ ॥
विप्र पुत्र जगावा । गोसावी जातां माहीं पर्वा ।
तुम्ही समाचार घेत जावा । भोगून सारूं ज्वरासी’ ॥ ६५ ॥
ऐसें झालें संभाषण । कांहीं दिवस गेले निघोन ।
भट्ट पुन्हां करिती प्रश्न ।’ज्वर केव्हां भोगितां’ ॥ ६६ ॥
हो, हो, विसरलों आम्ही । बरी आठवण दिली तुम्हीं ।
एक खोली रिकामी । करोन द्यावी आम्हांसी’ ॥ ६७ ॥
अकरा दिवसपर्यंत होते थ्थें निद्रिस्त ।
ज्वर धुमारे बाहेर येत । कवाड बंद केलें असे ॥ ६८ ॥
द्वादशदिनीं बाहेर निघोनी । पथ्य घाला म्हणती झणीं ।
येतो स्नान करोनी । भोग भोगूनि सारिला ॥ ६९ ॥
नको म्हणतांही शीघ्र निघाले । विहिरींत जावोन बुडाले ।
वासुदेवभट्ट वरी राहिले । वाट पाहत समर्थांची ॥ ७० ॥
बहोत काळ नोघोन गेला । गोसावी वर नाहीं आला ।
म्हनती बाळ बुडूनि मेला । आतां कैसें करावें ॥ ७१ ॥
बोलाविती ग्रामाधिकारी । तंव वरी बैसली स्वारी ।
आश्चर्य मानती सारीं । चरणा वंदूं लागले ॥ ७२ ॥
बहुत लोक दर्शना येती । उपाधि नको साधकस्थितीं ।
म्हणोन शीघ्र निघोन जाती । ध्यास लागला सकळांसी ॥ ७३ ॥
कांही दिवस गेलियावर । दामूबुवा कुरवलीकर ।
कीर्तनाचा करीत गजर । सहज गेले हल्ल्याळीं ॥ ७४ ॥
सद्‌गुरूंची वर्णितां कीर्ति । वासुदेवभट्ट वंदोनि विनविती ।
दर्शना न्यावें आम्हांप्रति । अनुग्रहाची ओइच्छा असे ॥ ७५ ॥
मार्गीं कथिली मागील कथा । ऐसा साधु नाहीं आतां ।
थकलों आम्ही तया शोधितां । मंद भाग्य आमुचें ॥ ७६ ॥
उभयतां गोंदावलीं आले । श्रींचे चरन वंदिले ।
तंव श्रीगुरूंनी आलिंगिलें । वासुदेवभट्ट म्हणोनी ॥ ७७ ॥
इकडे कोणीकडे आलां । प्रपंच करोनी भागलां ।
गृहवृत्तांत पुशिला । सर्व कुशल असती ना ॥ ७८ ॥
पूर्वीं पाहिली सिद्धमूर्ति । तीच दिसे डोळ्यांपुढती ।
नयनीं आनंदाश्रु येती । चरण न्हाणिती श्रीगुरूंचे ॥ ७९ ॥
असो ऐसे बालपणीं बहुत फिरले जे अवनी ।
लिहितां न पुरे लेखणी । श्रोतीं रोष न करावा ॥ ८० ॥
स्वल्प काळ राहिले घरीं । बहुतेक फिरती दिशा चारी ।
जगदुद्धारक अवतारी । सिद्धपुरुष ॥ ८१ ॥
कागवाड येथील स्थिति । म्यां पाहिली प्रत्यक्षरीती ।
यास्ता कथिली तुम्हांप्रती । गुरुकथा रसाळ ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय अकरावा
समास तिसरा
 
याउपरी श्रीगुरुनाथ गोंदवले ग्रामींच राहत ।
श्वासविकार वाध्ला अत्यंत । शक्ति क्षीण जाहली ॥ १ ॥
परि असती ते विदेही । देहसंबंध तया नाही ।
वस्त्रापरी ठेविती पाही । केव्हां दूर केव्हां जवळी ॥ २ ॥
याचें पहा प्रत्यंतर । श्वास उठतां अनिवार ।
सकळा वाटे भय फार । केव्हां काय होईल ॥ ३ ॥
परि कोणी येतां परस्थ । श्वास जाय विलयाप्रत ।
शांतपणे समाचार पुसत । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ ४ ॥
चार दोन दिवसांवरी । न बैसतां घोड्यावरी ।
घोडा दंगा फार करी । जवेळीं कोणा येऊं न दे ॥ ५ ॥
समर्थसेवा नाही घडली । म्हणजे गोदाही खिंकाळी ।
आम्हां मानवाअं भूल पडली । सेवासुख समजेना ॥ ६ ॥
असो श्वाससमयासी । दमवोन आणिती वारूसी ।
कार्यसमयी व्याधीसी । कोण पुसे ॥ ७ ॥
जनांसी मात्र उपदेशिती । ’चंचल जाय विलयाप्रति ।
निश्चळ ओळखोन धरा चित्तीं । शाश्वत एक गुरुपद ॥ ८ ॥
कोण वेळ कैसी स्थिति । हेईल हें न कळे पुढती ।
यास्तव साधक हो शीघ्रगै । शंका निरसा प्रश्नोत्तरें ॥ ९ ॥
कलि वाढला दुर्धर । साधु न राहती देहें स्थिर ।
याकारणें श्रीरघुवीर । आपुलासा करावा’ ॥ १० ॥
वरचेवरी कथिती ऐसें । परि मायेनें लाविले पिसें ।
आम्ही आळसी जैसे तैसे । माय मात्र कळवळे ॥ ११ ॥
असो ऐसी देहस्थिति । परि अखंड रामभक्ति ।
बहुतांचा उद्धार करिती । रामनाम बोधोनी ॥ १२ ॥
भक्तकार्यार्थ सोलापुरीं । एकदां गेली श्रेंची स्वारी ।
परतोन येतां माघारी । दृष्टांत होय विठूचा ॥ १३ ॥
’बडवे पुजारी कळी’ केली । माझी महापूजा राहिली ।
भक्त तुम्ही महाबळी । येवोन कलह तोडावा’ ॥ १४ ॥
कुर्डूवाडीहून फिरले । शीघ्र पंढरीस आले ।
विठ्ठलवच्रण वंदिले । देव भक्त महासखे ॥ १५ ॥
तंव इकडे प्रकार घडला । तंटा सरकारांत गेला ।
त्यांनी समर्थां लखोटा लिहिला । तोही पावला त्याच वेळी ॥ १६ ॥
’गृहकलह तोडावा तुम्ही । आम्ही असो परधर्मी ।
साधुशिरोमणी ये कामी । न्याय कराल तो सत्य’ ॥ १७ ॥
श्रीहरीचा हुकूम झाला । सरकारचा लखोटा आला ।
मग आरंभिलें कार्याला । तंट्याचें मूळ शोधिलें ॥ १८ ॥
देवाची वस्त्रें भूषणें । यांजसंबंधी तंटाभांडणें ।
येकासी येक घेतली म्हणे । कलह थोर मातला ॥ १९ ॥
श्रीगुरूंनी मोजदाद केली । उभयतांची समजूत घातली ।
महापूजां चालूं केली । सकळां आनंद वाटला ॥ २० ॥
तेथें आणिक थोडे दिवस । राहिले ते समयास ।
क्षेत्रमहिमा संगती विशेष । ऐसा नामगजर नाहीं अन्यत्र ॥ २१ ॥
पुंडलिकें उपकार केले ।वैकुंठींचे निधान आणिले ।
वेटेवरी उभे ठेले । भक्तकार्यार्थ रघुनाथ ॥ २२ ॥
उत्तरे क्षेत्र वाराणशी । दक्षिणे पंढरी अघनाशी ।
तीर्थें पुनीत व्हावयासी । सकल येती या ठायी ॥ २३ ॥
पंढरीक्षेत्रीं राहोनी । बोधिती बहुत अज्ञानी ।
रामभक्तीसी लावोनी । उद्धरिले अज्ञ जन ॥ २४ ॥
पुन्हा परतोन गोंदवलीसी । येते झाले ज्ञानराशी ।
आनंद नारीनरांसी । ग्रामस्थ जाती सामोरे ॥ २५ ॥
धन्य गोंदवलीचे जन । नित्य घडे गुरुदर्शन ।
नानाव्याधींचे निरसन । गुरुप्प्रसादें होतसे ॥ २६ ॥
कोणी अडचणींत गवसला । विनवी गुरुराजयाला ।
साह्य करिती तयाला । अर्थबोधेंकरोनी ॥ २७ ॥
व्यापार वाढला गहन । देशोदेशींचे विद्वज्जन ।
भेतती स्वयें येवोन । कुग्राम म्हणे कोण तया ॥ २८ ॥
श्रीराममंदिराप्रति । अन्नदाना नसे मिति ।
आणिक मजूर किती खाती । अठरा कारखाने ॥ २९ ॥
दरसाल नवीन इमारती । विहिरी किती खोदिती ।
अखंड चाले वाहती । समुदाय येत जातसे ॥ ३० ॥
असो गोंदवल्याचे लोकां मायबाप सद्‌गुरु सखा ।
तैसाचि इतरां भाविकां । कल्पतरु गुरु माझा ॥ ३१ ॥
श्रीमंत ज्ञानी बहुत असती । परि परदुःखा नेणती ।
परदुःखा जे निवविती । तेचि होती जगद्वंद्य ॥ ३२ ॥
आपले आपण खादलें । यांत काय हातां आलें ।
देवें जरी ऐसें केलें । तरे काय माती खाती ॥ ३३ ॥
असो आमुची गुरुमाउली । बहुतां आश्रयो झाली ।
क्षेत्र केले गोंदावली । भूवैकुंठ ॥ ३४ ॥
स्वयें घालोन लंगोटी । बहुतांची राखिली पाठी ।
विश्वकुटुंबी होऊन शेवटीं । अलिप्तचि राहिले ॥ ३५ ॥
घरची सर्वही शेती । वाहिली रामचरणाप्रति ।
खरेदी घेवोनि वरती । रामसेवेसी लाविली ॥ ३६ ॥
श्रीराममंदिरें दोन । तैसींच शिवालयें जाण ।
दत्त शनि देवस्थान । संस्थान स्थापिलें ।
पंच नेमून तयावरी । व्यवस्था आंखोन दिली सारी ।
आल्यागेल्यासी भाकरी । अवश्य म्हणती घालावी ॥ ३८ ॥
वरचेवरी सांगती । आम्ही जाऊं आपले पंथीं ।
तुम्ही शीघ्र जोडा रामभक्ति । नातरी पश्चात्‌ ताप पावाल ॥ ३९ ॥
परि कोणा खरें न वाटे । मायापटल आलें मोठें ।
विनोदें वदती ऐसें वाटे । हास्यमुखावरोनी ॥ ४० ॥
असो शके अठराशें पसतीसांत रामनवमी झाली प्राप्त ।
आज्ञापत्रें धाडोनि बहुत । शिष्यसमुदाय मेळविला ॥ ४१ ॥
मार्गशीर्षा नित्यनेमीं । दर्शना गेलों होतों आम्ही ।
’अगत्य यावे रामनवमी’ । आज्ञा ऐसी जाहली ॥ ४२ ॥
’पुढती वेळ कैसी येईल । नैमिषवनीं जाणें घडेल ।
भेटी होईल न होईल । नवमी येण्या विसरूं नये’ ॥ ४३ ॥
काय मायेचा जिव्हाळा । आतां आम्हां आठवला ।
ते समयीं विनोद भासला । मायामोहें ॥ ४४ ॥
असो रामनवमीसी । गेलों आम्ही आज्ञा जैसी ।
तेंचि दर्शन आम्हांसी । अखेरचें जाहलें ॥ ४५ ॥
श्रीरामनवरात्र । अखंड चाले नामसत्र ।
समुदाय भरला सर्वत्र । उतराया ठाव मिळेना ॥ ४६ ॥
चहूं देशींचे लोक येती । भाषाभेद चालीरीती ।
ध्येय एक गुरुमूर्ती । गुरुबंधु एकवटले ॥ ४७ ॥
शास्त्री वैदिक आणि भट । साहेब पंत कवि भाट ।
भिषग्‌रत्नें कुणबी अफाट । नरनारी किती जमले ॥ ४८ ॥
ताशे चौघडे वाजती । रामनामें भक्त गर्जती ।
भजनी दिंड्या अभंग गारी । उत्सव अपूर्व चालिला ॥ ४९ ॥
हरिदास करिती कीर्तन । कोणी वाचिती पुराण ।
कोणी अध्यात्मविवेचन । करिती प्रेमसंवाद ॥ ५० ॥
सद्‌गुरुपूजा सकळ करिती । अपूप नैवेद्य दाविती ।
चरणतीर्थ आदरें घेती । अनन्यभक्तीनें ॥ ५१ ॥
कोणी सुवासिक उटणें । लावोनि न्हाणिलें पंचामृतानें ।
कफनी टोपी झ्र्णावसनें । अर्पिती कोणी गुरूंसी ॥ ५२ ॥
यथाशक्ति धनराशी । कोणी अर्पिती गुरूंसी ।
यात्रा भरली भरती जैशी । रत्नाीकरा चंद्रोदयीं ॥ ५३ ॥
रामजन्मयास । दोन्हीं मंदिरीं दाटी विशेष ।
यास्तव सद्‌गुरु परेश । धर्मशाळेंत बैसले ॥ ५४ ॥
तेथेंच जन्मोत्सव करिती । भक्त तेथें सीतापति ।
तीन ठायीं पाळणे हलती । सद्‌गुरुगृहीं ॥ ५५ ॥
परस्थांची मंदिरीं वसति । ही नेममींचीच पद्धति ।
नवमीचे पारण्याप्रती । गांवभोजन घातलें ॥ ५६ ॥
रात्रौ निघाली मिरवणून । शिबिके बैसले रघुनायक ।
श्रींसी रथीं बैसवोनि देख । अत्यानंदें चालिले ॥ ५७ ॥
सर्वांतरी उत्साह भरला । ऐसा महोत्साह जाहला ।
सद्‌गुरुराजा शोभला । अयोध्ये जैसा श्रीराम ॥ ५८ ॥
कांहीं दिवसांउपरांतीं । अप्पाबुवा श्रींसी वदती ।
’आम्ही जाऊं आतां पुढती । दादा आज्ञा असावी’ ॥ ५९ ॥
अप्पानें ऐसा देह त्यागिला । संत जाणती संतलीला ।
श्रीगुरु निघाले पंढरीला । समुदायासमवेत ॥ ६० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय अकरावा
समास चवथा
 
श्रीराममंदिरांत । राहिले सद्‌गुरु समर्थ ।
दिवसेंदिवस क्षीण दिसत । सगुण देह ॥ १ ॥
परि सर्वही व्यापार । अखंड चालिले अनिवार ।
विदेही श्रीगुरुवर । देहबंधन तयां कैचें ॥ २ ॥
गुरुपौर्णिमा समीप आली । भक्तमंडळी येऊं लागेली ।
इकडे आषाढी यात्रा भरली । पंढरीक्षेत्रांत ॥ ३ ॥
गुरुपूजा करावयासी । बहुतेक येती त समयासी ।
उत्साह चालिला अहर्निशी । श्रीरामंदिरांत ॥ ४ ॥
अनंत संत श्रीगुरूंसी । भेटों येती आदरेंसी ।
महाप्रसाद प्रतिदिवशीं । संतांगृही होतसे ॥ ५ ॥
सद्‌गुरूही समस्तांसी । मंदिरीं नेती भोजनासी ।
विठ्ठकृपाछायेसी । संत भेटती आनंदें ॥ ६ ॥
नाम-रूप-भक्तियोग । कोण साधनीं कैसा लाग ।
जीवशिव विवेक वैराग्य । नित्य संवाद चालती ॥ ७ ॥
तुकारामबुवा वलव्हणकर । हे वदती रूप थोर ।
गुरु वदती नाम थोर । साध आन तुळेना ॥ ८ ॥
संवाद चालिला अतिशय । श्रवणीं संतसमुदाय ।
नामरूपीं श्रेष्ठ ध्येय । विवेचन चालिलें ॥ ९ ॥
वेदशास्त्र संतवचनें । काधून दाविती प्रमाणें ।
नाम श्रेष्ठ सद्‌गुरूंनीं । सिद्ध करोनि दाविलें ॥ १० ॥
मायोद्भवीं अक्षर ब्रह्म । सूक्ष्म भूतांचा कर्दम ।
अष्टधें रूपाचा उगम । साकारला दिसे ॥ ११ ॥
वेदांत सिद्धांत धादांत । दावोनि निरसिला किंत ।
परमात्मा नामरूपातीत । नामस्मरणीं आतुडे ॥ १२ ॥
सर्वांची समजूत घातली । बुवांची संमति घेतली ।
भक्तमांदी मिळाली । तो सोहळा अपूर्व ॥ १३ ॥
नामगर्जना करोनी । श्रींचे चरण वंदोनी ।
भक्त गेले स्वसदनीं । संतमहिमा वर्णित ॥ १४ ॥
बहुत शिष्य तेथें आले । ब्रह्मानंद साधु भले ।
भागवतांसी बोलाविले । आणि क बहुतेक ॥ १५ ॥
तैसेंच बहुत शिश्यांप्रति । ज्या त्यापरी उपदेशिती ।
ब्रह्मानंद भेटी एकांतीं । घेते झाले ते समयीं ॥ १६ ॥
बहुत वेळ बोलणें झालें । एकांतीं जावों नये भले ।
महाप्रस्थान निवेदिलें ऐसें वाटे ॥ १७ ॥
जें न देखे रवि । तें पाहे सुज्ञ कवि ।
ऐसें सद्‌गुरु गोसावी । वदलें ते आठवलें ॥ १८ ॥
एकांती प्रयाणाचा । विचार कळला श्रीगुरूंचा ।
लेश न दाविती दुःखाचा । पूर्ण ज्ञानी ब्रह्मानंद ॥ १९ ॥
असो पंढरीवास केला । बहुत काळ सोहळा झाला ।
शिष्यांसमवेत खंडाळीला । गुरुमहाराज निघाले ॥ २० ॥
वझे नामें मामलेदार । विनवणी करिती फार ।
याकारणें गुरुवर । खंडाळीवरूनि चालिले ॥ २१ ॥
तेथेंही बहु उपदेशिती । सकळांसी आनंदविती ।
धन्य साधूची संगती । पुण्यें पुण्य दुणावे ॥ २२ ॥
वाकरीकर लक्ष्मणबुवा । यांची पुण्यतिथी तेव्हां ।
आली, यास्तव शिष्य गांवा । श्रींसी नेत बाकरीं ॥ २३ ॥
सिद्धांचे समाधिस्थान । तेथें कथ्लें संतवर्णन ।
सकलां आनंद देवोन । रामनाम बोधिलें ॥ २४ ॥
हेथें जाती श्रीगुरुराव । तेथें आनंद महोत्साव ।
सकलां वाटे देवाधिदेव । अवतरले मृत्युलोकीं ॥ २५ ॥
नास्तिक दुरोनि निंदिती । परि दर्शन घडतां नम्र होती ।
ऐशी गुरूंची तेजदीप्ति । लखलखीत सोज्ज्वळ ॥ २६ ॥
गुप्त हेर परीक्षूं येती । तेचि चरणीं लीन होती ।
धन्य सज्जनसंगति । दुर्बुद्धी तेथें न रिघे ॥ २७ ॥
जरी बळें झटों आली । तरी मीलनें लीन झाली ।
गंगा बुडवाया निघाली । सागरा जैशी ॥ २८ ॥
असो वाकरीहून निघाले । ते गोंदवलीस आले ।
नागरिकांसे आनंदविलें । वियोग बहुत दिवसांचा ॥ २९ ॥
तंव विनविती कुरवलीकर । दामोदरबुवा भक्त थोर ।
’पहावया राममंदिर । कुरवलीसी चलावें ॥ ३० ॥
आपुली आज्ञा प्रमाण । पंदिर बांधिलें शोभायमान ।
तरी लागावे श्रीगुरुचरण । इच्छा एवढी पुरवावी’ ॥ ३१ ॥
भाव पाहोन रुकार दिला । सकलां वदती जाऊं चला ।
सिद्धस्थान पहावयाला । शंभुक्षेत्रीं ॥ ३२ ॥
सकलांसमवेत निघाले । कुरवलीसमीप आले ।
नगरवासी सामोरे धांवले । सद्‌गुरूंसी आणावया ॥ ३३ ॥
वेशीपासून पंदिरापर्यंत । सडे रांगोळ्या शोभत ।
ओंवाळिती स्त्रिया समस्त । ठायीं ठायीं श्रीगुरूंसी ॥ ३४ ॥
गुलाल बुक्का उधळिती । ’रघुवीर समर्थ’ गर्जती ।
मिरवळून आली मंदिराप्रति । समर्थ सद्‌गुरूंची ॥ ३५ ॥
असो चार दिवसपर्यंत । उत्साह झाला अद्भुत ।
दामोदरबुवा जागती सतत । न्यून नसावें सेवेसी ॥ ३६ ॥
सकलां आनंद देवोनी । स्वारी निघाली स्वसदनीं ।
शिष्य समस्त बोलावूनी । आज्ञापिती ते वेळीं ॥ ३७ ॥
आपआपले ग्रामासी । जावें ये समयासी ।
आम्हीं जाऊं गोंदवलीसी । पुढती यावें दर्शना ॥ ३८ ॥
आधीं पंढरीहून धाडिले । उरलेसुरले येथें जमले ।
येथूनही पाठविले । बहुत जन ॥ ३९ ॥
नित्य जवळीं ज्यांची वसति । तयांसी कार्यें सांगती ।
दूरदेशीं पाथविती । इच्छा श्रीसमर्थांची ॥ ४० ॥
असो कांही लोकां घेवोनी । शीघ्र आले गोंदवलेभुवनीं ।
श्रीरामचरण वंदोनी । भटती महारुद्रासी ॥ ४१ ॥
नागोबाची जत्रा आली । म्हणोन स्वारी निघाली ।
धेनू सोडवून ते काळीं । ’अखेर सेवा ही’ वदती ॥ ४२ ॥
अणीक एक बैल तेथें । विकत घेतला गुरुनाथें ।
लोक विनविती तयांतें । ’वृषभ तुम्न्हीं न घ्यावा ॥ ४३ ॥
हा बहुत खोडगुणी । जेथें जाई तेथें हानि ।
यास्तव श्रीसमर्थांनीं । याचा स्वीकार न करावा’ ॥ ४४ ॥
समर्थ वदती ’अति उत्तम । गरिवासी कष्टवी हा परम ।
आम्ही गोसावी निष्काम । जानि होतां दुःख नसे’ ॥ ४५ ॥
ऐसे म्हणोन बैल घेतला । म्हणती आमचे उपयोगा आला ।
ज्ञानचक्षु सद्‌गुरु भला । करणी करील अघटित ॥ ४६ ॥
दिवाणसाहेब नामें एक । म्हसवडीं होते सांप्रदायिक ।
तयांसी वदती सकौतुक । ’भेट हीच अखेरची’ ॥ ४७ ॥
असो म्हसवडाहून निघाले । शीघ्र गोंदावेली आले ।
सकळांलागीं उपदेशिलें । ’रामनामविसरूं नये ॥ ४८ ॥
आमुची जागा खाली पडली । रामप्रभूची चिठी आली ।
आनंदें निरोप द्या सकळीं’ । हास्यमुखें बोलती ॥ ४९ ॥
सकळां वाटे हें सहज । विनोदें बोलती गुरुराज ।
अज्ञान नेणती काज । समर्थ जाती स्वस्थानीं ॥ ५० ॥
तृणाच्या गंज्या घेतल्या । गायींस गोठणीं घतल्या ।
गुरुआश्रयें शोभल्या । गोकुळीं जैशा ॥ ५१ ॥
शके अठराशें पस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष ।
भानुवासरी नवमीस । समर्थकार्यें परिसावीं ॥ ५२ ॥
काळे नामें शाळाधिकारी । उतरले मारुतीमंदिरी ।
समर्थांसी नेवोन घरीं महानैवेद्य समर्पिला ॥ ५३ ॥
भूसाहेब केतकर । होते पंक्तीस बरोबर ।
समर्थ वदती चिंतातुर । ’काय इच्छा सांगावी’ ॥ ५४ ॥
साहेब विनविती समर्थांसी । ’देह पडावा चरनापाशीं ।
येवढीच इच्छा आम्हांसी । आळी’ समर्थें प्रवावी’ ॥ ५५ ॥
समर्थ वदती ऐसें कांहीं । होणेंचा योग नाहीं ।
जाणें आम्हां लवलाहीं । तुम्ही पुढती याल’ ॥ ५६ ॥
ऐसें वदोन मंदिरीं आले । खोलींत जावोन बैसले ।
तंव बाहेर भांडूं लागले । आंताजीपंत आणि काका । ५७ ॥
समर्थें दोघां बोलावूनि । ’कां झगडा रामसदनीं’ ।
वदतां करिती विनवणी । ’आपण नसतां ऐसें होतें’ ॥ ५८ ॥
समर्थ वदती सकौतुक । ’आम्ही कोठे उदईक ।
असेल तें मानोनि सुख । रामप्रसाद सेवावा’ ॥ ५९ ॥
आउताईस बोलाविती । म्हणती ’सांगा सकलांप्रति ।
भात गेला गांवाप्रती । भाजीभाकर सुखें खावी’ ॥ ६० ॥
असो सायंकाळसमयास । स्वारी आली गोशाळेस ।
बैसोन सुखासनास । म्हणती ’हे स्थान रम्य पवित्र ॥ ६१ ॥
येथें जागा सारवावी । रांगोळी सुंदर घालावी’ ।
तैसें करवून भक्तांकरवीं । वरी आपण बैसले ॥ ६२ ॥
भवानरावासी पाचारिलें । ’येथें गाईंचें गवत पडले ।
उदईक येऊं तों वहिलें । तुम्ही रहा वसतीसी’ ॥ ६३ ॥
तैसेचि गोषाळेचे कारकून । तयां खडावा देऊन ।
’आम्ही येऊं तोंवरी जतन । करीत येथें बैसावें’ ॥ ६४ ॥
ऐसें वदोन सत्वर । मंदिरी आले गुरुवर ।
आप्पा नामें जरंडीकर । पाचारिलें तयासी ॥ ६५ ॥
’काय निमित्त उपोषण । केलें तुम्हीं दिवस तीन’ ।
आप्पा वदे ’समर्थांलागोन । प्रकृतीस स्वास्थ्य असावें’ ॥ ६६ ॥
समर्थ वदती ते अवसरीं । ’माझी प्रकृती उदईक बरी ।
होईल तूं चिंता न करीं’ । आग्रहें भोजना बैसविती ॥ ६७ ॥
असो रात्री भजन अति केलें । निर्वाण अभंग गाईले ।
भक्त उदासीन झाले । संशय वाटे सकळांसी ॥ ६८ ॥
रात्रीं करोन प्रेमळ भजन । उपदेशिती सकळांलागोन ।
’सतत करा नामस्मरण । गुरुवचनीं भाव धरा ॥ ६९ ॥
नामपाथ ज्याचे वैखरी । नित्य आम्ही त्याचे अ।अन्तरीं ।
सदा साह्य श्रीहरी । विश्वास धरा निश्चयें ॥ ७० ॥
ऐसा करोनि उपदेश । आळविले अयोध्याधीश ।
अश्रु आले नयनास । श्रीरामप्रभूच्या ॥ ७१ ॥
तें द्द्व-भक्तांचें प्रेम । कोण वर्णील निरुपम ।
अवाप्तकामासी सकाम । व्हावया लाविती भक्त ॥ ७२ ॥
बहुतांपरी सगुन भजन । करोनि केलें शयन ।
शिष्य समस्त उद्विग्न । गति बरवि दिसेना ॥ ७३ ॥
पहांटे पान्च घटीसी । करिती शौचमुखमार्जनासी ।
श्रीगुरु वदती अम्मासी । ’आजची सेवा अखेरची’ ॥ ७४ ॥
राममंदिरी जावोनी । पुढती आसन घालोनी ।
सकलां वदती ;उच्च स्वरांनीं । भजन करावें; ॥ ७५ ॥
भजन कराया लावोन । समाधि लाविली आपण ।
ब्रह्मांडभेद करोन । ज्योत मिळविली रामरूपीं ॥ ७६ ॥
दुःखाचा कडॆलोट झाला / येकमेका/म्चे [अडती गळां ।
वंदन करिती बेळोवेळां । गुरुचरणांसी ॥ ७७ ॥
’आम्हां अर्भकां टाकोन । कां बैसलांत रुसोन ।
कृपा करोन सोडा मौन । प्रेमसंभाषण करावें ॥ ७८ ॥
आम्ही बालकें अज्ञान । तूं माय सदय सघन ।
आम्ही अनंत अपराधी दीन । कोठें जासी त्यजोनी ॥ ७९ ॥
काय आमुचें दुर्भाग्य । गुरुचरणांचा वियोग ।
घडला, आतां तगमग । वारील कोण’ ॥ ८० ॥
असो ऐसा बहुत शोक । करिते झाले सकळ लोक ।
प्रेम जिव्हाळा आत्यंतिक । गुरुमायेचा ॥ ८१ ॥
आज ब्रह्मानंद असते जरी । तरी व्यवस्था करिते सारी ।
शिष्य तेचि अधिकारी । म्हणती सर्व ॥ ८२ ॥
ते येईपर्यंत । देह ठेवावा तीन रात ।
ऐसें थरोनि एकमत । तारा धाडिल्या चहूंकडे ॥ ८३ ॥
परि त्यांचा पत्ता नाहीं । पूर्वींच ठरलें सर्वही ।
प्रत्युत्तर न ये कोठेंही । मग चिंता प्रवर्तली ॥ ८४ ॥
ते दिवशीं ग्रामस्थांनीं । सकल कर्में सांडोनी ।
सद्‌गुरुसन्निध उपोषणीं । राहिले अश्रु ढाळित ॥ ८५ ॥
आणिक नित्य यात्रे येती । तयांसी अडथळे मार्गावरती ।
नाना प्रकारें होऊन राहती । इच्छा श्रीसमर्थांची ॥ ८६ ॥
परस्थ कोणी येत नाहीं । देह पल्लवी ठेविला पाहीं ।
दृश्य दृश्यत्वें जाय विलयीं । यास्तव दहन करावें ॥ ८७ ॥
एकादशीस ऐसा विचार । ठरला सर्वानुमतें साचार ।
तंव नवमीचा प्रकार । आठवला तेसमयी ॥ ८८ ॥
गोठणीं भवानराव यासी । कथिलें येईन वसतीसी ।
तैसेंचि देती पादुकांसी । पंतोजीजवळी ॥ ८९ ॥
स्थान सारवोन स्वच्छ केलें । रांगोळ्या घालोन वरी बैसले ।
;विश्रांती घ्यावया वहिलें । स्थान असे पवित्र’ ॥ ९० ॥
ऐसें वदले तें आठवलें । म्हणोनि तेंचि दहनस्थान ठरविलें ।
विमान करोन श्रृंगारिलें । मूर्तिं भीतरी बैसविली ॥ ९१ ॥
तेज फांकले चहूं दिशी । हनुमानरूपें भक्तांसी ।
दर्शन दिधलें ते समयासी । इतरां सतेज सचेतन ॥ ९२ ॥
प्रचंड नामगजरांत । मिरवणूक आली गोठणाप्रत ।
पुनरपि स्थान शोभिवंत । केलें सडे घालोनी ॥ ९३ ॥
गोमतेचें मूत्र । मुरोनि आधींच पवित्र ।
बहुत दिवस केलें क्षेत्र । सद्‌गुरुसमर्थांनी ॥ ९४ ॥
कर्पूर बिल्व आणि चंदन । तुळशीकाष्ठें केलें दहन ।
सगुणाकृति लया पावोन । जगदाकार जाहली ॥ ९५ ॥
दृश्य दृश्यामाजीं दडलें । व्यापकत्वें जगती भरले ।
निर्गुण आलें ना गेलें । अखंड भरलें गुरुरूप ॥ ९६ ॥
भाविकांचे भावनेसाठीं । सगुण साक्षात्‌ देती भेटी ।
बहुतां दृष्टांती कथिती । ’आम्ही असों येथेंचि’ ॥ ९७ ॥
ज्ञानियां आले ना गेले । भाविकां अंतरी भरले ।
अज्ञानियां दृश्य झाले । समाधिरूपें ॥ ९८ ॥
असो गोंदवलींचे चैतन्य । अदृश्य जाहलें येथून ।
उत्तरचरित्र जें गहन । परिसा पुढील अध्यायीं ॥ ९९ ॥
श्रींचा दासानुदास । कथितसे चरित्रास ।
निमित्तमात्र करूनि त्यास । त्याचा तोचि वदविता ॥ १०० ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवनीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रमदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ १०१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती