औरंगाबाद पर्यटन आणि तीर्थस्थळं

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:54 IST)
चारही बाजुंनी ऐतिहासीक स्मारकांनी वेढलेला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी आर्कषणाचे केंद्र आहे कारण येथे जगभरात प्रसिध्द असलेल्या अजिंठा ऐलोरा गुफा आहेत ज्या युनेस्कोच्या दृष्टीकोनातुन वैश्विक ठेवा आहे. या व्यतिरिक्त येथे बघण्यासारखे काय आहे त्यावर एक नजर टाकू या-
 
अजिंठा लेणी – जगप्रसिध्द अजिंठा लेणी स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेकरता प्रसिद्ध आहे. इ.स. पुर्व 2 या शतकापासुन ते इ.स पुर्व 4 थे शतक अश्या प्रदीर्घ कालखंडात तयार करण्यात आलेल्या या 29 बौध्द लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासुन 100 कि.मी. अंतरावर या लेणी पाहायला ‍मिळतात. वाघुर नदीच्या परिसरात या लेणी महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. या लेण्यांमधे बौध्द तत्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त केले आहे. 
 
वेरूळ लेण्या – वेरूळच्या लेण्या औरंगाबादहून 30 कि.मी. अंतरावर आहेत. या देखील जगप्रसिध्द असून येथे 34 गुफांमधे बौध्द, हिंदु, जैनांच्या संस्कृतिचे दर्शन घडते.
 
दौलताबाद किल्ला – महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांमधे देवगिरीच्या किल्ल्याचा समावेश आहे. या अभेद्य अश्या किल्ल्याला पहाण्यासाठी लांब लांबहून पर्यटक येतात. देवगिरी किल्ल्याला 28 नोव्हेंबर 1951 ला राष्ट्रीय संरक्षीत स्मारक म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या गडावरील पंचधातुंनी तयार मेंढातोफ विशेष आकर्षण आहे. 
 
बिबी का मकबरा – 
आगऱ्यातील ताजमहालाची हुबेहुब प्रतिमा ही औरंगाबाद शहरातील बिबी का मकबरा येथे पाहयला मिळते. ही औरंगजेबाची पत्नी रबिया.उद.दुर्रानी ची दफन भुमी आहे. मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आजम शाह याने आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा मकबरा बनवला. बीबी का मकबरा 1668 ते 1669 या दरम्यान बनवण्यात आल्याचे उल्लेख आढळतात 
 
घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग – 12 ज्योर्तिलिंगापैकी एक घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग हे औरंगाबाद जिल्हयात असून या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळते. महादेवाच्या दर्शनासाठी येथे पुरुषांना शर्ट काढून जावं लागतं तर स्त्रियांना लांबून दर्शन घ्यावं लागतं. 13 व्या शतकात दिल्ली च्या सुलतानांनी हे मंदीर उध्वस्त केले होते, नंतर 18 व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी या मंदीराचा जिर्णोध्दार केला आणि सोबतच मंदीर परिसरात काशी विश्वनाथ, विष्णु मंदीर, सोमनाथ ज्योर्तिलिंगाची देखील त्यांनी स्थापना केली.
 
खुलताबाद – या ठिकाणी भद्रा मारोती हे देवस्थान असून येथे हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मुर्ती विराजमान आहे. येथे सुफी संत आणि इतिहासकालीन राजघराण्यातील आणि सरदार घराण्यातील व्यक्तींच्या कबरी आहेत. खुलताबादातील या गावाला पूर्वी रत्नापुर म्हणून ओळख होती. येथे जर्जरीबक्ष नावाची दर्गा देखील आहे.
 
पैठण – औरंगाबादहून 50 कि.मी. अंतरावर असलेले ठिकाण ’पैठण’ गोदावरी काठी वसलेले आहे. हे ठिकाण संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, आणि पैठणी साडी यासाठी प्रसिध्द आहे.
 
पैठणमधे एकनाथ महाराजांचा वाडा होता. या वाडयाचेच रूपांतर मंदीरात करण्यात आले आहे. गोदावरी तिरी नागघाट आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखातुन वेद वदवले होते. या ठिकाणी रेडयाची मोठी मुर्ती देखील आहे.
 
साडीचा एक प्रकार पैठणी या नावावरुन गावाचे नाव पडले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती