कोरोना लस : कोव्हिड 19साठी भारतात कोणत्या लशी दिल्या जातात? कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक लशींची वैशिष्ट्यं काय?

रविवार, 20 जून 2021 (12:52 IST)
कोव्होव्हॅक्स आणि बायोलॉजिकल ई या दोन्ही नव्या लशी भारतात येणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असलेल्या भारतानं आता कोरोनाच्या लशींच्या उत्पादनाची गती वाढवली आहे. त्यानुसार आता भारतातच नोव्हाव्हॅक्सची कोरोनावरील लस तयार करण्याची तयारी सुरू आहे.
 
या लशीचं उत्पादन ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्येच घेतलं जात आहे.कंपनीच्या मते, अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 90 टक्क्यांपर्यंत परिणामकारक असल्याचं समोर आलं आहे.
 
भारत सरकारनं बायोलॉजिकल ई या देशांतर्गत कंपनीलादेखील कोरोनाच्या लशींच्या 30 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.भारत सरकारनं आतापर्यंत लसीकरण करण्यासाठी मंजुरी दिलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक V या लसीचे 26 कोटी डोस नागरिकांना दिले आहेत.
 
सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक ही आता भारतामध्ये उपलब्ध असलेली तिसरी लस आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.भारताता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 2.9 कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 3.3 कोटी लोकांना याची लागण झालेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून याठिकाणचे 1.75 कोटी नागरिकांना आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गानं वेढ्यात घेतलं आहे.
 
जगभरातील कोरोनामुळं झालेल्या मृत्यूच्या आकड्याचा विचार करता. या बाबत भारताचा आकडा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा कमी आहे. आतापर्यंत भारतात कोव्हिड - 19 मुळं तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.भारत सरकारनं या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं आहे. पण कोरोनाच्या लशींचा तुटवडा आणि लसीकरणाबाबत असलेला संकोच, यामुळं लसीकरणाचा वेग आधीच्या तुलनेत मंदावला आहे.
 
भारतात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत फक्त 3.5 नागरिकांनाच कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 15 टक्के नागरिकांना कोरोनाच्या लशीचा फक्त एक डोस मिळाला आहे.
 
सध्या भारत सरकार कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींद्वारे नागरिकांचं लसीकरण करत आहे. देशांतर्गतच या लसींचं उत्पादन घेण्यात आलं आहे.भारतात रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक V लशीच्या वापरालाही मंजुरी मिळाली आहे. मर्यादीत प्रमाणात त्याचाही वापर केला जात आहे.


कधीपर्यंत उपलब्ध होणार कोव्होव्हॅक्स?

अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्सनं गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटबरोबर कोरोनाच्या लशीचे दोन अब्ज डोस तयार करण्यासाठी करार केला होता.सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी यावर्षी सप्टेंबरपर्यंत या लशीचं उत्पादन सुरू होण्याची आशा व्यक्त केली होती. भारतात या लशीचं नाव कोव्होव्हॅक्स असणार आहे.या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपतील. पण त्यापूर्वी लशीच्या चाचण्यांच्या जागतिक माहितीच्या (डेटा) आधारे कंपनी लशीच्या वापराच्या परवानगीसाठी अर्ज करू शकते.
 
नागरिकांना नोव्हाव्हॅक्सचे दोन डोस द्यावे लागतील.अमेरिकेत झालेल्या चाचण्यांमध्ये गंभीर संसर्गाचा धोका असलेल्यांमध्ये ही लस 91 टक्के परिणामकारक असल्याचं समोर आलं आहे.तर मध्यम आणि अत्यंत कमी धोका असलेल्यांना कोरोनापासून वाचवण्यात यश 100 टक्के परिणामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये समोर आलं.
 
तज्ज्ञांच्या मते देशात लसीकरणाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. ही मोहीम गतिमान झाल्यावरच हे लक्ष्य गाठलं जाऊ शकतं असं तज्ज्ञ म्हणतात. गेल्या काही दिवसापांसून अनेक राज्यांमध्ये लशीचा तुटवडा असल्याची तक्रार केली जात आहे.लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्रांचं लसीकरण थांबवावंही लागलं होतं.
 

स्पुटनिक-5 विषयी आणखी काय माहिती उपलब्ध आहे?

स्पुटनिक-5 ही लस भारतामध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने आणली आहे. विखाखापट्टणम, बंगळुरू, मुंबई, कोल्हापूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नईसह आणखी काही शहरांत ही लस उपलब्ध असल्याचं डॉ. रेड्डीज लॅबने म्हटलंय.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने या लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी तसंच वितरणासाठी सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं.रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि डॉ. रेड्डी लॅब यांच्यात सामंजस्य करार झाला असून, भारतात लशीचे 30 कोटी डोस तयार करण्यात येतील. डॉ. रेड्डी ही देशातल्या अग्रगण्य फार्मा कंपन्यांपैकी एक आहे.
 
रशियातील शास्त्रज्ञांनी 'द लॅन्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. ही लस कोव्हिड-19 विरोधात 92% यशस्वी आहे असंही यात म्हटलं आहे.
 
चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा झाले नाहीत. असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी 'द लॅन्सेट'मधील अहवालात केलाय.रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूट इथं ही लस तयार करण्यात आली आहे.
 
ही लस सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडली होती कारण या लशीच्या अंतिम चाचणीचा अहवाल येण्याआधीच ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली होती. पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या लशीचे फायदे आता सगळ्यांसमोर आहेत.या लशीत सर्दी-पडशासारखा एक व्हायरस वापरला आहे. या व्हायरस निरुपद्रवी आहे पण कोरोना व्हायरसचा एक छोटासा अंश शरीरात सोडण्यासाठी हा सर्दी-पडशाचा व्हायरस कॅरियर म्हणून काम करतो.हा अंश शरीरात आला की हा कॅरियर कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडची शरीराला सवय करून देतो,

ज्यायोगे रोग प्रतिकारक शक्ती धोका भविष्यातला धोका ओळखेल आणि त्याच्याशी लढेल, तेही आजारी न पडता.एकदा लस घेतली की शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात. खास कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. म्हणजे जेव्हा खरोखरीचा व्हायरस शरीरात शिरेल तेव्हा या अँटीबॉडीज तत्परतेने लढू शकतात.ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस या तापमानाला साठवली जाऊ शकते. एका साध्या फ्रीजच तापमान साधारण 5 डिग्री सेल्सियस इतकं असतं त्यामुळे ती लस आरामात इकडून तिकडे पाठवली जाऊ शकते.
 

दुसऱ्या डोससाठी वेगळी लस

स्पुटनिक-5 बाबत एक वेगळी गोष्ट अशी आहे की या लशीत पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी लशी वेगवेगळ्या आहेत. दुसरा डोसची लस पहिलीपासून जराशी वेगळी आहे. दोन्ही डोस 21 दिवसांच्या अंतराने द्यायचे आहेत.
हे दोन्ही डोस कोरोना व्हायरसच्या 'स्पाईक' ला लक्ष्य बनवतात पण वेगवेगळे व्हेक्टर्स वापरता. व्हेक्टर्स म्हणजे लशीत वापरलेले निरुपद्रवी व्हायरस.लस बनवण्यासाठी दोन वेगळे फॉर्म्युले वापरण्यामागे उद्देश हा आहे की रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. एकाच लशीचे दोन डोस देण्याऐवजी दोन वेगळ्या लशींचे दोन डोस दिले तर रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढू शकेल आणि अधिक काळासाठी कोरोनापासून बचाव होऊ शकेल.

ही लस परिणामकारक तर आहेच पण हिच्यापासून काही धोका नाहीये. चाचण्यांदरम्यान या लशीमुळे कोणत्याही प्रकारचा गंभीर धोका उत्पन्न होतोय असं आढळून आलेलं नाही.अर्थात या लशीचे काही साईड-इफेक्ट अपेक्षित आहेत. पण ते सौम्य आहेत. यात हात दुखणे, थकवा, आणि हलका ताप असे साईड-इफेक्ट होऊ शकतात. पण ज्या व्यक्तींच्या गटावर या लशीची चाचणी केली गेली त्यात कोणालाही गंभीर आजार झाला नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही.रशियासोबतच स्पुटनिक-5 ही लस अर्जेंटिना, पॅलेस्टाईनचे भाग, व्हेनेझुएला, हंगेरी, युएई आणि इराणमध्ये वापरली जातेय.भारतात ही लस मिळायला काही आठवड्यांचा वेळ आहे. तोवर मात्र कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लशींवरच इथल्या लसीकरणाचा डोलारा टिकून आहे.
 

कोव्हॅक्सिन काय आहे?

कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते पण त्याने काही धोका होत नाही.ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. भारत बायोटेकला गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्यांनी 16 लशी बनवल्या आहेत आणि 123 देशांमध्ये निर्यात केल्या आहेत.भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना व्हायरसचं सँपल वापरलं होतं.ही लस दिल्यानंतर शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती मेलेल्या कोरोना व्हायरसची रचना ओळखू शकते. याने रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरसच कसा आहे हे समजतं ज्यायोगे त्याच्याशी लढता येतं.या लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियसला साठवता येते. या लशीच्या तिसऱ्या फेरीतल्या चाचण्यांच्या प्राथमिक डेटावरून लक्षात येतं की ही लस 81% परिणामकारक आहे.जानेवारी महिन्यात या लशीला तडकाफडकी मान्यता दिली होती ज्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या.भारत बायोटेककडे सध्या 2 कोटी डोसचा साठा आहे आणि येत्या वर्षभरात 70 कोटी डोस बनवण्याचा त्यांचा इरादा आहे.
 

कोव्हॅक्सिन वादात का सापडली?

जानेवारी महिन्यात या लशीला 'आणिबाणीच्या परिस्थितीत' मान्यता दिली होती. नियमकांनी म्हटलं होतं की, 'आणिबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः व्हायरसचे नवनवीन म्युटेशन होत असताना, लोकांच्या हितासाठी या लशीच्या चाचण्या चालू असतानाही लशीच्या वापराला मान्यता देत आहोत.'

पण लाखो लोकांना जी लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाणार आहे ती 'आणिबाणीचा उपचार' कसा ठरू शकते याबद्दल तज्ज्ञांनी प्रश्न उभे केले. ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कने त्यावेळी म्हटलं होतं की " ज्या पूर्ण अभ्यास झालेला नाही अशा लशीला मान्यता देण्यामागे कोणतं वैज्ञानिक कारण असू शकतं याचा विचार करून आम्हीच गोंधळात पडलो आहोत. याचा पूर्ण डेटा हातात आलेला नसणं हे नक्कीच काळजीचं कारण आहे. "

पण निर्माते आणि नियमक दोघांनीही कोव्हॅक्सिनची पाठराखण केली आणि म्हटलं की, "ही लस सुरक्षित आहे आणि कणखर असा इम्यून रिस्पॉन्स देते."भारत बायोटेकने म्हटलं की भारताच्या क्लीनिकल चाचण्यांच्या कायद्यांनी या लशीला 'लवकरात लवकर' मंजूरी मिळण्याचा रस्ता सोपा केला. या लशीच्या चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीनंतर 'या जीवघेण्या रोगाची गंभीरता लक्षात घेऊन असं करण्यात आलं." फेब्रुवारी महिन्यात या लशीचा डेटा जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी डेटा जाहीर केलेला आहे.
 

कोव्हिशिल्ड काय आहे?

ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेंका यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे. भारतात मंजुरी मिळणारी ही पहिलीच लस ठरली.
आम्ही महिन्याला 6 कोटींपेक्षा जास्त डोस तयार करतो आहोत असं सीरमचं म्हणणं आहे.ही लस कोरोना व्हायरसच्या कमकुवत आवृत्तीपासून बनलेली आहे. या कमकुवत व्हायरसचं नाव अडेनोव्हायरस असं आहे आणि चिंपाझींमध्ये सापडतो. कोरोना व्हायरससारखं दिसण्यासाठी यात काही बदल केले आहेत पण यामुळे माणूस आजारी पडत नाही.ही लस जेव्हा शरीरात टोचली जाते तेव्हा रोगप्रतिकारशक्तीला कोरोना व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज बनवण्यासाठी चालना मिळते.
 
या लशीचेही दोन डोस देण्यामधलं अंतर वाढवण्यात आलं असून 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले जाणं अपेक्षित आहे. ही लसही 2 ते 8 डिग्री सेल्सियस या तापमानाला साठवली जाऊ शकते आणि सध्याच्या आरोग्य व्यवस्थेत तिचं वाटप सहजपणे होऊ शकतं.दुसऱ्या बाजूला फायझर-बायोटेकने विकसित केलेली लस -70 (उणे सत्तर) डिग्री सेल्सियस इतक्या कमी तापमानाला साठवावी लागते आणि फार कमी वेळा हलवता येते. भारतासारख्या देशात हे आव्हानात्मक आहे कारण इथे उन्हाळ्यात अगदी 50 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान पोहचू शकतं.
 

कोव्हिशिल्ड किती परिणामकारक?

अर्धा आणि नंतर पूर्ण असे डोस दिल्यानंतर कोव्हिशिल्ड 90 टक्के परिणामकारक असल्याचं आंतराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळून आलं. पण अर्धा अधिक पूर्ण असा डोस देण्याच्या कल्पनेला मान्यता मिळवण्यासाठी पुरेसा डेटा नव्हता.अर्थात, प्रकाशित न झालेल्या डेटानुसार पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जास्त दिवसांचं अंतर ठेवलं तर लशीची परिणामकारकता वाढते असं दिसून आलं. ज्या लहान गटावर हा प्रयोग केला होता त्यांच्यात ही लस 70 टक्के परिणामकारक आहे हे दिसलं.

सीरमचं म्हणणं आहे की कोव्हिशिल्ड 'अतिशय परिणामकारक' आहे. याला पुरावा म्हणून त्यांनी ब्राझील आणि यूकेत झालेल्या थर्ड फेज चाचण्यांचं उदाहरण दिलं.पण रूग्ण हक्क संस्था ऑल इंडिया अॅक्शन नेटवर्क यांचं म्हणणं आहे की या लशीला घाईघाईत मान्यता दिली आहे. लशीच्या निर्मात्यांनी भारतीय परिप्रेक्ष्यात अभ्यास केलेला नाही.
 

इतर कोणकोणत्या लशी उपलब्ध आहेत?

याव्यतिरिक्त काही लशींच्या चाचण्या भारतात सुरू आहेत.अहमदाबादस्थित झायडस-कॅडिला ही संस्था सध्या झायकोव्ह-डी ही लस विकसित करत आहे.हैद्राबादची बायोलॉजिकल इ ही कंपनी भारतातली पहिली खाजगी लसनिर्माता आहे. ती कंपनी अमेरिकेच्या डायनाव्हॅक्स आणि बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिन यांच्यासोबत एक लस विकसित करत आहे.भारताची पहिली mRNA लस HGCO19 पुण्यात बनतेय. इथली जिनोव्हा ही कंपनी अमेरिकेच्या HDT बायोटेक या कंपनीबरोबर जेनेटिक कोडचे भाग वापरून इम्यून रिस्पॉन्सला कारणीभूत ठरणारी लस बनवतेय.
 

भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणारी लस बनवतंय.

सीरम इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन व्हॅक्सिन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावॅक्स मिळून आणखी एक लस विकसित करत आहेत.
 
भारताची लस कोणकोणते देश वापरणार आहेत?

भारताने 6.4 कोटी लशींचे डोस 86 देशांमध्ये पाठवले आहेत. यात दक्षिण अमेरिका, कॅरिबियन, आशिया आणि आफ्रिका या खंडातल्या देशांचा समावेश आहे. यूके, कॅनडा, ब्राझील आणि मेक्सिको या देशांचाही समावेश यात आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हीही लशी निर्यात होत आहेत. काही डोस 'भेट' म्हणून दिले जात आहेत कारण लशी बनवणाऱ्या कंपन्या आणि ज्यांना लशी मिळत आहेत अशा देशांनी काही करार केले आहेत. उरलेल्या लशी कोव्हॅक्स योजनेअंतर्गत पाठवल्या जात आहेत. कोव्हॅक्सचं नेतृत्व जागतिक आरोग्य संघटना करतेय आणि येत्या एका वर्षात 190 देशांमधल्या लोकांना दोन अब्जाहून अधिक डोस पुरवता येतील अशी त्यांना आशा आहे.
 
पण मार्च 2021 मध्ये भारताने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेंकाच्या लशी निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. देशातल्या वाढत्या केसेसमुळे आता लशींची मागणी वाढेल त्यामुळे भारतात लशींचा पुरवठा करण्यासाठी निर्यातीवर बंदी घातल्याचं सरकारने म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती