फुटबॉल इतिहासात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्यावर वाद ओढावून घेतला आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये अर्जेंटीना आणि आइसलॅन्ड या दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान मॅराडोना प्रेक्षकांच्या रांगेत बसून सिगारचे झुरके घेताना दिसून आले.
रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या कोणत्याही स्टेडिअममध्ये सिगार, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखू उत्पादनांचे सेवन करणे हे निषिद्ध आहे. अशाप्रकारे स्टेडिअममध्ये सिगार ओढून मॅराडोना यांनी नियम मोडला आहे. अर्जेंटिना आणि आइसलॅण्ड यांच्या रंगलेला सामना पाहण्यासाठी मॅराडोना स्टेडिअममध्ये उपस्थित होते. या सामन्यामध्ये अर्जेंटीनासारख्या तगड्या संघाला आइसलॅण्डच्या संघाने बरोबरीत रोखले. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीलाही स्पॉट किक मारण्यात अपयश आल्यामुळे सर्वच चाहते निराश झाले. याचदरम्यान मॅराडोना यांनी आपल्या खिशातून सिगार काढली आणि झुरके मारण्यास सुरुवात केली. सर्वांनी त्यांना पाहिले परंतु कोणीही त्यांना ते करण्यापासून अडवले नाही किंवा तक्रारदेखील केली नाही.
आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच मॅराडोना यांनी प्रेक्षक आणि आयोजकांची माफी मागितली. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्याची प्रत्येकाचा वेगळा अंदाज असतो. खरे सांगायचे झाले तर माला याची अजिबात कल्पना नव्हती की, स्टेडिअममध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे. माझ्याकडून झालेल्या या गैरप्रकाराबाबत मी साऱ्यांची जाहीर माफी मागतो. अर्जेंटिनाला सपोर्ट करा. याव्यतिरिक्त आणखी मी काही बोलू शकत नाही.’