वारकरी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर असा की, दरवर्षाला आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी एकादशीला पंढरपूरची वारी म्हणजे यात्रा करतो, तोच वारकरी हो. शेकडो वर्षापूर्वी दळणवळणाची, संवादाची साधने ज्या काळात खडतर होती तेव्हापासून सुरू झालेली वारीची भक्ती परंपरा. आताच विज्ञानयुगात अधिक जल्लोषात रस्ते, महामार्ग, दळणवळणाच साधनांची उपलब्धी नाकारून टाळ, मृदंग, गळ्यात वीणा, बाया माणसाच्या डोईवर तुळशी वृंदावन, कपाळाला गंध- अबीर- बुक्का, गळत तुळशीमाळा, प्रवासात वापरायच्या कपडय़ाचे, धान्याचे पीठाचे डोक्यावरचे गाठोडे सांभाळत महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातून शेतकरी, कष्टकरी सधन, निर्धन पंढरपुराची वाट चालत असतात. ही वारी म्हणजे वारकर्यांचेच नाहीतर सग्यासोयर्यांचे, आप्तजनांचे जीवन सात्विक आनंदाने ओतप्रोत भरून टाकणारी असते. अगदी रणरणत्या उन्हात, धुवांधार पावसात, वादळवार्यात 12 व्या शतकाच्या आधीपासून तो आजतागायत अखंड ही वारी चालू आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात वैचारिक अधिष्ठानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी संप्रदाला गतिमान करताना शैव-वैष्णव या पंथांना, संप्रदायाला एकजीव करून टाकले. जसे आत्मा आणि ब्रह्म एकरूप असते अगदी तसे, त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा पंथ स्वीकारला तो अंधश्रद्धेपासून अलिप्त होता. टाळ-मृदंगांच गजरात वाळवंटाच्या मेळ्यातील तल्लीनता अगदी मनस्वी असते. सतचित एक होते. वारकरी संप्रदायाचे ज्ञानकांड खर्या अभ्यासू, वारकर्यालाच कळू शकते. जो ऐहिक आणि परमार्थिकाच्या संघर्षातून निर्माण होणार्या चिरंतन सत्याचा अनुभव घेतो.
WD
शेती- गिरण्या- कारखानतून राबून, रक्ताचे पाणी करून, घाम गाळून जगणारे शेतकरी, कष्टकरी, मजूर या वर्गातले कष्टकर्याचे हितसंबंध पांडुरंगाच्या प्रेमात बांधले गेले आहेत. ज्ञानेश्वर माउलींनी लिहिलेली ‘वैश्विक’ प्रार्थनासुद्धा कष्टकर्याठी थकून भागून गेलेल्या आयुष्यात, रंजल्या-गांजल्या जगण्याला दिलासा देऊन जाते. ही आचंबित करणारी घटना आहे.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांच्या योगसिद्धीच्या कथा महाराष्ट्रातील सर्वच बहुजन समाजाला आदरणीय आहेत. रुक्मिणीबाई-विठ्ठलपंत कुलकर्णी हे या भावंडांचे माता-पिता. विठ्ठलपंतांनी वैराग्याच्या आवेशात गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घेतला होता. गुरूआश्रमी गुरूने संन्यास घेण्याचे कारण विचारले आणि मग गुरूनेच आदेश दिला, पुनश्च गृहस्थाश्रमी होण्याचा, संन्यास घेऊन परत प्रपंच करण्याचा. नुसता प्रपंच नाहीतर ज्ञानी, कर्तृत्ववान, तेज:पुंज मुलांना जन्म देऊन त्यांनी वाढवले. धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंतांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला.
तो असह्य होऊन विठ्ठलपंत रुक्माबाई या दाम्पत्याने प्रयागला जाऊन जलसमाधी घेतली. अनाथाचे जगणे चार भावंडांच्या नुसते वाटय़ाला आले नाही तर धर्ममार्तंड समाजाने केलेली संन्य शाची पोरे म्हणून निर्भर्त्सनाही वाटय़ास आली. द्वेष, विटंबना वाटय़ास आली. माउलींचे, त्यांच्या भावंडांचे चरित्र आजही वाचताना गलबलून आल्याशिवाय राहात नाही. एवढे दु:ख, छळ वाटय़ास येऊनही ही भावंडे मनुष्यद्वेष्टी झाली नाहीत. सुडाने पेटून उठली नाहीत तर मनुष्जातीला प्रगल्भ करणार्या मानवतावादाची, आत्मिक उन्नतीच्या तत्त्वज्ञानाची ध्वजा आयष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी फडकत ठेवली.
वारकरी संप्रदात त्या उसळलेल्या वारीच्या महापर्वात कोण सवर्ण, कोण दलित समजत नाही. विठ्ठलाची गळाभेट घेऊन जो तो परत आपल मुक्कामाला गाववाडय़ात, पंचक्रोशीत परततो. सात्विक आनंदाची व समाधानाची शिदोरी घेऊन. सामाजिक जाणीव अधिक तीव्र होत जाते तशी विठ्ठलावरची श्रद्धा त्यांना कष्टातून जगण्याची उर्जा देत राहते.