आदिवासी बांधवानी कोरोना लसीकरण करावे यासाठी गावोगावी बैठका

शुक्रवार, 21 मे 2021 (21:30 IST)
कोरोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कळवण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी  कोरोना लसीकरणचा लाभ घ्यावा असे आवाहन कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदिवासी बांधवाना  केले आहे .
कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टयात लसीकरण संदर्भात आदिवासी बांधवामध्ये अफवा पसरवून गैरसमज केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी आदिवासी भागात कमी प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी ए कापसे यांना  आदिवासी भागातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार बी ए कापसे होते.
 
कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे . परिस्थिती मध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे अशी विनंती सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आयोजित  बैठकीत नागरिकांशी संवाद साधतांना केली. कळवण तालुक्यातील मोहमुख, बिलवाडी, सुकापूर, वडपाडा, पळसदर, मोहपाडा, देवळीकराड,लिंगामा, आमदर या गावांना भेटी देऊन नागरिकांसमवेत  बैठका कोरोना लसीकरणाचे महत्व पटवून दिले.
 
कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर कोणताही गंभीर त्रास होत नाही.लसीकरण झाल्यानंतर यदा कदाचित कोरोनाची लागण झाली तर त्यापासून फार धोका संभावत नसल्याने नागरिकांनी मनात कोणताही किंतू परंतु न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार बी ए कापसे  यांनी  यावेळी केले . श्री मीना व श्री कापसे यांनी आदिवासी नागरिकांना विश्वासात घेऊन संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या मनातील शंका, कुशंकाना पूर्णविराम दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती