महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जारी केली आहे. एमपीएससीने यंदा 666 पदांसाठी ही जाहिरात जारी केली आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, पोलिस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी 100 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
अर्ज कधी दाखल करायचा ?
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
येत्या 22 जानेवारी 2022 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान गट-ब च्या मुख्य परीक्षा होणार आहेत. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब, मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 22 जानेवारी 2022ला होणार आहे. तर पोलिस उप निरीक्षक पेपर दोन 29 जानेवारीला, सहायक कक्ष अधिकारी पेपर दोन 5 फेब्रूवारी आणि राज्य कर निरीक्षक पेपर दोन 12 फेब्रूवारीला होणार आहे.