शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?

शुक्रवार, 10 मार्च 2023 (11:29 IST)
ओंकार करंबेळकर
गेले अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत. तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं मनसे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या भाषणात म्हटलंय.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात.
 
या अशा विचारप्रवाहांमुळे शिवाजी महाराजांची सध्याची जन्मतारीख कशाप्रकारे ठरवण्यात आली याचा विचार करण्याचा प्रयत्न येथे करू.
 
सध्याच्या 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.
 
(त्यामुळे जेथे शके 1549 येते तेथे इसवी सन 1627 आणि शके 1551 येते तेथे इसवी सन 1630 साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे.)
 
लोकमान्य टिळकांचे योगदान
छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे आणि वि. का. राजवाडे यांचे नाव आधी घेतले जाते.
 
टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. 14 एप्रिल 1900 च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता.
 
शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली होती.
 
बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते.
 
डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी 'Birth Date of Shivaji' नावाने लिहिलेल्या पुस्तकात हे नमूद केले आहे. आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक 'द महाराष्ट्रा पब्लिशिंग हाऊस लिमिटेडटने 1927 साली प्रकाशित केले आहे.
 
टिळकांनी काही मुद्द्यांचा विचार तेथे केला होता.
 
ते लिहितात,
 
1) कवी भूषण यांनी 'शिवभूषण' या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.
 
2) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही.
 
केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो ते म्हणजे जिजाबाई शहाजी महाराजांना भेटायला बंगळुरूला गेल्या तेव्हा शिवाजी महाराज 12 वर्षांचे होते.
 
3) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते. मात्र गणिती आकडेमोड करुन पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो. चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी लिहिण्यात आली आहे.
 
4) रायरी बखर प्रा. फॉरेस्ट यांनी लिहिली होती. त्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माचे शक 1548 आणि एके ठिकाणी 1549 लिहिले आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू शके 1602 म्हणजे 1680 साली झाला असे लिहिले आहे. मात्र या बखरीत केवळ वर्षांचा उल्लेख आहे. जन्मतारखेचा नाही.
 
5) धार येथील 'काव्येतिहास संग्रहा'मध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी, शके 1549 आणि सोमवार हा जन्मवार दिला आहे. मात्र यामध्ये नक्षत्र चुकीचे देण्यात आले आहे.
 
6) बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या 'शिवदिग्विजय' ग्रंथामध्ये शके 1549, प्रभव संवत्सर, वैशाखद्वीतिया, गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिली आहे. व जन्मवार गुरुवार दिला आहे. चिटणीस बखरीप्रमाणे यातही गोंधळ दिसतो.
 
7) बडोदा येथे प्रकाशित झालेल्या 'श्रीशिवप्रताप' ग्रंथात शके 1549चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे. मात्र रक्ताक्षी हे नाव हे शके 1546 चे होते. शके 1549चे नव्हे.
 
8) संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारिख दिलेली नाही.
 
9) असंच एक वेगळं टिपण 'काव्येतिहास संग्रह' या नियतकालिकाने छापलेल्या 'मराठी साम्राज्याची छोटी बखर' या लेखात दिसून येतं. यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके 1549, क्षय, वैशाख शुद्ध पंचमी, सोमवार असा उल्लेख आहे. इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकले आहे. येथे प्रभव संवत्सर असायला हवे होते.
 
10) भारतवर्ष या नियतकालिकाने 'एक्याण्णव कलमी बखर' प्रकाशित केली. त्यात शिवाजी महाराजांची जन्मतिथी 15 व्या परिच्छेदात दिली आहे. ती शके 1559, क्षय, वैशाख, शुद्ध पंचमी अशी दिली आहे. येथे 1549 ऐवजी 1559 शक पडले आहे.
 
11) भारतवर्षाने 'पंत प्रतिनिधींची बखर'ही प्रसिद्ध केली आहे. त्यात 1549, वैशाख पौर्णिमा, सोमवार असा उल्लेख आहे. ही एक वेगळीच तिथी देण्यात आली आहे.
 
जेधे शकावलीमुळे बदलली अभ्यासाची दिशा
सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म शके 1549 (1627) मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे गृहित धरण्यात आले. मात्र 1916 साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली.
 
या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतिया 1551 ( शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630) असल्याचे घोषित केले.
 
जेधे शकावली काय आहे?
आता जन्मतारखेबाबत इतकी माहिती देणारी जेधे शकावली आहे तरी काय हे जाणून घ्यायला हवे. हा एक 23 पानांचा दस्तऐवज आहे. यातील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे. जेधे शकावलीमध्ये शके 1549 ते शके 1619 म्हणजेच इसवी सन 1618 ते 1697 या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवल्या आहेत.
 
भोर संस्थानातील एका गावाचे देशमुख दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांनी ही शकावली टिळकांकडे सोपवली होती. जेधे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकांनी केला आणि त्यातील बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला.
 
या शकावली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 19 वर्षांपर्यंतच्या नोंदी आहेत आणि त्याच्या लेखकास अस्सल कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध होत असावीत असे दिसते.
 
वानगीदाखल काही उदाहरणे डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी दिली आहेत. ते लिहितात,
 
1) जेधे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके 1540 दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे.
 
2) नौशेरखानाबरोबर झालेली लढाई शके 1579 मध्ये ज्येष्ठ महिन्यात झाली. ही नोंदही बरोबर आहे.
 
3) शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथीही योग्य आहे.
 
4) सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली नोंद जुळते.
 
5) जयसिंहाशी केलेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळली आहे.
 
1627 की 1630
आता इतके सर्व झाल्यावर शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की 1627 ची की 1630ची मान्य करावी हा प्रश्न उरतोच. आपटे आणि परांजपे यांनी 1627 म्हणजे 1549 शक नसावे हे सांगण्यासाठी काही काही नोंदी दिल्या आहेत.
 
1) कवी परमानंद- 'शिवभारत' लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1662 पर्यंतच्या घडामोडी दिल्या आहेत. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 अशी तिथी दिली आहे. जेधे शकावलीशी ही नोंद जुळते.
 
2) राज्याभिषेक शकावली- शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती. त्यातही फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 ही तारीख आहे. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे.
 
3) फोर्ब्स दस्तऐवज- गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए. के फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके 1551 अशी नोंद आहे.
 
4) जेधे शकावली-या शकावलीत स्पष्टपणे 1551 या वर्षाचा उल्लेख आहे.
 
5) दास-पंचायतन शकावली- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551मध्ये झाला अशी नोंद आहे.
 
6) ओर्नेसच्या नोंदी- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला अशी नोंद आहे.
 
7) स्प्रेंजेल- या 1791 साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला असे लिहिण्यात आले आहे.
 
8) तंजावरचा शिलालेख- तंजावरमध्ये 1803 साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 साली झाल्याची नोंद आहे. मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे.
 
जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका
शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे.
 
त्यात मारवाडी भाषेत नोंद केली आहे - ||संवत 1686 फागूण वदि ३ शुक्रे उ. घटी 30|9 राजा शिवाजी जन्मः || संवत 1686 फाल्गुन वद्य 3 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (सन 1630).
 
(संवत कालगणना आपण सध्या वापरत असलेल्या इसवी सनाच्या आधी 56 वर्षे सुरु होते त्यामुळे प्रत्येक वर्षातून 56 वर्षे वजा केली इसवी सन समजून घेता येते.)
 
1966 साली राज्य सरकारने स्थापन केलेली समिती
शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली.
 
या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.
 
समितीच्या पहिल्या बैठकीला आ. ग. पवार काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत महामोपाध्याय द. वा. पोतदार, ग. ह. खरे, वा. सी बेंद्रे. ब. मो. पुरंदरे. मोरेश्वर दीक्षित यांचे फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) या तारखेवर एकमत झाले. मात्र न. र. फाटक यांनी मात्र वैशाख शुद्ध द्वीतिया शके 1549 (6 एप्रिल 1927) ही तारीख योग्य वाटते असे मत दिले.
 
सर्व सदस्यांनी त्यानंतर आपापली निवेदनेही समितीसमोर सादर केली. न. र. फाटक यांच्या तारखेचे खंडन करणारी निवेदनेही सादर करण्यात आली.
 
दुसऱ्या बैठकीसाठी आ. ग. पवार उपस्थित राहिले. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा निर्णायक पुरावा नसल्यामुळे जुनी तारीख कायम ठेवावी असं मत त्यांनी मांडलं. या बैठकीत एकमत न झाल्यामुळे जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडेच सोपवण्यात आला.
 
शेवटी "ठाम पुरावा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहासतज्ज्ञांत एकवाक्यता येईपर्यंत समारंभाच्या सोईसाठी जुनीच तिथी म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 (इसवी सन 1627) ही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे." असा निर्णय शासनाने समिती सदस्यांना कळवला.
 
गजानन भास्कर मेहेंदळे यांचे लेखन
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या 'श्री राजाशिवछत्रपती' या ग्रंथाच्या सोळाव्या परिशिष्टामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे.
 
त्यात त्यांनी एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, पंतप्रतिनिधींची बखर, सातारच्या छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी, शिवदिग्विजय बखर, नागपूरकर भोसल्यांची बखर, शेडगावकर बखर, प्रभानवल्ली शकावली, धडफळे यादी, न्या. पंडितराव यांची बखर, शिवाजीप्रताप बखर, जेधे शकावली, राज्याभिषेक शकावली, फोर्ब्स शकावली, शिवभारत, तंजावर शिलालेख, घोडेगावकर शकावली, चित्रे शकावली, कोस्मी द ग्वार्दचा उल्लेख, रॉबर्ट आर्मचा उल्लेख, स्प्रेंजेलमधील उल्लेख या सर्वांचा विचार केला आहे. मेहेंदळे यांनी ऐतिहासिक साधनांमध्ये चुका का होतात याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.
 
प्रमोद नवलकर यांना विनंती
मेहेंदळे यांनी 1996 साली झालेल्या पुढील घडामोडींचा उल्लेख या परिशिष्टाच्या शेवटी केला आहे. 1996 साली तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांची भारत इतिहास संशोधन मंडळाचे वि. द. सरलष्कर, भारतीय इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र कार्यवाह चिं. ना. परचुरे आणि इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी भेट घेतली. फाल्गुन वद्य 3 1551 ही तिथी स्विकारण्यासाठी सरकारने नवी समिती स्थापन करण्याची विनंती त्यांनी नवलकर यांच्याकडे केली.
 
त्यावर एकदा समिती स्थापन झाली आहे. आता फाल्गुन वद्य 3 या या दिवशी सरकारने जन्मतिथीचा उत्सव साजरा करायचे ठरवले आहे. याबाबत ज्यांना आपले म्हणणे सरकारकडे सादर करायचे आहे त्यांनी एका महिन्यात सादर करावे. त्याबाबत सरकारी निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होईल आणि सरकार निर्णय घेईल असे प्रमोद नवलकर यांनी सांगितले.
 
त्यावर दहा अभ्यासकांनी आपली मते कळवली आणि त्या सर्वांनी फाल्गुन वद्य तृतिया 1551 ला अनुकूल मत दिले होते. ही सर्व माहिती मेहेंदळे यांनी 'श्री राजा शिवछत्रपती' ग्रंथात पान क्र 647,648,649 वर दिली आहे.
 
19 फेब्रुवारी ही तारिख कशी ठरली?
सध्याचा 19 फेब्रुवारी 1630 या तारखेचा निर्णय कसा झाला याबाबत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. या तारखेच्या निर्णयासाठी त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात प्रयत्न केले होते.
 
त्या म्हणाल्या, "याबाबत जुन्या समितीचा अहवाल, इतर पुरावे मांडून मी शासकीय ठराव मांडला. त्याला विधिमंडळाने मंजुरी दिली आणि 19 फेब्रुवारी 1630 तारखेला मान्यता मिळाली. त्यानंतर नव्या सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी या निर्णयाच्या अंमलबाजवणीसाठी पुन्हा प्रयत्न केले. विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारच्या कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि हा निर्णय लागू झाला."
 
इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना समकालीन पुरावे पाहाता 1630 मधील तारीख सुयोग्य असल्याचे दिसते म्हणून या तारखेचा आम्ही पाठपुरावा करतो असे सांगितले.
 
'नवे पुरावे मिळू शकतात'
तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, "जन्मतिथिबाबत नवा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत थोडा धीर धरुन आधीची तारिख कायम ठेवता आली असती. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत नवा अस्सल पुरावा मिळणार नाहीच असे नाही."
 
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या मते, "महाराष्ट्राच्या विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी. आताच्या काळात सर्व निर्णय, कामे तारखेनुसार होतात, त्यामुळे तिथीऐवजी तारखेनुसारच शिवजयंती साजरी व्हावी."
 
100 वर्षांहून अधिक काळ संशोधन करुनही आजही शिवाजी महाराजांची जयंती नक्की कधी साजरी करावी याबद्दल दुमत दिसून येतेच. आज काही ठिकाणी शिवजयंती जुन्या तारखेनुसार, शासकीय उत्सव नव्या तारखेस आणि काही ठिकाणी तिथीनुसार जयंती साजरी होते.
 
(या बातमीसाठी दि. वि. आपटे आणि एम.आर. परांजपे यांनी लिहिलेले Birth Date Of Shivaji या पुस्तकाचा, ग. भा. मेहेंदळे यांच्या श्री राजा शिवछत्रपती पुस्तकातील सोळाव्या परिशिष्टाचा तसेच 1968 साली सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालाचा आधार घेतला आहे.)
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती