एकनाथ षष्ठी : संत एकनाथ महाराजांनी या दिवशी समाधी घेतली

मंगळवार, 30 मार्च 2021 (13:03 IST)
संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो.
 
श्री एकनाथष्ठी हा दिवस श्री एकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा केला जातो. पैठण येथील नाथषष्ठीची वारी मोठी असून यासाठी मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध जागांहून आलेल्या ४७५ दिंडया, भानुदास-एकनाथ चा गजर हयाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.
 
पैठण येथे फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होतं. षष्ठीला पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक होतो. 
 
गावातील मंदिरातून नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी श्री एकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. येथे आरती होते आणि सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या मठात विसावतात.
 
सप्तमीच्या सोहळ्याला रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला छबिना असे म्हणतात. मिरवणूक काढून पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर येथे पादुकांना गोदास्नान घातलं जातं, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. येथे वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तन इत्यादींचे आयोजन केलं जातं. 
 
अष्टमीला काला दिंडी निघते. या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळल्या जातात. हे दृश्य बघण्यासाठी हजारो भक्त हाजर असतात. समाधी मंदिरात पोहचल्यानंतर मंदिराच्या समोर पटांगणावर शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात पावल्या खेळण्यात लीन होऊन जातात. 
 
मंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गुळ- लाह्यांचे मोठेमोठे लाडू बांधण्यात येतात. मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवली जाते. सूर्यास्तावेळी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून हंडी फोडण्यात येते. त्याचा प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. 
 
या उत्सवात हजारो वारकरी सहभागी होतात. फाल्गुन षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने याला पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. नंतर नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतली त्यामुळे श्री एकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
 
पंचपर्व याप्रकारे आहेत - नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह, नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह, श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथमहाराज जलसमाधी.
 
यामुळे फाल्गुन षष्ठीला वेगळचं महत्त्व आहे आणि भाविक या सोहळ्याचा आनंद घेतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती